Homeशैक्षणिक - उद्योग डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी सुरू केला स्टार्टअप

डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी सुरू केला स्टार्टअप

कोल्हापूर :
शिक्षण घेत असतानाच स्वतःच्या कल्पनेला व्यावसायिक स्वरूप देत उद्योजकतेची नवी वाट चोखाळणाऱ्या कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या दोन विद्यार्थ्यांनी स्वत:चा स्टार्टअप सुरु केला आहे. संगणक विज्ञान व अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षात शिकणाऱ्या निखिल चव्हाण आणि सिद्धेश धुंदरे यांच्या ‘श्रावणी नेक्सटेक’ या आयटी सेवा पुरविणाऱ्या स्टार्टअपला ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
डी. वाय. पाटील पॉलिटेक्निककडून नेहमीच विद्यार्थ्यांना नवसंकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेसाठी प्रोत्साहन दिले जाते. त्यातूनच निखिल आणि सिद्धेश यांना स्टार्टअपची संकल्पना सुचली. वडिलांच्या मित्रांना जाणवणाऱ्या विविध आयटीविषयक गरजा लक्षात घेऊन त्यांनी त्यावर तंत्रज्ञानाधारित उपाय विकसित करण्यास सुरुवात केली. संकल्पनेला प्रत्यक्ष व्यवसायाचे रूप देत त्यांनी ‘श्रावणी नेक्सटेक’ची सुरुवात केली असून, आता त्यांना विविध प्रकल्पांची कामेही मिळू लागली आहेत.
‘श्रावणी’ या संस्कृत शब्दाचा अर्थ ‘ऐकणे आणि शिकणे’ असा होतो. ग्राहकांच्या गरजा समजून घेऊन त्यानुसार तंत्रज्ञानाधारित सेवा देणे, हे या स्टार्टअपचे वैशिष्ट्य आहे. वेबसाईट डिझाइन, डिजिटल मार्केटिंग, ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित उपाययोजना अशा विविध सेवा येथे दिल्या जातात. या कामासाठी विविध २० हून अधिक तंत्रज्ञानांचा वापर केला जात आहे.
प्राचार्य डॉ. महादेव नरके म्हणाले, डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये विद्यार्थ्यांनी घेतलेल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष उपयोग करून विद्यार्थी दशेतच स्टार्टअप सुरू करणे ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पनांना योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळाल्यास ते भविष्यात सक्षम उद्योजक बनू शकतात.
भविष्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून समाजोपयोगी सेवा आणि नाविन्यपूर्ण उपाय विकसित करण्यावर भर देणार असल्याचे निखिल चव्हाण व सिद्धेश धुंदरे यांनी सांगितले.
या विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. महादेव नरके, संगणक विभागप्रमुख डॉ. पी. के. शिंदे, प्रा. शीतल साळोखे व शिक्षकांचे मार्गदर्शन व सहकार्यन लाभले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी निखिल व सिद्धेश यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
few clouds
30.2 ° C
30.2 °
30.2 °
63 %
3.5kmh
22 %
Sat
30 °
Sun
30 °
Mon
30 °
Tue
29 °
Wed
30 °

Most Popular

You cannot copy content of this page