• राजवर्धन पंडित यांचा १०० पेटंट्सचा टप्पा
• ‘मर्सिडिज’कडून ‘टॉप इन्व्हेंटर’ पुरस्कार
कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी राजवर्धन पंडित यांनी जर्मनीतील जागतिक नामांकित वाहननिर्मिती कंपनी मर्सिडीज-बेंझ एजीमध्ये संशोधन आणि नावीन्यपूर्ण तांत्रिक योगदानाच्या माध्यमातून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. कंपनीमध्ये १०० पेटंट्सचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठल्याबद्दल राजवर्धन यांना प्रतिष्ठेचा ‘टॉप इन्व्हेंटर’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या या कामगिरीमुळे शिवाजी विद्यापीठासह कोल्हापूरच्या शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्राचा आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव झाला आहे.
जर्मनीतील स्टुटगार्ट येथे आयोजित विशेष समारंभात मर्सिडीज-बेंझचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी जॉर्ग बुर्झर आणि कंपनीच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य व उत्पादन विभागाचे प्रमुख मायकेल शिबे यांच्या हस्ते राजवर्धन पंडित यांना पुरस्काराची ट्रॉफी प्रदान करण्यात आली.
राजवर्धन पंडित यांच्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात कोल्हापुरातील विद्यापीठ हायस्कूलपासून झाली. त्यांनी विवेकानंद महाविद्यालयातून बारावीचे शिक्षण पूर्ण केले. पुढे शिवाजी विद्यापीठाशी संलग्न केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयातून यांत्रिक अभियांत्रिकीची पदवी संपादन केली. त्यानंतर भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम), शिलाँग येथून व्यवस्थापन शास्त्रातील पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.
त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात २०१५ मध्ये भारतातील मर्सिडीज-बेंझच्या संशोधन व विकास केंद्रातून झाली. भारतातील संशोधन व विकास क्षेत्रातील अनुभव आणि नावीन्यपूर्ण तांत्रिक योगदानाच्या बळावर त्यांनी जर्मनीतील मर्सिडीज-बेंझ एजीमध्ये काम करण्याची संधी मिळवली. सध्या ते कंपनीमध्ये ‘पार्ट मॅनेजर’ म्हणून कार्यरत आहेत.
गेल्या दशकभरात त्यांनी केलेले संशोधन, तांत्रिक कौशल्य आणि नावीन्यपूर्ण संकल्पनांच्या आधारे १०० पेटंट्सचा टप्पा गाठला आहे. जागतिक ऑटोमोबाईल उद्योगातील संशोधन व विकास क्षेत्रात भारतीय अभियंत्यांची क्षमता आणि योगदान अधोरेखित करणारी त्यांची ही कामगिरी आहे.
या यशाविषयी भावना व्यक्त करताना राजवर्धन पंडित म्हणाले, कोल्हापूर ही केवळ माझी जन्मभूमी नाही, तर माझ्या व्यक्तिमत्त्वाची आणि विचारांची जडणघडण करणारी भूमी आहे. विद्यापीठ हायस्कूल, विवेकानंद कॉलेज आणि केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयातील शिक्षणाने माझ्या प्रवासाचा पाया घातला. शिवाजी विद्यापीठाशी असलेले माझे नाते नेहमीच अभिमानाचे राहील. आज जागतिक स्तरावर काम करताना कोल्हापूरच्या मातीचा आणि येथील समृद्ध वारशाचा मला सार्थ अभिमान वाटतो.
कुलगुरू डॉ. राजनीश कामत, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी राजवर्धन पंडित यांचे अभिनंदन केले आहे.
——————————
शिवाजी विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्याची जर्मनीत जागतिक भरारी
RELATED ARTICLES
Mumbai
haze
26
°
C
26
°
26
°
61 %
0kmh
50 %
Sun
29
°
Mon
29
°
Tue
28
°
Wed
29
°
Thu
29
°

