Homeकला - क्रीडावेताळमाळची अंतिम फेरीत धडक

वेताळमाळची अंतिम फेरीत धडक

• गतविजेत्या पाटाकडीलचे आव्हान संपुष्टात
कोल्हापूर :
योग्य समन्वय साधत केलेला सांघिक खेळ आणि मिळालेल्या संधीचा लाभ उठवत नोंदवलेल्या गोलच्या जोरावर वेताळमाळ तालीम मंडळने पाटाकडील तालीम मंडळवर ४-० असा एकतर्फी विजय साकारला. या विजयासह वेताळमाळने स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली तर पराभवामुळे गतविजेत्या पाटाकडीलचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. तीन गोल नोंदवून संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचललेल्या आकाश माळीने सामनावीरचा बहूमान पटकाविला.
दरम्यान, सामना पाहण्यासाठी आलेल्या महिलांमध्ये सामना संपल्यानंतर किरकोळ वादावादी झाली. पण लगेचच सर्वकाही शांत झाले. दुसरा उपांत्य सामना सोमवारी (दि.१३) खंडोबा तालीम मंडळ आणि दिलबहार तालीम मंडळ यांच्यात दुपारी चार वाजता होईल.
पाटाकडील तालीम मंडळ व डॉ. डी. वाय. पाटील ग्रुप, कोल्हापूर यांचे संयुक्त विद्यमाने आणि कै. पांडबा जाधव व कै. रावसाहेब सरनाईक यांचे स्मरणार्थ ‘सतेज चषक २०२६’ फुटबॉल स्पर्धा सुरू आहे. छत्रपती शाहू स्टेडियमवर रविवारी उपांत्य फेरीतील पहिला सामना पाटाकडील आणि वेताळमाळ संघात झाला. अत्यंत वेगवान व अटीतटीच्या लढतीत वेताळमाळने बाजी मारत अंतिम फेरीत प्रवेश केला. राहुल पाटीलने मारलेल्या फ्रिकिकवर गोलक्षेत्रात मिळालेल्या चेंडूला आकाश माळीने हेडव्दारा गोलजाळ्यात धाडून संघाला महत्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. ९व्या मिनिटाला मिळालेल्या आघाडीनंतर चढाईतील सातत्य कायम राखत १६व्या मिनिटाला दुसरा गोल केला. रेहान मुजावरने डी बाहेरून मारलेल्या फटक्यावर चेंडू थेट गोलजाळ्यात शिरला. २-० गोलने आघाडी मिळाल्याने सर्वेश वाडकर, आकाश माळी, राहुल पाटील, संदेश कासार यांनी योग्य समन्वय साधून खोलवर चढाया केल्या पण त्यांना गोलची आघाडी वाढवता आली नाही. राहुल पाटीलने गोलची सोपी संधी दवडली. त्यानंतर दोन गोलने पिछाडीवर असलेल्या पाटाकडीलकडून वेगवान खेळ झाला. त्यांच्या ओमकार मोरे, यशराज कांबळे, अमीन खझीर, ऋषिकेश मेथे-पाटील यांनी गोलक्षेत्र भेदणाऱ्या चढाया केल्या. गोलच्या सोप्या संधी मिळूनही दिशाहीन फटाक्यांमुळे वाया गेल्या. ऋषिकेश मेथे-पाटील गोलची नोंद करण्यात अपयशी ठरला.
उत्तरार्धात वेताळमाळकडून आकाश माळी, सर्वेश वाडकर, संदेश कासार, राहुल पाटील, आकाश मोरे, योक्षिम अवुंगशी यांनी चढायांमध्ये सातत्य ठेवले. यामध्ये ४५व्या मिनिटाला यश मिळाले. संदेश कासारच्या पासवर आकाश माळीने वैयक्तिक दुसरा तर संघाचा तिसरा गोल नोंदवून आघाडी भक्कम केली. पाटाकडीलच्या ओमकार मोरे, अमीन खझीर, ऋषिकेश मेथे-पाटील, यशराज कांबळे, रोहित पवार, रोमारिओ, प्रथमेश हेरेकर यांनी गोलसाठी अटोकाट प्रयत्न केले. त्यांनी गोलक्षेत्र भेदणाऱ्या चढाया केल्या पण त्याचे गोलमध्ये रुपांतर करण्यात ते अपयशी ठरले. रोहित मंडलिकच्या फ्रिकिक पासवर रोहित पवारने मारलेल्या फटक्यावर चेंडू गोलरक्षक विशाल कुरणेने रोखून गोलची संधी परतावून लावली. पाटाकडीलचा अनुभवी बचावपटू अक्षय पायमल याची उणीव या सामन्यात दिसून आली. अखेर जादावेळेत (८४व्या) मिळालेल्या संधीचा लाभ उठवत प्रणव कणसेच्या पासवर आकाश माळीने वैयक्तिक तिसरा तर संघाचा चौथा गोल नोंदवत विजयावर शिक्कामोर्तब केले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
31 ° C
31 °
29.9 °
66 %
3.1kmh
12 %
Wed
30 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
29 °
Sun
29 °

Most Popular

You cannot copy content of this page