Homeशैक्षणिक - उद्योग उर्जेची बचत व कार्यक्षम वापरातूनच शाश्वत कृषी विकास शक्य : दिनेश कन्नोर

उर्जेची बचत व कार्यक्षम वापरातूनच शाश्वत कृषी विकास शक्य : दिनेश कन्नोर

• डी. वाय. पाटील विद्यापीठ, तळसंदे येथे अक्षय ऊर्जा दिवस साजरा
कोल्हापूर :
वाढती ऊर्जेची गरज आणि बदलते हवामान लक्षात घेता उर्जेची बचत आणि अक्षय ऊर्जा स्रोतांचा कार्यक्षम वापर ही काळाची गरज आहे. सौर, पवन आणि अन्य अक्षय ऊर्जा स्रोतांचा कृषी क्षेत्रातील सिंचन, कृषी यंत्रसामग्री, पीक प्रक्रिया व साठवणुकीसाठी प्रभावी वापर केल्यास उत्पादन खर्च कमी करून शाश्वत कृषी विकास शक्य असल्याचे प्रतिपादन अक्षय ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञ दिनेश कन्नोर यांनी केले.
डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे येथील कृषी अभियांत्रिकी विभागाच्या वतीने ‘शाश्वत विकासासाठी हरित ऊर्जा’ या संकल्पनेवर आधारित अक्षय ऊर्जा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून दिनेश कन्नोर बोलत होते.
ते म्हणाले, पारंपरिक ऊर्जास्रोतांवरील वाढते अवलंबित्व कमी करून सौर आणि पवन ऊर्जेसारख्या अक्षय ऊर्जेचा योग्य पद्धतीने वापर केल्यास कृषी उत्पादनातील ऊर्जा खर्च कमी करण्याबरोबरच पर्यावरणाचे संरक्षणही करता येईल. त्यामुळे  ऊर्जा बचत ही केवळ खर्च कमी करण्याची बाब नसून भविष्यातील शाश्वत विकासाचा महत्त्वाचा आधार आहे.
कुलसचिव डॉ. जयेंद्र ए. खोत यांच्या स्वागतपर भाषणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. वाढती ऊर्जेची गरज, ऊर्जा संवर्धनाचे महत्त्व आणि पर्यावरणपूरक ऊर्जा स्रोतांचा स्वीकार याकडे त्यांनी लक्ष वेधले. विद्यार्थ्यांनी आधुनिक व शाश्वत तंत्रज्ञानाचा अभ्यास करून भविष्यातील ऊर्जा आव्हानांवर नाविन्यपूर्ण उपाय विकसित करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
कृषी अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. मंगल ए. पाटील यांनी कार्यक्रमाची संकल्पना व उद्दिष्टे स्पष्ट केली. कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले ‘रिन्युएबल एनर्जी’ विषयावरील पोस्टर प्रदर्शन विशेष आकर्षण ठरले. सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, ऊर्जा संवर्धन, ऊर्जा कार्यक्षमता, हरित ऊर्जा आणि कृषी क्षेत्रातील अक्षय ऊर्जेचा वापर या विषयांवर विद्यार्थ्यांनी माहितीपूर्ण व नाविन्यपूर्ण पोस्टर्स सादर केली.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डॉ. बाबासाहेब घोलप व डॉ. अमोल गोरे यांनी विशेष परिश्रम घेतले. केतन सूर्यवंशी व प्रतीक्षा साळोखे यांनी सूत्रसंचालन केले.
कुलपती डॉ. संजय डी. पाटील, प्र-कुलपती ऋतुराज पाटील, कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता आणि अधिष्ठाता डॉ. वाय. एम. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
28 ° C
28 °
28 °
83 %
4.6kmh
97 %
Mon
28 °
Tue
29 °
Wed
29 °
Thu
29 °
Fri
28 °

Most Popular

You cannot copy content of this page