Homeराजकियकर सुधारणा विधेयकामुळे गुंतवणूक, उद्योग आणि रोजगाराला चालना

कर सुधारणा विधेयकामुळे गुंतवणूक, उद्योग आणि रोजगाराला चालना

• खासदार धनंजय महाडिक यांनी मांडली राज्यसभेत भूमिका
कोल्हापूर :
भारताची अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी करव्यवस्था सुलभ करणे आणि देशात परदेशी गुंतवणूक वाढवणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने कर आकारणी आणि कायदे सुधारणा विधेयक महत्त्वाचे पाऊल आहे, असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केले. राज्यसभेत बोलताना खासदार महाडिक यांनी केंद्र सरकारच्या या नव्या विधेयकाचे जोरदार समर्थन केले.
नवी दिल्लीत सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. केंद्र सरकारने नुकतेच कर आकारणी आणि इतर कायदे सुधारणा विधेयक मांडले आहे. त्याबद्दलच्या चर्चेत सहभागी होवून खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्र सरकारच्या गेल्या १० वर्षातील करसुधारणांचा उल्लेख केला. भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यासाठी जगभरातील भांडवल, आधुनिक तंत्रज्ञान आणि गुंतवणूक भारताकडे आकर्षित करणे गरजेचे आहे. भारतातील करव्यवस्था सुलभ आणि स्थिर केल्यामुळे जगभरातील गुंतवणूकदारांचा भारतावरील विश्वास वाढत असल्याचा दावा खासदार महाडिक यांनी केला. या विधेयकातील तरतुदींचा उल्लेख करत, सरकारी सिक्युरिटीजमधून मिळणार्‍या उत्पन्नावर कर सवलत देण्याच्या प्रस्तावाचे त्यांनी स्वागत केले. यामुळे सरकारी रोख्यांमध्ये परदेशी गुंतवणूक वाढण्यास मदत होईल आणि विकासकामांसाठी भांडवल उभारणे अधिक सुलभ होईल, असे खासदार महाडिक म्हणाले.
भारताच्या हिरे उद्योगालाही या विधेयकाचा फायदा होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. मोबाईल, लॅपटॉप आणि सर्व्हर निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या परदेशी घटकांबाबतच्या कर सवलतींमुळे, मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत योजनांना बळ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच विदेशी गुंतवणूक निधीसाठी, काही अटी शिथिल केल्याने गिफ्ट सिटीला आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र म्हणून चालना मिळेल, असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला. तर डेटा सेंटर क्षेत्रासाठी प्रस्तावित कर सवलतींमुळे भारताला जागतिक डिजिटल केंद्र बनवण्यास मदत होईल, असा दावा महाडिक यांनी केला.
दरम्यान, युपीआय व्यवहारांवर शुल्क आकारले जाणार असल्याच्या चर्चेवरूनही, त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. सामान्य नागरिकांसाठी युपीआय व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे विरोधकांनी जनतेची दिशाभूल करू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
खा. धनंजय महाडिक यांनी संसदेत उपस्थित केलेल्या अभ्यासपूर्ण मुद्द्यांची केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विशेष दखल घेतली. युपीआयच्या व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, असे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
haze
31 ° C
31 °
30.9 °
70 %
7.2kmh
75 %
Wed
30 °
Thu
29 °
Fri
28 °
Sat
28 °
Sun
28 °

Most Popular

You cannot copy content of this page