Homeसामाजिकपर्यावरण संवर्धनासाठी जिल्हा प्रशासनाचा पुढाकार

पर्यावरण संवर्धनासाठी जिल्हा प्रशासनाचा पुढाकार

• कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणातून मोठ्या वृक्षांचे पुनर्रोपण
कोल्हापूर :
कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरण प्रकल्पासाठी लक्ष्मीवाडी वसाहत, मुडशिंगी येथील घरांचे पुनर्वसन करण्यात आले असून, या परिसरातील पर्यावरणीय समतोल जपण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठ्या वृक्षांचे पुनर्रोपण करण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. या परिसरात वड-३, पिंपळ-१, कडुलिंब-७, चाफा-२, आंबा-५ आणि उंबर-४ अशी एकूण २२ झाडे होती. त्यापैकी चाफ्याची दोन झाडे यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात यशस्वीरीत्या पुनर्रोपित करण्यात आली आहेत. त्यानंतर पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या वृक्षांचे शास्त्रोक्त पद्धतीने स्थलांतर व पुनर्रोपण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या उपक्रमांतर्गत यापूर्वी २४ जून रोजी रमणमळा येथील बहुउद्देशीय हॉल परिसरात जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते वडाच्या एका वृक्षाचे पुनर्रोपण करण्यात आले. त्यानंतर १ जुलै रोजी आणखी चार वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात आले. यामध्ये वडाची तीन व पिंपळाचे एक अशा एकूण चार वृक्षांचा समावेश आहे.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, करवीरच्या उपविभागीय अधिकारी मोसमी चौगुले, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील तसेच करवीरचे तहसीलदार स्वप्निल पवार उपस्थित होते. संबंधित विभागांच्या समन्वयातून अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने वृक्षांची मुळे सुरक्षित ठेवत त्यांचे काळजीपूर्वक स्थलांतर व पुनर्रोपण करण्यात आले.
विकासकामांसोबत पर्यावरण संवर्धनालाही समान प्राधान्य देण्याच्या शासनाच्या भूमिकेची ही कृतीशील अंमलबजावणी असून मोठ्या वृक्षांचे पुनर्रोपण करून त्यांचे संवर्धन करण्याचा हा उपक्रम पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जात असल्याचे उपजिल्हाधिकारी गुरव यांनी सांगितले. पुनर्रोपित वृक्षांची नियमित देखभाल, पाणीपुरवठा आणि आवश्यक निगा राखण्याची व्यवस्था करण्यात आली असून, उर्वरित वृक्षांचेही योग्य ठिकाणी टप्प्याटप्प्याने पुनर्रोपण करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यासोबतच मोठ्या वृक्षांच्या फांद्याही नवीन ठिकाणी लावण्यात आल्या आहेत असे उपविभागीय अधिकारी मोसमी चौगुले यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
29 ° C
29 °
28.9 °
79 %
5.7kmh
94 %
Mon
29 °
Tue
29 °
Wed
28 °
Thu
28 °
Fri
28 °

Most Popular

You cannot copy content of this page