Homeसामाजिकडॉ. जयसिंगराव पवार यांना यंदाचा राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर

डॉ. जयसिंगराव पवार यांना यंदाचा राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर

• राजर्षी शाहू महाराजांच्या जयंती दिनी २६ जूनला पुरस्कार वितरण
कोल्हापूर :
राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट, कोल्हापूरच्या वतीने दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा आणि मानाचा ४०वा ‘राजर्षी शाहू पुरस्कार – २०२६’ ज्येष्ठ इतिहासकार आणि शाहू विचारांचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर जागर करणारे विचारवंत डॉ. जयसिंगराव पवार यांना मरणोपरांत प्रदान करण्याचे ट्रस्टने जाहीर केले आहे. या पुरस्काराची घोषणा ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात केली. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त तथा महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, डॉ. अशोक चौसाळकर, सदस्य सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, विश्वस्त तथा जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ उपस्थित होते.
समाज प्रबोधन, समाजसेवा, साहित्य, कला, संस्कृती, संगीत, शिक्षण आणि क्रीडा या क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महनीय व्यक्तींना १९८४ पासून हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. राजर्षी शाहू महाराजांच्या १५२ व्या जयंती दिनी, म्हणजेच २६ जून २०२६ रोजी सायंकाळी ६:३० वाजता शाहू स्मारक येथे या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
महाराष्ट्रातील ज्येष्ठ आणि व्यासंगी इतिहास संशोधक म्हणून डॉ. जयसिंगराव पवार यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य मराठेशाहीचा इतिहास आणि राजर्षी शाहू महाराजांचे पुरोगामी विचार जगभरात पोहोचवण्यासाठी समर्पित केले. सांगली जिल्ह्यातील तडसर येथे ३० डिसेंबर १९४१ रोजी जन्मलेल्या डॉ. पवार यांनी कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमधून उच्च शिक्षण घेऊन शिवाजी विद्यापीठातून इतिहासात प्रथम क्रमांकाने एम.ए. आणि त्यानंतर पीएच.डी. पूर्ण केली. त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास विभागात प्राध्यापक म्हणून प्रदीर्घ काळ काम केले असून विद्यापीठाच्या राजर्षी शाहू संशोधन केंद्राचे मानद संचालक म्हणूनही त्यांची कारकीर्द अत्यंत उल्लेखनीय राहिली आहे.
डॉ. पवार यांनी मराठा इतिहासातील अनेक दुर्लक्षित पैलूंवर सखोल प्रकाश टाकत ४० हून अधिक ग्रंथांचे लेखन व संपादन केले आहे. त्यांनी संपादित केलेला तब्बल १२५० पानांचा ‘राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ’ हा इतिहास संशोधनातील एक महत्त्वाचा मैलाचा दगड मानला जातो. एवढेच नव्हे तर त्यांच्या पुढाकाराने आणि महाराष्ट्र इतिहास प्रबोधनीच्या माध्यमातून शाहू महाराजांचे चरित्र मराठीसह अनेक भारतीय व परकीय भाषांमध्ये अनुवादित करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर तब्बल २५ वर्षे मराठ्यांनी औरंगजेबाच्या बलाढ्य सैन्याविरुद्ध जो रोमहर्षक आणि देदिप्यमान लढा दिला, त्याचा साधार इतिहास डॉ. पवार यांनी जगासमोर आणला.
त्यांच्या या अविरत ज्ञानसाधनेची दखल घेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचा गौरव करण्यात आला आहे. सन २००९ मध्ये महाराष्ट्र विधानमंडळातर्फे प्रकाशित राजर्षी शाहू छत्रपतींच्या जीवन व कार्यावरील ग्रंथांचे विमोचन देशाच्या तत्कालीन राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते झाले होते, तर २०१३ मध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्तेही त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला होता. त्यांना ‘आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार’, ‘डी. लिट.’ पदवी यांसह ३० पेक्षा जास्त प्रतिष्ठित पुरस्कार लाभले आहेत. ‘महाराणी ताराबाई’, ‘छत्रपती शिवाजी महाराज’, ‘सेनापती संताजी घोरपडे’ आणि ‘राजर्षी शाहू एक दृष्टीक्षेप’ ही त्यांची प्रमुख ग्रंथसंपदा आजही इतिहास अभ्यासकांसाठी दीपस्तंभ ठरत आहे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
few clouds
30.4 ° C
30.4 °
30.4 °
77 %
6.9kmh
15 %
Thu
30 °
Fri
31 °
Sat
31 °
Sun
31 °
Mon
31 °

Most Popular

You cannot copy content of this page