Homeकला - क्रीडाबालगोपाल आणि खंडोबा पुढील फेरीत

बालगोपाल आणि खंडोबा पुढील फेरीत

कोल्हापूर :
दोन गोलने पिछाडीवर असलेल्या बालगोपाल तालीम मंडळने अखेरच्या पाच मिनिटात सामना बरोबरीत आणून सम्राटनगर स्पोर्ट्सवर टायब्रेकरवर ५ विरूध्द ४ गोलने मात करून पुढील फेरीत प्रवेश केला. बालगोपालचा लालरिनफेला सामनावीर ठरला. तर पहिल्या सामन्यात खंडोबा तालीम मंडळने वर्षाविश्वास तरुण मंडळवर ७-० असा दणदणीत विजय मिळवत पुढील फेरी गाठली. कुणाल दळवी सामनावीर ठरला.
पाटाकडील तालीम मंडळ व डॉ. डी. वाय. पाटील ग्रुप, कोल्हापूर यांचे संयुक्त विद्यमाने आणि कै. पांडबा जाधव व कै. रावसाहेब सरनाईक यांचे स्मरणार्थ ‘सतेज चषक २०२६’ फुटबॉल स्पर्धा सुरू आहे. छत्रपती शाहू स्टेडियमवर दुपारच्या सत्रात बालगोपाल आणि सम्राटनगर यांच्यातील सामना चुरशीचा झाला. पूर्वार्धात दोन्ही संघाकडून झालेल्या चढाया वाया गेल्याने गोलफलक कोराच राहिला.
उत्तरार्धात सम्राटनगरच्या असिल बागवानने बालगोपालचा गोलरक्षक माजिद अहमद याला चकवा देत गोल केला. ४५व्या मिनिटाला १-० ची आघाडी घेतली. ६५व्या मिनिटाला अभिषेक सिंगने संघाचा दुसरा गोल नोंदवून आघाडी भक्कम केली. यानंतर बालगोपालच्या खेळाडूंनी वेगवान खेळ केला. यामध्ये ७५व्या मिनिटाला देवराज मंडलिकने गोल करून आघाडी २-१ वर आणली. ८० व्या मिनिटास लालरिनफेला याला गोलची सोपी संधी मिळाली. त्यामध्ये सम्राटनगरचा गोलरक्षक ओमकार माने याला चकवा देऊन गोल नोंदवून सामना २-२ असा बरोबरीत आणला. अखेरच्या पाच मिनिटात दोन गोलची परतफेड करत बालगोपालने सम्राटनगरच्या विजयाच्या आशा धुळीस मिळविल्या. अखेरची पाच मिनिटे सामन्याचा निकाल बदलणारी ठरली. सामना २-२ असा बरोबरीत राहिल्याने टायब्रेकरचा अवलंब करण्यात आला.
टायब्रेकरमध्ये सम्राटनगरच्या लवप्रीत सिंगने मारलेल्या फटक्यावर चेंडूला रोखून गोलरक्षक माजिद अहमदने दबदबा निर्माण केला. यानंतर सम्राटनगरकडून कार्तिक जाधव, सचिन कुमार, कुणाल माने, असिल बागवान यांनी अचूक गोल नोंदवले. बालगोपालकडून रोहित कुरणे, देवराज मंडलिक, मुस्तफा फरास, विश्लविजय घोरपडे, प्रणव गायकवाड यांनी अचूक गोल नोंदवून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. अशाप्रकारे बालगोपालने ५ विरूध्द ४ गोलने सामना जिंकला.
खंडोबाचा दणदणीत विजय….
दुपारच्या सत्रातील पहिल्या सामन्यात खंडोबाने वर्षाविश्वासवर ७-० गोलने दणदणीत विजय मिळवला. ७व्या मिनिटाला संकेत मेढेने पेनल्टीवर अचूक गोल नोंदवून संघाला आघाडीवर नेले. त्यानंतर कुणाल दळवीने गोल नोंदवून १३व्या मिनिटाला आघाडी २-० अशी केली. एका चढाईत वर्षाविश्वासच्या शुभम दरवान याचा स्वयंगोल झाल्याने २० व्या मिनिटास आघाडी ३-० झाली. ३८व्या मिनिटाला कुणाल दळवीने वैयक्तिक दुसरा तर संघाचा चौथा गोल केला.
उत्तरार्धात आशिष चव्हाणने गोल नोंदवून ५९व्या मिनिटाला आघाडी ५-० अशी वाढवली. लगेचच ६७ व्या मिनिटास प्रताप इरोसे याने गोल नोंदवून आघाडी ६-० अशी भक्कम केली. अखेर जादावेळेत प्रभू पोवारने गोल नोंदवून आघाडी ७-० वर नेली. वर्षाविश्वासकडून अजिंक्यराज पाटील, शिवम लोकरे, सक्षम नलवडे, आश्किन बागवान यांनी गोलसाठी केलेल्या चढाया अयशस्वी ठरल्या.
——————————————————-
आजचे सामने…
• जुना बुधवार – सुभाषनगर : दु. १:३० वा.
• शिवाजी – फुलेवाडी : दुपारी ४ वाजता
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
moderate rain
27.9 ° C
27.9 °
27.9 °
83 %
7.4kmh
99 %
Mon
28 °
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °
Fri
28 °

Most Popular

You cannot copy content of this page