• ‘१०० दिवस भारत क्लायमेट सत्याग्रह यात्रा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
कोल्हापूर :
शाश्वत जीवनशैलीचा स्वीकार हाच हवामान बदलावर प्रभावी उपाय आहे. ऊर्जेचा संयमी वापर आणि प्रत्येक नागरिकाचा छोटा-छोटा सहभाग मिळूनच पर्यावरण संरक्षणाची मोठी चळवळ उभी राहू शकते, असे प्रतिपादन आयआयटी मुंबईचे माजी प्राध्यापक, एनर्जी स्वराज फाउंडेशनचे संस्थापक आणि ‘सोलर मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाणारे प्रा. चेतनसिंह सोलंकी यांनी केले.
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट येथे फायनाईट अर्थ मूव्हमेंट अंतर्गत कार्यरत क्लायमेट ॲक्शन हबच्या वतीने देशभर सुरू असलेल्या ‘१०० दिवस भारत क्लायमेट सत्याग्रह यात्रा’ या अभियानाला पाठिंबा देण्यासाठी जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रा. सोलंकी यांनी हवामान बदलाची तीव्रता, वाढते जागतिक तापमान, ऊर्जा वापरातील असंतुलन आणि त्याचे पर्यावरणावर होणारे परिणाम यांची सविस्तर मांडणी केली. हवामान बदलाचा सामना केवळ सरकारी धोरणांनी होणार नाही, तर प्रत्येक नागरिकाने आपल्या दैनंदिन जीवनात ऊर्जा बचत, संसाधनांचा योग्य वापर आणि पर्यावरणपूरक सवयींचा स्वीकार करणे आवश्यक आहे. “फायनाईट लिव्हिंग” अर्थात संयमी, जबाबदार आणि शाश्वत जीवनशैली हीच भविष्यातील सुरक्षित आणि समृद्ध पृथ्वीची गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा. चेतनसिंह सोलंकी म्हणाले, आपण गरज आणि इच्छा यांतील फरक समजून घेतला, तरच हवामान बदलाचा वेग कमी करता येईल. केवळ फॅशन किंवा आकर्षणासाठी वारंवार नवीन खरेदी करण्याऐवजी आवश्यक तेव्हाच खरेदी करावी, पुनर्वापर आणि जबाबदारीने वापर करावा, असा संदेश त्यांनी दिला.
यावेळी सर्व विद्यार्थी, प्राध्यापक आणि उपस्थित नागरिकांनी पृथ्वीवरील मर्यादित संसाधनांचे जतन करण्याचा, ऊर्जा आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा मितव्ययी वापर करण्याचा, पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारण्याचा संकल्प केला.
सध्या सुरू असलेल्या ‘१०० दिवस भारत क्लायमेट सत्याग्रह यात्रा’ अंतर्गत प्रा. सोलंकी देशातील ५१ शहरांमध्ये सुमारे ५,८०० किलोमीटरचा प्रवास करत विविध शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना आणि नागरिकांशी संवाद साधत आहेत. या यात्रेचा उद्देश हवामान बदलाविषयी जनजागृती निर्माण करणे, नवीकरणीय ऊर्जेचा प्रसार करणे आणि समाजात हवामान कृतीसाठी व्यापक लोकसहभाग निर्माण करणे हा आहे.
अमित जाधव यांनी प्रास्ताविक केले. स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे संचालक डॉ. अजित पाटील यांनी स्वागतपर भाषणात संस्थेच्या क्लायमेट ॲक्शन हबमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध पर्यावरणपूरक उपक्रमांची माहिती दिली.
कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांनी हवामान बदल ही केवळ पर्यावरणाची नव्हे तर सामाजिक आणि आर्थिक विकासाशी निगडित गंभीर समस्या असल्याचे नमूद केले. विद्यार्थ्यांनी शाश्वत विकासाची मूल्ये आत्मसात करून समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचे नेतृत्व करावे, असा संदेश त्यांनी दिला.
सूत्रसंचालन डॉ. रेणुका तुरुंबेकर यांनी केले तर अभिजित पाटील यांनी आभार मानले. यावेळी कुलसचिव डॉ. व्ही.व्ही. भोसले, आयक्यूएसी संचालिका डॉ. शिम्पा शर्मा, डेप्युटी रजिस्ट्रार अश्विन देसाई, विविध संस्थांचे प्राचार्य, डीन, संचालक, विभागप्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी तसेच पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————————
शाश्वत जीवनशैलीचा स्वीकार हाच हवामान बदलावर प्रभावी उपाय : प्रा. चेतनसिंह सोलंकी
RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
29.2
°
C
29.2
°
29.2
°
77 %
7.9kmh
100 %
Sat
29
°
Sun
29
°
Mon
29
°
Tue
29
°
Wed
29
°

