Homeइतरबाप्पांच्या नैवेद्याला गोडवा; गौराईच्या फराळासाठीही बाजारात लगबग!

बाप्पांच्या नैवेद्याला गोडवा; गौराईच्या फराळासाठीही बाजारात लगबग!

• खवा मोदक, पेढे, लाडूंसह मिठाईला मागणी
कोल्हापूर :
गणेशोत्सवाला सुरुवात होताच गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी लागणाऱ्या विविध गोड पदार्थांना मागणी वाढली आहे. घरगुती गणपतीपासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपर्यंत दररोजच्या नैवेद्यासाठी गोडधोड पदार्थांची खरेदी केली जात आहे. मलई मोदक, खवा मोदक, पेढे, गोड बुंदी, बुंदीलाडू, खाजा यांसह विविध प्रकारच्या मिठाईला ग्राहकांची पसंती मिळत आहे. त्याचबरोबर ज्येष्ठा गौरी आगमनाच्या पार्श्वभूमीवर फराळाच्या पदार्थांच्या खरेदीसाठीही बाजारपेठेत गर्दी वाढली आहे.
गणपती बाप्पांचे १४ सप्टेंबरला घरोघरी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये उत्साहात आगमन झाले. गणरायाच्या आगमनाने शहरातील वातावरण भक्तिमय आणि चैतन्यमय झाले आहे. सकाळ-सायंकाळ आरती झाल्यानंतर बाप्पांना कोणता नैवेद्य दाखवायचा, याची उत्सुकता भाविकांमध्ये असते. त्यामुळे दररोज वेगळा नैवेद्य दाखवण्यासाठी विविध गोड पदार्थांची खरेदी केली जात आहे.
कुणाकडे गणपती दहा दिवस, तर कुणाकडे सात, पाच किंवा दीड दिवसांचा असतो. त्यामुळे गणेशोत्सवाच्या कालावधीत दररोज नैवेद्यासाठी प्रसादाची आवश्यकता असते. यामुळे मिठाईच्या दुकानांमध्ये मलई, खवा, काजू, मावा आणि मॅंगो मोदकांसह विविध प्रकारचे मोदक उपलब्ध झाले असून, त्यांच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. याशिवाय पेढे, बुंदीलाडू, गोड बुंदी, बेसन लाडू, कडक लाडू, खाजा, गोडकांडी, म्हैसूरपाक, गुलाबजाम तसेच विविध प्रकारच्या मिठाईला मागणी आहे.
गौराईच्या फराळासाठीही तयारी….
गणेशोत्सवातील महत्त्वाचा भाग असलेल्या ज्येष्ठा गौरींच्या आगमनाचीही तयारी सुरू झाली आहे. गुरुवारी (दि. १७) ज्येष्ठा गौरी आवाहन, तर शुक्रवारी (दि. १८) ज्येष्ठा गौरी पूजन होणार आहे. गौराईसमोर फराळाचे विविध पदार्थ ठेवण्याची परंपरा असल्याने या पदार्थांच्या खरेदीलाही वेग आला आहे.
बुंदी लाडू, चकली, चिवडा, शेव, शंकरपाळी, बाकरवडी, रवा लाडू, बेसन लाडू, गुलाबजाम आणि मिक्स मिठाई अशा पदार्थांची खरेदी करण्यासाठी मिठाई व फराळाच्या दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या भक्तिमय वातावरणात बाजारपेठेतही गोड पदार्थांचा सुगंध आणि खरेदीची लगबग अनुभवायला मिळत आहे.
           ———–
“गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यंदा पारंपरिक खवा मोदक, पेढे, लाडू आणि गोड बुंदीसोबतच विविध फ्लेवर्सच्या मोदकांना गणेशभक्तांकडून मोठी पसंती मिळत आहे. पिस्ता मलई मोदक, रेडरोज मलई मोदक, मॅंगो, चॉकलेट, कॅडबरी आणि ड्रायफ्रूट मोदकांना विशेष मागणी आहे. गौराईच्या आगमनामुळे बुंदी लाडू, बेसन लाडू तसेच चकली, चिवडा, शेव आदी फराळाच्या पदार्थांच्या विक्रीतही वाढ झाली आहे.”
— शरद सांगावकर,
प्रोप्रायटर, अंबाई फरसाण ॲण्ड स्वीट्स
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28 ° C
28 °
28 °
83 %
2.1kmh
6 %
Wed
28 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
29 °
Sun
29 °

Most Popular

You cannot copy content of this page