Homeशैक्षणिक - उद्योग शिक्षण क्षेत्रातील ‘ज्ञानज्योती’ निमाली

शिक्षण क्षेत्रातील ‘ज्ञानज्योती’ निमाली

• स्वर्गीय प्राचार्या शुभांगी गावडे यांना शोकसभेत कृतज्ञतापूर्वक श्रध्दांजली
कोल्हापूर :
येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिवा प्राचार्या सौ. शुभांगी गावडे  यांचे दि. ३० एप्रिल २०२६ रोजी निधन  झाले. त्यांच्या निधनाने शिक्षणक्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी ताराबाई पार्क, कोल्हापूर येथील संस्थेच्या शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवन येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी दोन मिनिटे स्तब्धता पाळून सौ. शुभांगी गावडे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
शोकसभेत बोलताना सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी प्राचार्या सौ. शुभांगी गावडे यांच्या कार्याचा गौरव केला. शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांच्या विचारांचा वसा व वारसा त्यांनी अत्यंत समर्थपणे पुढे नेला आहे. त्यांनी संस्थेच्या विविध शाखांना गुणवत्तापूर्ण करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा पुरवून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचा नावलौकिक वाढविला. प्राचार्या सौ. गावडे यांच्या निधनाने संस्थेची आणि शैक्षणिक क्षेत्राची अपरिमीत हानी झाली आहे. संस्कारमूल्यांनी युक्त मौल्यवान व्यक्तिमत्व आज आपल्यातून निघून गेले आहे. शिक्षणक्षेत्रातील ज्ञानसूर्याची शलाका, ज्ञानज्योती, चमचमता तारा निखळला आहे. शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांच्या विचारांचा वसा व वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी कौस्तुभ गावडे यांना पाठबळ देणे हीच प्राचार्या सौ. शुभांगी गावडे यांना खरी श्रध्दांजली असेल, अशा भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या.
याप्रसंगी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, संस्थेचे सहसचिव (प्रशासन) प्राचार्य एस. एम. गवळी, संस्थेचे सहसचिव (अर्थ) डॉ. मिलिंद हुजरे, कोल्हापूर जिल्हा विभागप्रमुख डॉ. श्रीराम साळुंखे, संस्थेचे माजी सहसचिव डॉ. राजेंद्र शेजवळ, प्राचार्य आर. के. भोसले, शिक्षक नेते दादा लाड, विवेकानंद कॉलेजच्या आय.क्यु.ए.सी. समन्व्‍यक डॉ. श्रुती जोशी, आ. अशोकराव माने, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे रावसाहेब पोवार, आ. जयंत आसगावकर, नागठाणे येथील कृषीभूषण मनोहर साळुंखे, परळी येथील गजानन बोबडे, मधुकर पाटील, ब्रम्हाकुमारी सुनिताताई, प्रभारी प्राचार्य डॉ. महेश गायकवाड यांनी मनोगते मांडून प्राचार्या सौ. शुभांगी गावडे यांच्या व्यक्तिमत्वाला व कार्याला उजाळा दिला.
शोकसभेस संस्थेचे पदाधिकारी, आजी, माजी आजीव सेवक, विविध शाळा, महाविद्यालयांचे प्राचार्य, गुरुदेव कार्यकर्ते, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, हितचिंतक, विद्यार्थी, साळुंखे व गावडे परिवारातील नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शोकसभेची सुरुवात प्राचार्या सौ. शुभांगी गावडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आणि शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे रचित संस्था प्रार्थनेने झाली. यावेळी प्रा. महेश हिरेमठ यांनी अभंग सादरीकरण केले. शोकसभेचे प्रास्ताविक प्रा. अशोक पाटील यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सुप्रिया पाटील, डॉ. कविता तिवडे यांनी केले.  शोकसभेची सांगता संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानाने झाली.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
29.8 ° C
29.8 °
29.8 °
68 %
4.3kmh
2 %
Fri
31 °
Sat
31 °
Sun
30 °
Mon
30 °
Tue
29 °

Most Popular

You cannot copy content of this page