Homeशैक्षणिक - उद्योग 'कलापुरी'चे लक्ष्मीपुरीत कलादालन सुरू

‘कलापुरी’चे लक्ष्मीपुरीत कलादालन सुरू

कोल्हापूर :
ग्रामीण भागातील महिला कारागिरांच्या हस्तकलेला देश-विदेशात ओळख मिळवून देणाऱ्या ‘कलापुरी’ या कोल्हापूरस्थित स्टार्टअपने आता गुरुकुल टॉवर्स, सुभाष रोड लक्ष्मीपुरी परिसरात हस्तकलेसाठी समर्पित ‘कलापुरी कलादालन’ सुरू केले आहे. रविवारी (दि.२) या कलादालनाचे लोकार्पण होणार आहे. यानिमित्त प्रत्येक खरेदीवर भरघोस सूट व एक विशेष भेटवस्तू देण्यात येणार असल्याची माहिती श्रीधर वैद्य, संस्थापिका सौ. अपर्णा चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आतिश चव्हाण, अमृता काळे उपस्थित होते.
सौ. अपर्णा चव्हाण आणि आतिश चव्हाण यांनी ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या उद्देशाने सुरू केलेल्या ‘कलापुरी’ने गेल्या दहा वर्षांत ५०० हून अधिक महिला कारागिरांना घरबसल्या रोजगार उपलब्ध करून दिला आहे. कोल्हापुरी चप्पल, पारंपरिक कोल्हापुरी दागिने आणि हँडमेड बास्केट यांसारख्या ग्रामीण हस्तकलेच्या उत्पादनांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्यात ‘कलापुरी’ने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
ते म्हणाले की, ग्रामीण कारागिरांना कौशल्याधारित प्रशिक्षण, आवश्यक साधने व कच्चा माल उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्या उत्पादनांच्या विपणनाची संपूर्ण जबाबदारी ‘कलापुरी’ पार पाडत आहे. ‘कलापुरी’च्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने नुकताच हस्तकला क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी संस्थेचा गौरव केला आहे. मोरेवाडी- मल्हारपेठ (ता. पन्हाळा) येथील कोल्हापुरी चप्पल युनिट, यळगुड (ता. हातकणंगले) येथील पारंपरिक दागिने युनिट आणि सोनी (ता. मिरज) येथील हँडमेड बास्केट युनिटच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.
लक्ष्मीपुरी येथील नव्या कलादालनात जी.आय. मान्यताप्राप्त कारागिरांनी तयार केलेल्या विविध डिझाईन्समधील आरामदायी कोल्हापुरी चप्पल, कोल्हापुरी साज, ठुशी, बोरमाळ यांसह विविध पारंपरिक दागिने आणि दैनंदिन वापरासाठी उपयुक्त हँडमेड बास्केट विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.
कोल्हापूरला भेट देणाऱ्या पर्यटकांना खात्रीशीर आणि अस्सल कोल्हापुरी हस्तकला एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी, तसेच ग्रामीण महिला कारागिरांच्या कलाकृतींना स्थानिक बाजारपेठ मिळावी, या उद्देशाने हे कलादालन सुरू करण्यात आल्याचे संस्थापक आतिश चव्हाण यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28.3 ° C
28.3 °
28.3 °
85 %
9.8kmh
99 %
Sat
28 °
Sun
29 °
Mon
28 °
Tue
28 °
Wed
29 °

Most Popular

You cannot copy content of this page