Homeइतरकोल्हापूरच्या विकासाचा 'ॲक्शन प्लॅन' तयार करा : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूरच्या विकासाचा ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करा : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

• महानगरपालिकेच्या प्रलंबित विषयांचा सविस्तर आढावा
कोल्हापूर :
कोल्हापूर शहराचा कायापालट करण्यासाठी आणि प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी महानगरपालिकेची विशेष आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीत शहराच्या पायाभूत सुविधांपासून ते कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांपर्यंत तब्बल २८ विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रशासनाने प्रत्यक्ष कृतीवर भर देत कोल्हापूरकरांना प्राधान्यक्रम ठरवून दर्जेदार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश पालकमंत्री आबिटकर यांनी दिले.
या बैठकीला लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, महापौर रूपाराणी निकम, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड आणि महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड उपस्थित होते. तसेच उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला व बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान, परिवहन समिती सभापती सत्यजित जाधव, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसुळ, शारंगधर देशमुख, आदिल फरास आणि महानगरपालिकेचे सर्व विभागप्रमुख व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीमध्ये ‘अमृत १’ व ‘अमृत २’ योजनेच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. थेट पाईपलाईन योजनेतील त्रुटी दूर करून ती यंत्रणा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी पालकमंत्र्यांनी सूचना दिल्या. आयटी पार्कला हायटेक करण्यासाठी सल्लागार समितीची नेमणूक, शाहू मिल स्मारक डीपीआर, आणि जयप्रभा स्टुडिओ संवर्धन यांसारख्या शहराच्या अस्मितेशी निगडित विषयांवर गांभीर्याने चर्चा झाली. तसेच मान्सूनपूर्व मे अखेर नालेसफाई आणि खराब रस्त्यांची दुरुस्ती पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. तावडे हॉटेल ते गांधीनगर रस्ता आणि छत्रपती शिवाजी स्टेडियम ते अंबाबाई मंदिर अंडरग्राउंड पार्किंग या नवीन प्रस्तावांवरही यावेळी सविस्तर चर्चा झाली.
महापालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना आणि ठोक मानधनावर असलेल्या विशेषतः जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळावे, याबाबत त्यांनी प्रशासनाला सूचना केल्या. आमदार राजेश क्षीरसागर यांनी झोपडपट्टी धारकांना प्रॉपर्टी कार्डांचे वाटप, लाड पागे समितीनुसार रखडलेल्या नियुक्त्या आणि सेवेत असताना मृत झालेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा धोरणाखाली सामावून घेण्याबाबत तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
बैठकीत आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी विषयांचा प्राधान्यक्रम निश्चित करून कामांचे विकेंद्रीकरण करण्यात येणार असल्याचे सांगितले. महापौर रुपाराणी निकम यांनी प्रत्येक विषयाबाबत सविस्तर चर्चा केली तसेच शासनाकडून अतिरिक्त निधीची मागणी केली. त्यांनी महत्वाच्या ठिकाणांवर सीएसआर निधीतून कामे करण्यासाठी पाठपुरावा करीत असल्याचे सांगितले. इतर लोकप्रतिनिधींनी आपापल्या भागातील मुद्दे मांडले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28.4 ° C
28.4 °
28.4 °
78 %
5.9kmh
89 %
Tue
29 °
Wed
29 °
Thu
29 °
Fri
28 °
Sat
29 °

Most Popular

You cannot copy content of this page