Homeकला - क्रीडाखंडोबाचा पराभव करून दिलबहार अंतिम फेरीत

खंडोबाचा पराभव करून दिलबहार अंतिम फेरीत

कोल्हापूर :
पूर्वार्धात फेबिन गिब्सने नोंदवलेल्या एकमेव गोलच्या जोरावर दिलबहार तालीम मंडळने खंडोबा तालीम मंडळचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. लॅमखोलेन दौंगेल सामनावीर ठरला. या पराभवामुळे गतसालातील उपविजेत्या खंडोबाचे यंदाच्या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. मंगळवारी सामन्याला सुट्टी आहे. बुधवारी (दि.१५) दुपारी चार वाजता वेताळमाळ तालीम मंडळ आणि दिलबहार तालीम मंडळ यांच्यात विजेतेपदासाठी लढत होईल.
पाटाकडील तालीम मंडळ व डॉ. डी. वाय. पाटील ग्रुप, कोल्हापूर यांचे संयुक्त विद्यमाने आणि कै. पांडबा जाधव व कै. रावसाहेब सरनाईक यांचे स्मरणार्थ ‘सतेज चषक २०२६’ फुटबॉल स्पर्धा सुरू आहे. छत्रपती शाहू स्टेडियमवर सोमवारी उपांत्य फेरीतील दुसरा सामना दिलबहार आणि खंडोबा संघादरम्यान झाला. सुरुवातीपासून दोन्ही संघाकडून परस्परांचे गोलक्षेत्र भेदणाऱ्या चढाया झाल्या पण गोलची नोंद झाली नाही. १२व्या मिनिटाला फेबिन गिब्सने डी बाहेरून मारलेल्या फटक्यावर चेंडू थेट गोलजाळ्यात शिरला अन् दिलबहारने १-० गोलची आघाडी घेतली. गोलची परतफेड करण्यासाठी खंडोबाकडून कुणाल दळवी, विष्णू मणिकंदम, प्रभू पोवार, पृथ्वीराज साळोखे, प्रताप, रोहित जाधव यांनी गोलक्षेत्रात चढाया केल्या. पण दिशाहीन फटाक्यांमुळे त्या वाया गेल्या. दिलबहारकडून गोलची आघाडी वाढवण्यासाठी खोलवर चढाया झाल्या. स्वयंम साळोखे, थांगजालेन हाओकिप, प्रथम भोसले, संकेत वेसणेकर, स्वयंम गिरजी, माणिक पाटील यांनी केलेल्या चढायांना यश मिळाले नाही.
उत्तरार्धात गोलची परतफेड करून सामना बरोबरीत आणण्यासाठी खंडोबाच्या खेळाडूंनी वेगवान खेळ केला. त्यांनी गोलक्षेत्रात चढाया केल्या पण मोक्याच्या क्षणी दिशाहीन फटाक्यांमुळे गोल करण्यात अपयश आले. अनेकदा सोप्या संधी मिळूनही त्याचे गोलमध्ये रुपांतर करता आले नाही. दुसऱ्या बाजूला पूर्वार्धातच मिळालेली १-० गोलची आघाडी टिकवण्यासाठी दिलबहारने बचात्वामक धोरण अवलंबले. दरम्यान दिलबहारच्या गंधर्व घाटगे याला नियमबाह्य खेळाबद्दल दोनवेळा येलो कार्ड झाल्याने मुख्यपंच निरंजन कामते यांनी गंधर्व घाटगेला रेडकार्ड दाखवून मैदानाबाहेर घालविले. अखेर पूर्वार्धात १२व्या मिनिटाला मिळालेली १-० गोलची आघाडी अखेरपर्यंत कायम राखत दिलबहारने सामना जिंकून अंतिम फेरी गाठली.

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
29.7 ° C
29.7 °
29.7 °
71 %
3.8kmh
100 %
Sat
31 °
Sun
31 °
Mon
30 °
Tue
29 °
Wed
29 °

Most Popular

You cannot copy content of this page