कोल्हापूर :
गझल या काव्यप्रकाराला पाचशे वर्षांची समृद्ध परंपरा असून ती फारसी भाषेतून उर्दूत आणि त्यानंतर विविध भाषांमध्ये पोहोचली आहे. कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त आशय व्यक्त करणारा आणि रसिकांचे मनोरंजन करताना त्यांची बौद्धिक भूकही भागवणारा सर्वोत्तम काव्यप्रकार म्हणजे गझल, असे प्रतिपादन ज्येष्ठ गझलकार प्रसाद कुलकर्णी यांनी केले.
प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेच्या ‘स्नेह संगीत प्रतिज्ञा’ उपक्रमांतर्गत प्रतिज्ञा आणि गझलसाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘गझलरंग’ कार्यक्रमात ते बोलत होते.
‘एक रविवार एक गझल’ या त्यांच्या यूट्यूब मालिकेचे सलग सहा वर्षे ३१४ भाग पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित विशेष कार्यक्रमात ज्येष्ठ गझलकार प्रा. नरहर कुलकर्णी यांनी त्यांची मुलाखत घेतली.
गझलरंग या विषयाचे विवेचन करताना प्रसाद कुलकर्णी म्हणाले की, मराठीत ‘गझलेची बाराखडी’ लिहून शास्त्रशुद्ध गझलेची ओळख अर्धशतकापूर्वी सुरेश भट यांनी करून दिली. मराठी गझल समृद्ध करण्यामध्ये त्यांचे योगदान अतुलनीय आहे. उत्कृष्ट रचना, तंत्रशुद्धता आणि छंदोबद्धता ही गझलेची प्रमुख वैशिष्ट्ये असून गझलेला स्वतःचे व्याकरण असते. बंधने असूनही बंधमुक्त अभिव्यक्ती आणि हळुवारपणा जपत कठोर प्रहार करण्याची क्षमता ही गझलेची खरी ओळख असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठी कवितेला आठ शतकांची परंपरा असून आख्यानकाव्य, पोवाडा, खंडकाव्य, महाकाव्य यांसारख्या कथात्मक प्रकारांबरोबरच ओवी, अभंग, भारूड, लावणी, सुनीते आणि गझल यांसारखे भावकाव्य प्रकारही समृद्ध परंपरा जपत असल्याचे त्यांनी नमूद केले. अलिकडच्या काळात गझल हा काव्यप्रकार विशेष लोकप्रिय झाला असून तिची हृदयप्रियता, कर्णप्रियता आणि नयनप्रियता ही वैशिष्ट्ये रसिकांना आकर्षित करतात, असे ते म्हणाले.
वेदना आणि संवेदना यांतूनच गझलेचा जन्म होतो. गझल ही सहज निर्माण होत नाही; ती प्रसववेदनांमधून आकाराला येते. त्यामुळे गझलेतील शेर थेट काळजाला भिडतात. गझल लिहिणाऱ्यांनी वृत्त, काफिया, रदीफ, मतला, गझलियत यांचा सखोल अभ्यास करावा. केवळ दोन ओळी एकत्र केल्याने शेर तयार होत नाही, तर त्यामागे आशय, परस्परसंबंध आणि परिपूर्ण अभिव्यक्ती आवश्यक असते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी नवोदित गझलकारांना मार्गदर्शन केले तसेच गझल रसिकांनी गझल कशी ऐकावी आणि समजून घ्यावी याबाबतही सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी विविध विषयांवरील स्वतःच्या गझलांचे सादरीकरण केले.
कार्यक्रमात जाणीव फाउंडेशनच्या संचालिका सुषमाताई बटकडली यांच्या हस्ते प्रसाद कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच नवोदित गझलकारांसाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कार्यशाळा लवकरच आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. प्रशांत जोशी यांनी आभार प्रदर्शन केले.
——————————
गझल म्हणजे जगण्याचा गंध पकडणारी काव्यविधा : प्रसाद कुलकर्णी
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28
°
C
28
°
26.9
°
83 %
7.2kmh
7 %
Fri
30
°
Sat
29
°
Sun
29
°
Mon
29
°
Tue
28
°

