कोल्हापूर :
महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशन आयोजित सिनीयर निमंत्रित सुपर लिग क्रिकेट स्पर्धा २०२५-२६ मध्ये कोल्हापूर जिल्हा संघाने दमदार कामगिरी करत ट्रॉफीवर आपले नाव कोरले. एमसीए इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, गहुंजे (पुणे) येथे झालेल्या तीन दिवसीय अंतिम सामन्यात कोल्हापूरने प्रेसिडेंट इलेव्हनवर पहिल्या डावाच्या आघाडीवर विजय मिळवला.
प्रेसिडेंट इलेव्हनने पहिल्या डावात ७३.२ षटकांत सर्वबाद १८५ धावा केल्या. यामध्ये यशराज खाडे (७७) आणि आयुष रक्ताडे (३९) यांनी योगदान दिले. कोल्हापूरकडून ओम पाटीलने ५ बळी घेत उत्कृष्ट गोलंदाजी केली, तर श्रेयस चव्हाणने ३ बळी घेतले.
प्रत्युत्तरात कोल्हापूर संघाने १०२.५ षटकांत सर्वबाद ४२२ धावांचा भक्कम डोंगर उभारला. क्षितीज पाटीलने १२७ धावांचे शानदार शतक झळकावले. श्रेयस चव्हाण (८६), वैभव पाटील (७१) आणि विवेक पाटील (६४) यांनी अर्धशतके करत संघाला २३७ धावांची मोठी आघाडी मिळवून दिली.
दुसऱ्या डावात प्रेसिडेंट इलेव्हनने ६६ षटकांत ४ बाद २३८ धावा केल्या. सिध्दांत दोशीने नाबाद ११४ धावा करत झुंज दिली. मात्र सामना अनिर्णीत राहिल्याने कोल्हापूरने पहिल्या डावाच्या आघाडीवर विजय निश्चित केला.
सामनावीर पुरस्कार श्रेयस चव्हाण (८६ धावा व ४ बळी) याला मिळाला, तर मालिकावीर किताब क्षितीज पाटीलने (५५० धावा व ४८ बळी) पटकावला. विजयी कोल्हापूर संघाला महाराष्ट्र रणजी संघ निवड समिती सदस्य अमेय श्रीखंडे यांच्या हस्ते ट्राॅफी देऊन गौरविण्यात आले. यावेळी केडीसीएचे सेक्रेटरी मदन शेळके व केडीसीए सिनीयर निवड समिती अध्यक्ष रमेश हजारे व मुद्दस्सर मुल्ला उपस्थित होते.
विजयी संघ – रणजीत निकम (कर्णधार), वैभव पाटील, महेश मस्के, श्रेयस चव्हाण, विवेक पाटील, अभिषेक निषाद, क्षितीज पाटील, अनिकेत नलवडे, श्रीराज चव्हाण, ओम पाटील, सुरज कोंढाळकर, अभिषेक आंब्रे, अभिनंदन गायकवाड, अथर्व शेळके, मोहीत पाटील, सौरभ कोटलगी, यतीराज पाटोळे, हर्षवर्धन साळोखे, प्रथमेश हेंगाणा, रवि चौधरी आणि संघ व्यवस्थापक मुद्दस्सर मुल्ला
कोल्हापूर संघाने पहिल्या डावाच्या आघाडीवर सुपर लिग ट्रॉफी पटकावली
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
31
°
C
31
°
29.9
°
66 %
3.1kmh
12 %
Wed
30
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
29
°
Sun
29
°

