Homeइतरनाविन्यपूर्ण उपक्रमातून जिल्ह्याच्या विकासात योगदान द्या : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

नाविन्यपूर्ण उपक्रमातून जिल्ह्याच्या विकासात योगदान द्या : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर :
सर्व शासकीय विभागांनी जबाबदारीने आणि लोकांच्या प्रती सकारात्मक भूमिका घेऊन कामे करावीत. त्यांच्यासाठी नावीन्यपूर्ण योजना राबवून जिल्ह्याच्या विकासासाठी योगदान द्यावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात आज कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न झाली. ही बैठक कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि सह पालकमंत्री तथा राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीमध्ये गत आर्थिक वर्षातील खर्चाचा आढावा घेण्यात आला, तसेच आगामी आर्थिक वर्षाच्या नव्या विकासकामांच्या आराखड्याला आणि विविध नावीन्यपूर्ण प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली.
या बैठकीला राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत, खा. धनंजय महाडिक, खा. शाहू छत्रपती, खा. धैर्यशील माने, आ. जयंत आसगावकर, आ. राजेंद्र पाटील यड्रावकर, आ. चंद्रदीप नरके, आ. अमल महाडिक, आ. राहुल आवाडे, आ. शिवाजी पाटील, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅस्मिन, पोलीस अधीक्षक निलोत्पल, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख यांच्यासह सर्व कार्यान्वयीन यंत्रणांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
मागील आर्थिक वर्षात ३१ मार्च २०२६ अखेर जिल्हा नियोजन समितीने उत्कृष्ट कामगिरी करत प्राप्त झालेल्या संपूर्ण ७६४.६२ कोटी रुपयांच्या निधीचा १००% यशस्वी वापर केला आहे, ज्यामध्ये सर्वसाधारण योजनेचे ६४२.०० कोटी, अनुसूचित जाती उपयोजनेचे १२०.५० कोटी आणि आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील क्षेत्राच्या २.१२ कोटी रुपयांच्या निधीचा समावेश आहे. सर्वसाधारण निधी अंतर्गत राज्य स्तर यंत्रणेसाठी ३८१.९० कोटी आणि जिल्हा परिषद स्तर यंत्रणेसाठी २६०.१० कोटी रुपयांचा निधी पुनर्विनियोजित करून बीडीएस प्रणालीनुसार पूर्णपणे खर्च करण्यात आला. आगामी आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी नियोजन विभागाकडून एकूण ८२५.६२ कोटी रुपयांचा तात्पुरता नियतव्यय मंजूर करण्यात आला असून यात जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारणसाठी ६९३.०० कोटी, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी १३०.५० कोटी आणि आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील क्षेत्रासाठी २.१२ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यातील ६९३ कोटींच्या सर्वसाधारण निधीचा वापर कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक शाळा, अंगणवाडी, कार्यालयीन इमारतींचे नूतनीकरण, आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण, पोलीस यंत्रणेला पायाभूत सुविधा देणे, साकव बांधकाम, ग्रामीण व इतर जिल्हा रस्त्यांचे मजबुतीकरण, पूर नियंत्रण, महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान आणि क्रीडा विभागाच्या विविध योजना राबविण्यासाठी केला जाईल.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक सर्व निधीची तरतूद करून कामे गतीमान पद्धतीने करण्यासाठी बैठकीत आढावा घेतला. मंत्री हसन मुश्रीफ यांनी सीपीआर आणि महत्त्वाच्या घटकांवर अधिक निधीची तरतूद करण्यात यावी असे सांगितले. सह पालकमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी श्री अंबाबाई मंदिर परिसरात तातडीने तात्पुरते महिला स्वच्छतागृह उभारण्याच्या सूचना केल्या. आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह शहरातील सर्वच आमदारांनी श्री अंबाबाई मंदिर परिसरात स्वच्छतागृह तातडीने सुरू करावे, अशी मागणी केली. पंचगंगा प्रदूषणाबाबत तातडीने उपाययोजना करावी, तसेच कोल्हापूर शहर आणि गावांमधून पंचगंगा नदीत जाणारे ४३.५ एमएलडी दूषित पाणी प्रक्रिया करूनच सोडण्यात यावे, यासाठी उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले.
यासह येणाऱ्या पावसाळ्याच्या कालावधीत करावयाची कामे, मिशन उत्कर्ष योजना, प्राणी शवदाहिनी, जिल्ह्यातील स्मशानभूमी सुधारणा, चंदगड तालुक्यातील शाळांची दुरुस्ती, भटक्या कुत्र्यांचे व्यवस्थापन, शाहू मिल, बिबट्यांचा बंदोबस्त आदी बाबींवर विशेष चर्चा करण्यात आली. आयटी पार्कसाठी जागा उपलब्धतेबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा अभिनंदनाचा आणि आभाराचा ठराव मंजूर करण्यात आला.
बैठकीत मागील वर्षातील काही विशेष आणि नावीन्यपूर्ण कामांचा आढावा घेण्यात आला.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
moderate rain
27.9 ° C
27.9 °
27.9 °
83 %
9.5kmh
84 %
Sun
29 °
Mon
29 °
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °

Most Popular

You cannot copy content of this page