Homeइतरबदलत्या तंत्रज्ञान युगातही पॅथॉलॉजिस्टचे महत्त्व कायम : डॉ. उमेश कानडे

बदलत्या तंत्रज्ञान युगातही पॅथॉलॉजिस्टचे महत्त्व कायम : डॉ. उमेश कानडे

• ‘मॅपकॉन-२०२६’ परिषदचे डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते उदघाटन
• तीन दिवसीय परिषदेत एक हजारांहून अधिक पॅथॉलॉजिस्टचा सहभाग
कोल्हापूर :
वैद्यकीय क्षेत्र, औषधशास्त्र आणि तंत्रज्ञानात कितीही प्रगती झाली, तरी रोगाच्या अचूक निदानासाठी पॅथॉलॉजिस्टची भूमिका कायम महत्त्वाची राहणार आहे. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाला स्वतःचे ज्ञान आणि अनुभवाची जोड  देत कमी वेळेत अचूक निदान करण्यावर पॅथॉलॉजिस्टनी भर द्यावा, असे आवाहन इंडियन असोसिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्ट, महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. उमेश कानडे यांनी केले.
इंडियन असोसिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्टच्या महाराष्ट्र चॅप्टरच्या ४७ व्या वार्षिक ‘मॅपकॉन-२०२६’ परिषदेच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते आणि विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत परिषदेचे उद्घाटन झाले. यावेळी ज्येष्ठ पॅथॉलॉजिस्ट डॉ. माधव कोल्हटकर आणि डॉ. मीरा झवर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या तीन दिवसीय परिषदेत देशभरातील एक हजारांहून अधिक पॅथॉलॉजिस्ट सहभागी झाले आहेत.
डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचा पॅथॉलॉजी विभाग, असोसिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्ट, कोल्हापूर आणि इंडियन असोसिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्टच्या महाराष्ट्र चॅप्टरच्यावतीने हॉटेल सयाजी येथे या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ. कानडे म्हणाले, व्यक्ती आजारी पडल्यानंतर त्यामागील अचूक कारण शोधण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी पॅथॉलॉजिस्ट पार पाडतात. सूक्ष्मदर्शकापासून सुरू झालेला पॅथॉलॉजीचा प्रवास डिजिटल तंत्रज्ञानापर्यंत आणि आता एआयपर्यंत पोहोचला आहे. रोगनिदानासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवश्य वापर करावा; मात्र अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचताना स्वतःचे ज्ञान, बुद्धिमत्ता आणि अनुभव यांना पर्याय नाही. या सर्वांची सांगड घालून अचूक निदान करणे आवश्यक आहे.
कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा म्हणाले,  डिजिटल पॅथॉलॉजीमुळे रोगांचे जलद आणि अचूक निदान होण्यास मदत होईल. एआय पॅथॉलॉजिस्टची जागा घेऊ शकत नाही; मात्र निदान प्रक्रियेत ते निश्चितच उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे पॅथॉलॉजिस्टनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून निदानातील अचूकता वाढवावी.
संयोजन समितीच्या अध्यक्षा डॉ. सुचिता देशमुख यांनी ‘नेक्स्ट जनरेशन पॅथॉलॉजी’ या परिषदेच्या संकल्पनेची माहिती दिली. रुग्णाच्या उपचारप्रक्रियेत पॅथॉलॉजिस्टचे योगदान महत्त्वाचे असून, वैज्ञानिक ज्ञानासोबत सामाजिक बांधिलकीही जपली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
उदघाटनप्रसंगी इंडियन असोसिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्टचे महाराष्ट्र चॅप्टरचे उपाध्यक्ष डॉ. राजीव राव, सचिव डॉ. चंद्रशेखर भाले, डॉ. शैलेश कोरे, डॉ. कैलाश सचदेव, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा, परिषदेचे  सचिव डॉ. आर. एस. पाटील, खजिनदार डॉ. आर. एम. शिंदे, डॉ. सत्यव्रत सबनीस, डॉ. विजय कुलकर्णी, डॉ. पुरोहित, डॉ. अजित कुलकर्णी, डॉ. साळोखे, डॉ. अश्विनी माने, डॉ. प्रतिमा पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी आयक्युएसी संचालिका डॉ.  शिंपा शर्मा, उपअधिष्ठाता डॉ. पद्मजा देसाई, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, सीएचआरओ श्रीलेखा साटम, उपकुलसचिव संजय जाधव यांच्यासह वैद्यकीय व पॅथॉलॉजी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
————–
तज्ज्ञांचे मार्गदर्शन, विविध स्पर्धांचे आयोजन….
परिषदेच्या पहिल्या दिवशी देशभरातील तज्ज्ञांनी पॅथॉलॉजीमधील आधुनिक संशोधन, डिजिटल तंत्रज्ञान आणि निदानाच्या बदलत्या पद्धतींवर मार्गदर्शन केले. डॉ. संगीता बी. देसाई यांनी ‘मोमेंटम ऑफ प्रिसिजन पॅथॉलॉजी’, डॉ. जय मेहता यांनी ‘नेक्स्ट जन आयएचसी’, डॉ. अनिता भादुरी यांनी ‘डायग्नॉस्टिक क्लॅरिटी : डिस्टिंग्विशिंग इन्फ्लेमेटरी लिझन्स इन इंटेस्टायनल पॅथॉलॉजी’, तर डॉ. कीर्ती छडा यांनी ‘एआय इन लॅबोरेटरी मेडिसिन, नेक्स्ट जनरेशन पॅथॉलॉजी’ या विषयांवर विचार मांडले. याशिवाय डॉ. अरशद खान पठाण, डॉ. सुजीत जोशी आणि डॉ. पुष्पा सिंह यांनीही विविध विषयांवर मार्गदर्शन केले. पीजी क्विझ, डॉ. रायचूर अवॉर्ड पेपर प्रेझेंटेशन आणि बेस्ट ओरल पेपर प्रेझेंटेशन या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
28.2 ° C
28.2 °
28.2 °
63 %
2.2kmh
5 %
Mon
29 °
Tue
29 °
Wed
29 °
Thu
30 °
Fri
30 °

Most Popular

You cannot copy content of this page