Homeकला - क्रीडाहिल रायडर्सतर्फे यंदा अमृतमहोत्सवी पन्हाळा ते पावनखिंड मोहिम

हिल रायडर्सतर्फे यंदा अमृतमहोत्सवी पन्हाळा ते पावनखिंड मोहिम

कोल्हापूर :
ऐतिहासिक वारसा जपणारी आणि साहसाची परंपरा जोपासणारी कोल्हापूरची अग्रगण्य संस्था हिल रायडर्स ॲडव्हेंचर फाउंडेशनतर्फे यंदा अमृतमहोत्सवी ‘पन्हाळा ते पावनखिंड मोहिम’ आयोजित करण्यात येत असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद पाटील व विनोद कांबोज यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की, यंदा संस्था आपल्या ४१व्या वर्षात अमृतमहोत्सवी मोहिम  करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, स्वामीनिष्ठ शिवा काशिद, नरवीर बाजीप्रभू देशपांडे व ज्ञात अज्ञात शुरवीर मावळ्यांच्या जाज्वल्य इतिहासाची स्मृती जागृत ठेवणाऱ्या या राज्यस्तरीय मोहिमेची तयारी सुरू आहे. यंदा महाराष्ट्र व इतर राज्यांतून शेकडो शिवभक्त – शिवप्रेमी आणि मोहिमवीर यामध्ये सहभागी होणार आहेत.
पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती या ऐतिहासिक मोहिमेची सुरुवात १२ जुलै १९८६ मध्ये झाली. सर्व शिवभक्त, गडप्रेमी आणि निसर्गप्रेमींसाठी हिल रायडर्सने ही मोहीम व्यापक आणि संस्थात्मक स्वरूपात सुरू केली. या मोहिमेला तब्बल ४० वर्षे पूर्ण होत असून, तिचे सातत्य कायम राखत या उपक्रमाला आता राज्यस्तरीय स्वरूप प्राप्त झाले आहे. शिवभक्तांचा वाढता वाढता प्रतिसाद पाहता, गेल्या काही वर्षांपासून वर्षातून दोन ते तीन मोहिमा राबवाव्या लागत आहेत. यावर्षी तीन मोहिमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये ७४वी मोहीम ४ जुलै २०२६ तर ७५वी मोहीम १८ जुलै तसेच ७६वी मोहीम १ ऑगस्ट २०२६ आयोजित केली आहे.
हिल रायडर्स परिवाराने गेल्या ४० वर्षांत केवळ पदभ्रमंती न करता, या मार्गावरील दुर्गम गावांच्या आणि वाड्या-वस्त्यांच्या विकासासाठी सातत्याने सामाजिक बांधिलकी जपली आहे. या अंतर्गत करपेवाडी, अंबेवाडी येथील हॉल बांधण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न  करण्यात आले आहे. तसेच, या मार्गावरील दुर्गम वाड्या-वस्त्यांमधील गरीब मुले-मुली शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून त्यांना दरवर्षी शालेय साहित्याचे वाटप केले जाते. अनेक शाळांना संगणक संच भेट देण्यात आले. ग्रामीण भागात आरोग्य शिबिरांचेही आयोजन केले जाते.
यंदाच्या अमृतमहोत्सवी मोहिमेचे आणखी एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे, महाराष्ट्रातील ४ ते ५ जिल्ह्यांमधून ६० ते ७० मुखबधीर बांधव या पदभ्रमंतीमध्ये सहभागी होणार आहेत. आजवर हजारो मोहीमवीरांनी ही मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली आहे. पहिल्या मोहिमेत (१९८६ साली) सहभागी झालेल्या पालकांची मुले आणि आता त्यांची नातवंडेही यात सहभागी होत आहेत. गेल्या ४० वर्षांपासून अविरतपणे पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती सुरू आहे. यंदाच्या या अमृतमहोत्सवी मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
       ————-
दिवंगत सदस्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘शिलेदार स्कॉलरशिप’….
यंदाच्या अमृतमहोत्सवी मोहिमेचे औचित्य साधून हिल रायडर्सचे दिवंगत सदस्य सूरज डोली आणि युवराज साळोखे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक विशेष उपक्रम सुरू करण्यात येत आहे. या अंतर्गत दुर्गम व डोंगरी भागातील शाळांमधील इयत्ता ७वी, ८वी आणि ९वी मध्ये प्रथम आलेल्या मुले-मुलींना ‘शिलेदार स्कॉलरशिप’ देण्यात येणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी उपयुक्त ठरेल असे शालेय साहित्य आणि एक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28 ° C
28 °
26.9 °
83 %
7.2kmh
7 %
Fri
30 °
Sat
29 °
Sun
29 °
Mon
29 °
Tue
28 °

Most Popular

You cannot copy content of this page