कोल्हापूर :
राष्ट्रपती पदक विजेते शिक्षक सागर बगाडे यांच्या सेवापूर्तीनिमित्त आयोजित कृतज्ञता सोहळा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. आमदार कौस्तुभ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली मास्तरप्रेमी मंचच्यावतीने शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवन येथे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सागर बगाडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला.
यावेळी खासदार धनंजय महाडिक, विनोदकुमार लोहिया, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, शिक्षक नेते दादासाहेब लाड, राहुल चिकोडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शिक्षक आमदार कौस्तुभ गावडे यांनी प्रास्ताविक व मनोगत व्यक्त करताना सागर बगाडे यांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले, सागर बगाडे हे केवळ एक आदर्श शिक्षक नाहीत, तर शिक्षणाच्या पलीकडे जाऊन समाजाशी नाळ जोडणारे, कलेची आवड जपणारे आणि युवाशक्तीला विधायक दिशा देणारे व्यक्तिमत्त्व आहे. शिक्षक म्हणून आपली जबाबदारी पार पाडतानाच त्यांनी विविध सांस्कृतिक, सामाजिक आणि क्रीडाविषयक उपक्रमांच्या माध्यमातून समाजात आनंद, उत्साह आणि सकारात्मकता निर्माण केली आहे.
मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सागर बगाडे यांच्या पुढील सामाजिक आणि सांस्कृतिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सागर बगाडे यांनी आपल्यातील कला केवळ स्वतःपुरती मर्यादित न ठेवता तिचे जतन, संवर्धन आणि प्रचार-प्रसार करण्यासाठी महाराष्ट्रभर प्रवास करावा. आपल्या कलेच्या माध्यमातून नव्या पिढीला प्रेरणा द्यावी आणि देशाच्या विकासप्रक्रियेत योगदान द्यावे, असे आवाहन चंद्रकांतदादांनी केले.
खासदार धनंजय महाडिक यांनीही सागर बगाडे यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले.
सत्काराला उत्तर देताना सागर बगाडे यांनी आपल्या जीवनप्रवासातील संघर्ष, जडणघडण आणि वाटचालीत मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींविषयी कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले की, मी शून्यातून प्रवास केला आहे. आज माझ्याकडे जे काही आहे, त्यामागे मला घडविणाऱ्या माणसांचे आशीर्वाद आणि प्रेम आहे. ज्यांनी मला घडवले, तीच माझी खरी संपत्ती आहे आणि विद्यार्थ्यांनी दिलेले प्रेम हीच माझ्या आयुष्याची शिदोरी आहे. आयुष्यात मिळवलेले यश हे केवळ स्वतःचे नसून आपल्याला घडविणाऱ्या संस्था, शिक्षक, विद्यार्थी, सहकारी आणि हितचिंतकांचे असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी शिक्षक, शिक्षणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————————
राष्ट्रपती पदक विजेते शिक्षक सागर बगाडे यांचा सेवापूर्ती कृतज्ञता सोहळा उत्साहात
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
30
°
C
30
°
27.9
°
48 %
3.6kmh
0 %
Sun
29
°
Mon
29
°
Tue
31
°
Wed
31
°
Thu
30
°

