Homeशैक्षणिक - उद्योग कोल्हापूर विभाग राज्यात दुसरा

कोल्हापूर विभाग राज्यात दुसरा

• कोल्हापूर विभागाचा दहावीचा निकाल ९५.४७ टक्के
• राज्याच्या निकालापेक्षा ३.३८ टक्के अधिक
• मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ३.५० टक्क्यांनी अधिक
कोल्हापूर :
मागील दहा वर्षांपासून कोल्हापूर विभागीय मंडळाने राज्यातील सर्व विभागीय मंडळांमध्ये द्वितीय स्थान कायम राखले असून, सन २०२१ हा अपवाद ठरला आहे. फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (एस.एस.सी.) परीक्षेचा निकाल ९५.४७ टक्के इतका लागला आहे. राज्याचा एकूण निकाल ९२.०९ टक्के असून, त्यापेक्षा कोल्हापूर विभागीय मंडळाचा निकाल ३.३८ टक्क्यांनी अधिक आहे. नऊ विभागीय मंडळांमध्ये कोकण विभाग (९७.६२ टक्के) पहिल्या स्थानावर तर कोल्हापूर विभाग (९५.४७ टक्के) दुसऱ्या स्थानावर आहे. मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ३.५० टक्क्यांनी अधिक आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचे कोल्हापूर विभागीय मंडळ, कोल्हापूर या विभागाचा इयत्ता १०वी चा निकाल शुक्रवारी (दि‌. ८) ऑनलाईन जाहीर झाला. कोल्हापूर विभागीय मंडळ अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पुणे येथून ऑनलाईन तर विभागीय सचिव अनुराधा म्हेत्रे यांनी कोल्हापूर कार्यालयात याबाबत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी गजानन उकिर्डे, प्रणिती जमदग्नी, दिपक पोवार, मनोज शिंदे व सुनिल नलवडे उपस्थित होते.
कोल्हापूर विभागीय मंडळाचा  फेब्रुवारी मार्च २०२६ चा निकाल ९५.४७% इतका आहे. तर फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या तुलनेत फेब्रुवारी-मार्च २०२६ चा निकाल १.४० टक्केने कमी आहे. निकाल फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या तुलनेत १.४० टक्क्यांनी कमी झाला असला, तरी विभागाने राज्यात आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. राज्यभरातील २,३६० शाळांचा निकाल शंभर टक्के लागला असून, त्यापैकी कोल्हापूर विभागातील तब्बल ९२८ शाळांनी शंभर टक्के निकालाची नोंद केली आहे. तसेच १५ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळविण्याचा मान पटकावला आहे.
कोल्हापूर विभागीय मंडळाअंतर्गत सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील २,४७६ माध्यमिक शाळांमधून ३६२ परीक्षा केंद्रांवर एकूण १ लाख २९ हजार ४९९ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख २३ हजार १७१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, विभागाचा एकूण निकाल ९५.४७ टक्के लागला आहे.
सातारा जिल्ह्यातील ७८० माध्यमिक शाळांमधून ११६ परीक्षा केंद्रांवर ३६ हजार ५०८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३४ हजार ८५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, जिल्ह्याचा निकाल ९५.७१ टक्के लागला.
सांगली जिल्ह्यातील ७०१ माध्यमिक शाळांमधून १०५ परीक्षा केंद्रांवर ३८ हजार ७७५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३६ हजार १७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, जिल्ह्याचा निकाल ९३.५६ टक्के लागला.
कोल्हापूर जिल्ह्यातील ९९५ माध्यमिक शाळांमधून १४१ परीक्षा केंद्रांवर ५४ हजार २१६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५२ हजार ३०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक ९६.६७ टक्के लागला आहे.
विभागातील ६९ हजार ८८३ नोंदणीकृत मुलांपैकी ६९ हजार ६०१ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ६५ हजार ३३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, मुलांचा निकाल ९३.८६ टक्के लागला आहे.
तर ५९ हजार ६१६ नोंदणीकृत मुलींपैकी ५९ हजार ४०५ विद्यार्थिनी परीक्षेला प्रविष्ट झाल्या होत्या. त्यापैकी ५७ हजार ८४१ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून, मुलींचा निकाल ९७.३६ टक्के इतका लागला आहे.
मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ३.५० टक्क्यांनी अधिक असल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, विभागीय मंडळाकडून एकूण ४ हजार ३०९ विद्यार्थ्यांचे क्रीडा प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने स्वीकारून त्यांना गुणदान करण्यात आले आहे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
26.7 ° C
26.7 °
26.7 °
83 %
6.5kmh
100 %
Tue
27 °
Wed
28 °
Thu
29 °
Fri
30 °
Sat
30 °

Most Popular

You cannot copy content of this page