Homeसण - उत्सवअमाप उत्साहात श्री जोतिबा यात्रा

अमाप उत्साहात श्री जोतिबा यात्रा

• गुलाल-खोबऱ्याची उधळण व ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात लाखो भाविकांची उपस्थिती
कोल्हापूर :
गुलालाच्या जल्लोषी उधळणीने रंगून गेलेला आसमंत, हलगी – घुमक्याचा निनाद व ‘चांगभलं’च्या अखंड गजरात वाडी रत्नागिरी येथील श्री जोतिबा चैत्र यात्रा बुधवारी (दि.१) अमाप उत्साहात पार पडली. महाराष्ट्रासह कर्नाटक, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश येथील भाविक श्री जोतिबा चैत्र यात्रेसाठी आले होते. लाखो भाविकांच्या उपस्थितीने वाडी रत्नागिरी येथील जोतिबा डोंगर फुलून गेला होता. पहाटेपासून सुरू असलेला यात्रेचा जल्लोष सायंकाळी पालखीच्या सोहळ्याने पार पडला. पालखी सोहळ्यानंतर निम्म्याहून अधिक भाविकांनी परतीचा मार्ग धरला.
श्री जोतिबा चैत्र यात्रेनिमित्त राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते मानाच्या सासनकाठ्यांचे विधीवत पूजन करण्यात आले. यावेळी सातारा जिल्ह्यातील निनाम पाडळी येथील सासनकाठी क्र. १ या मानाच्या सासनकाठीचे पूजन करण्यात आले. दुपारी बारा वाजल्यानंतर सासनकाठ्यांचे पूजन करून मिरवणूक सुरू झाली. यावेळी ‘चांगभलं’च्या गजरात गुलाल – खोबऱ्याची उधळण केली जात होती. याप्रसंगी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पोलीस अधीक्षक योगेशकुमार, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार माधवी शिंदे, गट विकास अधिकारी सोनाली माडकर, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे, महादेव दिंडे आणि व्यवस्थापक धैर्यशील तिवले यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी जोतिबा देवाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या यात्रेसाठी लाखो भाविक दाखल झाले होते. एसटी, बैलगाडी, खाजगी वाहनातून तसेच पायी चालत भाविक जोतिबा डोंगरावर आले. बुधवारी जोतिबा मंदिरात पहाटेपासून धार्मिक विधी सोहळ्यास प्रारंभ झाला. पहाटे पाच वाजता शासकीय महाभिषेक झाला. सकाळी १० वाजता धुपारती सोहळा झाला. दुपारी १२ ते १ या कालावधीत निनाम पाडळी येथील मानाच्या पहिल्या सासनकाठीच्या पुजनाने मिरवणुकीस प्रारंभ झाला. या मिरवणुकीमध्ये पहिला मान पाडळी (जि. सातारा) या सासनकाठीचा असतो. त्यानंतर मौजे विहे (ता. पाटण), नंतर करवीर कोल्हापूरची हिंमत बहादूर चव्हाण, कोल्हापूर छत्रपती, कसबा डिग्रज (ता. मिरज), कसबा सांगाव (ता. कागल), किवळ (जि. सातारा), कवठेएकंद (जि. सांगली) यांच्यासह मानाच्या एकूण १०८ सासनकाठ्या सहभागी झाल्या.
गुलाल-खोबऱ्याची उधळण करीत ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात देशभरातून आलेल्या लाखो भाविकांची जोतिबा डोंगरावर उपस्थिती होती. गुलाल – खोबऱ्याच्या उधळणीत, ढोल, ताशा, हालगी व घुमक्याच्या तालावर डौलाने नाचविल्या जाणाऱ्या या सासनकाठ्या आणि त्यावर होणारी गुलाल-खोबऱ्याची उधळण भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडत होती. ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’चा जयघोष करत गुलाल-खोबऱ्याची उधळण करीत श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी येथील श्री जोतिबा देवाची यात्रा लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडली.
दरम्यान, प्रशासनाच्या वतीने यंदाची यात्रा प्लास्टिकमुक्त करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली. भाविकांच्या सोयीसाठी डोंगरावर ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टँकर, अन्नछत्र, सुसज्ज दर्शन रांग, पार्किंग व्यवस्था आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. संपूर्ण यात्रा परिसरावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवण्यात आली तसेच पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त तैनात केला होता. अन्न व औषध प्रशासनाकडून खाद्यपदार्थांची तपासणी करण्यात आली, तर जे भाविक उपस्थित राहू शकले नाहीत त्यांच्यासाठी लाईव्ह दर्शनाची सोयही करण्यात आली होती. बैलगाड्या, खासगी वाहने आणि पायी चालत आलेल्या लाखो भाविकांनी डोंगरवाटा ओसंडून वाहत होत्या, ज्यामुळे अवघा जोतिबा डोंगर गुलाबी रंगाच्या छटेत आणि भक्तीच्या रसात न्हाऊन निघालेला पाहायला मिळाला.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
haze
26 ° C
26 °
26 °
73 %
2.6kmh
75 %
Wed
26 °
Thu
28 °
Fri
27 °
Sat
27 °
Sun
27 °

Most Popular

You cannot copy content of this page