Homeशैक्षणिक - उद्योग शिवाजी विद्यापीठाच्या संशोधक तब्बू शेख यांना नोबेल विजेत्यांशी संवाद साधण्याची संधी

शिवाजी विद्यापीठाच्या संशोधक तब्बू शेख यांना नोबेल विजेत्यांशी संवाद साधण्याची संधी

कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागातील पीएच.डी. संशोधक विद्यार्थिनी तब्बू शेख यांना नोबेल पुरस्कार विजेत्या शास्त्रज्ञांशी थेट संवाद साधण्याची आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेची संधी मिळाली आहे.
येत्या फेब्रुवारीत जपानमध्ये आयोजित १८व्या ‘होप मीटिंग’साठी देशभरातून निवडलेल्या अवघ्या नऊ विद्यार्थ्यांमध्ये त्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, शिवाजी विद्यापीठातून या प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमासाठी निवड होणाऱ्या तब्बू शेख या पहिल्याच विद्यार्थिनी आहेत.
जपान सोसायटी फॉर द प्रमोशन ऑफ सायन्स यांच्या वतीने २८ फेब्रुवारी ते ४ मार्च २०२७ या कालावधीत योकोहामा (जपान) येथे होप परिषद आयोजित केली आहे. आशियाई देशांमधील तसेच अन्य पात्र प्रदेशांतील युवा संशोधकांना नोबेल पुरस्कार विजेते आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या शास्त्रज्ञांशी संवाद साधण्याची, संशोधनविषयक विचारांची देवाणघेवाण करण्याची आणि विज्ञान-तंत्रज्ञानातील अत्याधुनिक संशोधनाची ओळख करून घेण्याची संधी या उपक्रमातून मिळते.
तब्बू शेख यांनी शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पदवी शिक्षणापासून त्यांना केंद्र सरकारची डीएसटी-इन्स्पायर फेलोशिप मिळाली. पदव्युत्तर परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक मिळवून शिवाजी विद्यापीठाचे सुवर्णपदक पटकावले. सध्या त्या रसायनशास्त्र अधिविभागातील डॉ. संजय कोलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. संशोधन करीत आहेत.
त्यांच्या संशोधनाची दखल राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली आहे. दक्षिण कोरिया सरकारच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी विनिमय कार्यक्रमांतर्गत त्यांची तेथील चोन्नम नॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये संशोधनासाठी निवड झाली. तसेच, दक्षिण कोरिया सरकारची गुणवंत परदेशी विनिमय विद्यार्थ्यांसाठीची प्रतिष्ठेची ‘ग्लोबल कोरिया स्कॉलरशिप २०२६’ही त्यांना प्राप्त झाली. मेटल-ऑरगॅनिक फ्रेमवर्क्स या विषयातील त्यांचे संशोधन २०२५ च्या नोबेल पुरस्कार विजेत्या संशोधनाशी सुसंगत आहे. त्यांचे १५ शोधनिबंध आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रकाशित झाले आहेत.
“शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थिनीला नोबेल पुरस्कार विजेत्या शास्त्रज्ञांशी संवाद साधण्याची संधी मिळणे, ही विद्यापीठासाठी अत्यंत अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे. त्यांच्या या निवडीमुळे विद्यापीठातील संशोधक विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर संशोधन करण्याची आणि मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा मिळेल. विद्यापीठातील संशोधनाची गुणवत्ता आणि युवा संशोधकांची क्षमता यातून अधोरेखित झाली आहे,” अशा शब्दांत कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी तब्बू शेख यांचे अभिनंदन केले आहे.
प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, रसायनशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. संजय चव्हाण यांनीही तब्बू शेख यांचे अभिनंदन केले आहे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
26 ° C
26 °
26 °
57 %
3.6kmh
52 %
Sat
30 °
Sun
28 °
Mon
28 °
Tue
28 °
Wed
29 °

Most Popular

You cannot copy content of this page