Homeसण - उत्सवकोल्हापूरात गणेशोत्सवाची लगबग

कोल्हापूरात गणेशोत्सवाची लगबग

• मूर्तिकारांच्या कामाला अंतिम टप्प्यात वेग
कोल्हापूर , (सुरेश आंबुसकर):
लाडक्या गणरायाच्या आगमनाची अबालवृद्ध आतुरतेने वाट पाहत असून, १४ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीनिमित्त घरोघरी गणरायाचे वाजतगाजत स्वागत होणार आहे. गणेशोत्सव अवघ्या २५ दिवसांवर आल्याने शहरातील कुंभारवाड्यांमध्ये गणेशमूर्तींच्या निर्मिती व रंगकामाला वेग आला असून, मूर्तिकारांसह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची लगबग वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसाने आता विश्रांती घेतल्याने गणेशोत्सवाच्या तयारीला वेग आला आहे.
घरोघरी पूजनासाठी लागणाऱ्या विविध आकारांच्या गणेशमूर्ती कुंभारकारागिरांनी तयार करून ठेवल्या आहेत. कुंभारगल्लीत रंगवलेल्या विविध प्रकारच्या आकर्षक मूर्ती मंडप उभारून विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. घरगुती गणेशमूर्तींची विक्री सुरू असतानाच आता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मोठ्या मूर्तींच्या निर्मिती व रंगकामाला वेग आला आहे.
विविध रूपे आणि आकारांतील गणेशमूर्तींना आकर्षक रंगसंगती देण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. काही मूर्ती ऑर्डरनुसार रंगवून परगावी पाठविण्यात येत आहेत. एकंदरीत कुंभारवाड्यांवर गणेशमूर्तींच्या कामाला वेग आला आहे. पापाची तिकटी कुंभार गल्ली, बापट कॅम्प संत गोरा कुंभार वसाहत, शाहूपुरी कुंभार गल्ली, गंगावेश येथे तसेच अनेक मूर्तिकार आपल्या कार्यशाळेत मोठ्या व वैशिष्ट्यपूर्ण गणेशमूर्ती साकारत असून, काही ठिकाणी भव्य मूर्तींचे रंगकाम अंतिम टप्प्यात आहे.
गणेशोत्सवाची लगबग घरोघरी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्येही पाहावयास मिळत आहे. मंडळांकडून वर्गणीचे नियोजन, मूर्तीचे बुकिंग व मंडप उभारणीच्या कामांना वेग आला आहे. आकर्षक मूर्ती व देखावा काय असावा याचा विचारविनिमय करून नियोजन केले जात आहे. काही मंडळांची गणेश विसर्जन मिरवणूक लक्षवेधी असते, अशी मंडळे यंदाची मिरवणूक आणखीनच आकर्षक होण्यासाठी तयारी करत आहेत.
दरम्यान, गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी घरोघरीही तयारी सुरू झाली आहे. घरांची स्वच्छता, रंगकाम, सजावट यांना वेग आला असून, सुबक व आकर्षक गणेशमूर्ती निश्चित करण्यापासून ते विद्युत रोषणाई आणि सजावटीपर्यंतची तयारी सुरू आहे. विशेषतः युवावर्ग गणेशोत्सवाच्या तयारीत उत्साहाने सहभागी असल्याचे चित्र दिसत आहे.
      —————–
कुंभारवाड्यांमध्ये दिवसरात्र लगबग…
गणेशोत्सव जवळ येत असल्याने कुंभारवाड्यांमध्ये सकाळपासून रात्री उशिरापर्यंत गणेशमूर्तींच्या कामाची लगबग सुरू आहे. मूर्तींची घडण, रंगकाम, सजावट आणि अंतिम बारकावे पूर्ण करण्यासाठी मूर्तिकारांची धावपळ सुरू असून, गणरायाच्या आगमनापूर्वी सर्व मूर्ती सज्ज करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
30 ° C
30 °
28.9 °
70 %
5.7kmh
93 %
Thu
29 °
Fri
28 °
Sat
28 °
Sun
28 °
Mon
28 °

Most Popular

You cannot copy content of this page