Homeकला - क्रीडा'हर हर महादेव'च्या जयघोषात पन्हाळा–पावनखिंड मोहिम

‘हर हर महादेव’च्या जयघोषात पन्हाळा–पावनखिंड मोहिम

• ‘हिल रायडर्स’च्या मोहिमेत ३०० हून अधिक शिवभक्तांचा उत्स्फूर्त सहभाग
कोल्हापूर :
मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा, डोंगर-दऱ्यांमधून वाट काढत येणारे दाट धुके आणि अशा प्रतिकूल हवामानातही शेकडो शिवभक्तांच्या मुखातून घुमणारा ‘हर हर महादेव’चा अखंड जयघोष… अशा वातावरणात हिल रायडर्स ॲडव्हेंचर फौंडेशनच्या वतीने आयोजित पन्हाळा ते पावनखिंड ऐतिहासिक मोहिमेला शनिवारी उत्साहात प्रारंभ झाला. सलग ४१ वर्षांची परंपरा जपत आयोजित करण्यात आलेली ही ७४ वी मोहीम असून, राज्यभरातून आलेल्या ३०० हून अधिक शिवप्रेमींनी    पन्हाळगड परिसर दुमदुमून टाकला. ‘हिल रायडर्स’चे अध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण हिल रायडर्सचे शिलेदार ही मोहीम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहे.
मोहिमेची सुरुवात पन्हाळगडावरील नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते अभिषेक व विधीवत पूजन करून झाली. त्यानंतर ‘ध्येय मंत्र’ आणि ‘प्रेरणा मंत्र’ म्हणण्यात आला. ‘हर हर महादेव’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ आणि ‘नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांचा विजय असो’ या घोषणांनी संपूर्ण परिसर शिवमय झाला. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी प्रमोद माने, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, सहज सेवा ट्रस्टचे सन्मती मिरजे, शिवसेनेचे विजय देवणे, उदय गायकवाड, पन्हाळा नगरपरिषदेचे नगरसेवक आसिफ मोकाशी, दादा नायकवडी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी श्री. सूर्यवंशी यांनी शिवकालीन इतिहास प्रत्यक्ष अनुभवण्याचे महत्त्व आणि आजच्या युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन जीवनाची वाटचाल करण्याची गरज यावर मार्गदर्शन केले. तसेच विनोद कांबोज यांनी मोहिमेची रूपरेषा, दुर्गम मार्गावरील सुरक्षितता, शिस्त आणि आवश्यक खबरदारी याविषयी सविस्तर माहिती दिली. ही मोहीम केवळ ट्रेक नसून ऐतिहासिक युद्धभूमीचा अनुभव असल्याची जाणीव करून देत संपूर्ण मार्ग प्लास्टिकमुक्त ठेवण्याचा संकल्प करण्यात आला. पर्यावरणाचे संवर्धन, स्वच्छता आणि निसर्गाचे संरक्षण याबाबत प्रमोद माने व उदय गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. प्रसाद संकपाळ यांनी आपत्ती व्यवस्थापनाविषयी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.
छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटका करून विशाळगडाकडे प्रस्थान केलेल्या ऐतिहासिक मार्गावरून मोहीमवीर पावनखिंडीकडे मार्गस्थ झाले. मुसळधार पाऊस, डोंगराळ भागातील आव्हाने आणि कठीण वाटा पार करत बाजीप्रभूंच्या पराक्रमाचा प्रेरणादायी वारसा मनात ठेवून शिवभक्तांचा प्रवास सुरू झाला आहे. या मोहिमेत जिल्हा प्रशासनाची आपत्ती व्यवस्थापनाची टीमही सहभागी झाली आहे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
27.8 ° C
27.8 °
27.8 °
81 %
7.8kmh
94 %
Sun
28 °
Mon
29 °
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °

Most Popular

You cannot copy content of this page