Homeसामाजिकपालकमंत्री थेट शेताच्या बांधावर

पालकमंत्री थेट शेताच्या बांधावर

• ‘एक दिवस बळीराजासाठी’ उपक्रमांतर्गत केली भात लावणी
कोल्हापूर :
बळीराजाच्या अडीअडचणी आणि शेतीचे प्रश्न थेट बांधावर जाऊन समजून घेण्यासाठी कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज एक आगळावेगळा पुढाकार घेतला. ‘एक दिवस बळीराजासाठी’ या विशेष उपक्रमांतर्गत आजरा तालुक्यातील मसोली येथे चिखलात उतरून पालकमंत्र्यांनी स्वतः रोटावेटर चालवत चिखलणी केली, तसेच पारंपरिक पद्धतीने भात रोपलावणी व बांधबंदिस्तीच्या कामात प्रत्यक्ष सहभाग घेतला. पालकमंत्र्यांच्या या उपक्रमामुळे आज विविध लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी जिल्ह्यातील तब्बल ३०० गावांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले होते.
जिल्ह्यात सध्या पावसाळी हंगामातील भातशेतीची कामे अंतिम टप्प्यात असून, लावणीला वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मसोली येथील शेतकरी सुरेश होडगे यांच्या शेताला भेट दिली. केवळ औपचारिक भेट न देता, पालकमंत्र्यांनी थेट भातखाचरात उतरून चिखलणीच्या कामात रोटावेटर चालवला. त्यानंतर हातात भाताची रोपे घेत महिला भगिनी व शेतकऱ्यांच्या सोबतीने पारंपरिक पद्धतीने रोपलावण केली. शेताचे बांध मजबूत करण्याच्या कामातही त्यांनी हातभार लावला.
रासायनिक खतांचा वापर टाळून नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने यावेळी शेतात प्रत्यक्ष ‘जीवामृत’ तयार करण्याची प्रक्रिया राबवण्यात आली. जीवामृतासाठी लागणारे आवश्यक घटक, त्याचे योग्य प्रमाण आणि पिकांसाठी होणारे फायदे याविषयी कृषी अधिकाऱ्यांनी माहिती दिली. पालकमंत्र्यांनी स्वतः या प्रक्रियेत सहभागी होत जीवामृत निर्मितीची सविस्तर माहिती घेतली व नैसर्गिक शेतीची व्याप्ती वाढवण्याचे आवाहन केले.
शेतीची कामे आटोपल्यानंतर पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी गाव परिसरातील पद्धतीने, शेतकऱ्यांसोबत शेताच्या बांधावर बसूनच झुणका-भाकरीचा आस्वाद घेतला. या जेवणादरम्यान रंगलेल्या अनौपचारिक गप्पांमधून त्यांनी शेतकऱ्यांच्या दैनंदिन समस्या जाणून घेतल्या.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा उपक्रम उत्पादन वाढीसाठी आणि शेतकरी-प्रशासन यांमधील दरी मिटवण्यासाठी मैलाचा दगड ठरत आहे. आज एकाच दिवशी जिल्ह्यातील ३०० गावांमध्ये लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाचे अधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले होते.
या मोहिमेत आजरा येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, प्रांताधिकारी हरीश सुळ, तहसीलदार समीर माने, सरपंच चंद्रकांत गुरव यांच्यासह विविध विभागांचे शासकीय अधिकारी, महिला शेतकरी, ग्रामस्थ आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या उपक्रमात मागेल त्याला काजू कलमे अंतर्गत १ लाख काजू कलमे वाटप व लागवाड केली जाणार आहे. याअंतर्गत काजू कलमांचे वाटप व बी- बियाणे वाटप प्रातिनिधिक पद्धतीने करण्यात आले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28 ° C
28.9 °
28 °
78 %
5.1kmh
41 %
Mon
29 °
Tue
29 °
Wed
29 °
Thu
29 °
Fri
29 °

Most Popular

You cannot copy content of this page