पन्हाळा–पावनखिंड मोहिमेचा ‘हिल रायडर्स फौंडेशन’चा विश्वविक्रम
कोल्हापूर :
पन्हाळा ते पावनखिंड… अवघ्या ४० ते ५० किलोमीटरचा हा मार्ग नव्हे, तर छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या अद्वितीय शौर्य, त्याग आणि निष्ठेची जिवंत साक्ष आहे. या ऐतिहासिक पवित्र वाटेवर तब्बल ४१ वर्षे अखंडपणे पाऊल रोवत ७५ यशस्वी मोहिमा पूर्ण करणाऱ्या हिल रायडर्स फौंडेशनच्या कार्याची दखल घेत ‘एशियन पॅसिफिक वर्ल्ड रेकॉर्ड’ आणि ‘ग्लोबल वर्ल्ड रेकॉर्ड’ यांनी जागतिक विक्रम म्हणून नोंद केली आहे. या मानाच्या विक्रमामुळे ‘हिल रायडर्स’च्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. एक-दोन मोहिमा यशस्वी करणे सोपे असते; मात्र सलग ४१ वर्षे शिस्त, सातत्य आणि उत्कृष्ट नियोजनाच्या बळावर ७५ मोहिमा यशस्वीपणे पूर्ण करणे ही अत्यंत दुर्मिळ आणि प्रेरणादायी कामगिरी ठरली आहे.
हिल रायडर्स फौंडेशनने केवळ इतिहास अनुभवला नाही, तर त्याचे संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीही जपली आहे. कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहकार्याने पन्हाळा–पावनखिंड ऐतिहासिक मार्गावर प्लास्टिक बंदी अभियान राबविण्यात आले. तसेच दुर्गम वाड्या-वस्त्यांतील गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कायमस्वरूपी मदतीचा हात दिला. प्रशासनाच्या सहकार्याने या मार्गावर हॉल, स्वच्छतागृहे, पाणी योजना आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. याशिवाय चित्रकला स्पर्धा, वृक्षारोपण, आरोग्य शिबिरे, स्वच्छता अभियान, इतिहास विषयावरील व्याख्याने आणि प्रेरणादायी उपक्रमही सातत्याने राबविण्यात आले.
या ऐतिहासिक विश्वविक्रमात हिल रायडर्स फौंडेशनसोबत सातत्याने योगदान देणाऱ्या कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (कोल्हापूर) यांनाही या जागतिक विक्रमाचा सन्मान बहाल करण्यात आला. तसेच मोहिमेच्या यशस्वी आयोजनात मोलाची भूमिका बजावणाऱ्या समिट ॲडव्हेन्चर, व्हरटाईज ॲडव्हेन्चर्स आणि सार्थक क्रिएशन या सहसंस्थांचाही गौरव करण्यात आला.
दरम्यान, नुकतीच पार पडलेली ७६वी पन्हाळा–पावनखिंड मोहीम जिल्हा भाजप अध्यक्ष विजय जाधव यांच्या हस्ते सुरू करण्यात आली. या मोहिमेत ५०० हून अधिक मोहीमवीरांनी उत्साहाने सहभाग घेतला. खडतर मोहीम पूर्ण झाल्यानंतर पावनखिंड येथे पूजन करून जागतिक विक्रमाची अधिकृत घोषणा करण्यात आली. त्यावेळी उपस्थितांनी “छत्रपती शिवाजी महाराज की जय!” आणि “वीर बाजीप्रभू देशपांडे की जय!” अशा जयघोषांनी संपूर्ण पावनखिंड परिसर दणाणून सोडला. त्यामुळे परिसर पूर्णपणे शिवमय झाला.
या विश्वविक्रमाचे ऑब्झर्व्हर म्हणून सागर बगाडे, राजेंद्र बनसोडे, करण मिरजकर, संदीप ढमढेरे, राणोजी पाटील आणि अक्षय कांबळे यांनी काम पाहिले.
मोहिमेत प्रशासकीय अधिकारी, खेळाडू, युवक-युवती आणि इतिहासप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी प्रमोद माने (महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ), प्रसाद संकपाळ (आपत्ती व्यवस्थापन), नगरसेवक विजय खाडे पाटील (क्रीडा सभापती), सन्मती मिरजे (सहज सेवा ट्रस्ट), उदय गायकवाड (पर्यावरण अभ्यासक), महिबुब मुजावर (ज्येष्ठ गिर्यारोहक), सतीश कुलकर्णी, अमोल कुरणे, विनोद कांबोज, ऋषी केसकर आणि चंदन मिरजकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
हिल रायडर्स फौंडेशनचे प्रमुख प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फौंडेशनच्या शिलेदारांनी या ऐतिहासिक मोहिमेसाठी अहोरात्र परिश्रम घेतले. त्यांच्या अथक मेहनतीला जागतिक स्तरावर मिळालेली ही मान्यता इतिहास संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी आदर्श ठरली आहे.
——————————
४१ वर्षांच्या अखंड परंपरेला जागतिक मान्यता!
RELATED ARTICLES
Mumbai
few clouds
29
°
C
29
°
29
°
79 %
2.6kmh
11 %
Sat
29
°
Sun
29
°
Mon
29
°
Tue
28
°
Wed
28
°

