Homeकला - क्रीडापुणे आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर राउंड रॉबिन बुद्धिबळ स्पर्धेत अभिजीत गुप्ता विजेता

पुणे आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर राउंड रॉबिन बुद्धिबळ स्पर्धेत अभिजीत गुप्ता विजेता

• अश्वथ एस बनला भारताचा ९८वा ग्रँडमास्टर
कोल्हापूर :
बुद्धिबळ क्रीडा ट्रस्ट आयोजित पुणे आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर राउंड रॉबिन बुद्धिबळ स्पर्धेत अव्वल मानांकित ग्रँडमास्टर भारताच्या अभिजीत गुप्ताने ७.५ गुणांसह अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले. तर, आंतरराष्ट्रीय मास्टर अश्वथ एस याने ७ गुणांसह दुसरा क्रमांक, तसेच अखेरच्या तिसऱ्या नॉर्म सह ग्रँडमास्टर किताब पटकावला. तो भारताचा आता पर्यंतचा ९८वा ग्रँडमास्टर ठरला. भारताच्या ग्रँडमास्टर कुशाग्र मोहनने ६.५ गुणांसह तिसऱ्या क्रमांकाची निश्चिती केली. तर, पुण्याचा फिडे मास्टर अद्विक अगरवाल याने  ५ गुणांसह आंतरराष्ट्रीय मास्टर किताबाचा दुसरा नॉर्म पटकावला.
मुंडवा येथे ‘द फेर्न हॅबिटॅट’ येथे सुरु झालेल्या या स्पर्धेत राउंड रॉबिन नवव्या फेरीत अव्वल मानांकित ग्रँडमास्टर भारताच्या अभिजीत गुप्ताने श्रीलंकेचा आंतरराष्ट्रीय मास्टर डिसिल्वा एलएमएसटीवर निर्णायक विजय मिळवला. तर, आंतरराष्ट्रीय मास्टर अश्वथ एस याने अमेरिकेच्या फिडे मास्टर वैद्यनाथन कन्नन याचा पराभव केला. तिसऱ्या लढतीत भारताच्या आंतरराष्ट्रीय मास्टर अक्षय बोरगावकर याने भारताच्या नितीश बेलुरकरवर मात केली.
नवव्या फेरीतील उत्कंठावर्धक लढतीत अश्वथ एस याने किंग्ज इंडियन डिफेन्स प्रकारच्या बचावाने डावाची सुरुवात केली. तत्पूर्वी कन्नन याने डी४ ही चाल करत डावाला प्रारंभ केला. त्यानंतर अश्वथने घोड्याची आक्रमक चाल करताना एक नजरचुक केली. त्यामुळे त्याची स्थिती खूपच बिघडली होती. मात्र, त्याने झुंजार खेळ करत डाव लांबवण्यात यश मिळवले. डावाच्या अखेरीस अश्वथने पुन्हा एकदा केलेल्या चुकीचा फायदा कन्नन याला घेता आला नाही. यावेळी मात्र अश्वथने कोणतीही चूक न करता विजयाची नोंद केली आणि ग्रँड मास्टर किताबावर शिक्कामोर्तब केले.
स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला करंडक व १ लाख रुपये, तर उपविजेत्या खेळाडूला करंडक व ७५,००० रुपये अशी पारितोषिके देण्यात आली. याशिवाय अद्विक अगरवाल याला आंतरराष्ट्रीय मास्टर नॉर्म मिळवल्याबद्दल २५,०००रुपये अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण भारताच्या ऐतिहासिक ऑलिम्पियाड सुवर्ण पदक विजेत्या पुरुष संघाचे कर्णधार ग्रँड मास्टर श्रीनाथ नारायणन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हॅबिटॅटचे मालक बलराज घई, एमसीएचे सचिव निरंजन गोडबोले, सह सचिव सतीश ठाकूर, आंतरराष्ट्रीय मास्टर अभिषेक केळकर, चीफ आरबीटर आर श्रीवत्सन, डेप्युटी चीफ आरबीटर आयए अथर्व गोडबोले आणि आयए दिप्ती शिदोरे आदी उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28 ° C
28 °
28 °
78 %
5.1kmh
77 %
Fri
29 °
Sat
28 °
Sun
28 °
Mon
29 °
Tue
28 °

Most Popular

You cannot copy content of this page