Homeशैक्षणिक - उद्योग दूध वाढ व गुणवत्ता सुधारणा कार्यक्रमाला 'गोकुळ'कडून गती

दूध वाढ व गुणवत्ता सुधारणा कार्यक्रमाला ‘गोकुळ’कडून गती

• २४५ गावांतील १,२२५ दूध संस्थांमध्ये राबविणार उपक्रम
• ४,९०० म्हैस दूध उत्पादकांना प्रशिक्षण
कोल्हापूर :
दररोज २५ लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासोबतच दूध उत्पादन व गुणवत्तेत वाढ करून दूध उत्पादकांचा दुग्ध व्यवसाय अधिक आधुनिक, शास्त्रीय आणि फायदेशीर करण्यासाठी गोकुळ दूध संघाने कै. आनंदराव ज्ञा. पाटील (चुयेकर) ‘दूध वाढ गुणवत्ता सुधारणा’ कार्यक्रमाला सुधारित कार्यपद्धतीद्वारे अधिक गतिमान व कृतिशील स्वरूप दिले आहे.
या सुधारित कार्यपद्धतीच्या एस.ओ.पी. पुस्तिकेचे आज गोकुळ दूध संघाचे प्रशासकीय अध्यक्ष प्रदीप मालगावे व प्रशासकीय मंडळाच्या सदस्यांच्या हस्ते संकलन विभागातील अधिकाऱ्यांकडे वितरण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील २४५ गावांची निवड करण्यात आली असून, प्रत्येक गावातील पाच याप्रमाणे १,२२५ दूध संस्थांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. गोठा व्यवस्थापन सुधारणा आणि दूध व्यवसाय सुधारणा अशा दोन पातळ्यांवर काम केले जाणार आहे.
प्रत्येक गावातील २० याप्रमाणे सुमारे ४,९०० म्हैस दूध उत्पादकांची निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या उत्पादकांसह त्यांच्या पती-पत्नींनाही गोठा व्यवस्थापन, पशुआरोग्य, वैरण, पशुखाद्य आणि दूध उत्पादन वाढीबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच संबंधित गावातील सर्व दूध संस्था व उत्पादकांमध्ये दूध व्यवसाय सुधारणा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
संकलन, पशुसंवर्धन, वैरण विकास, आहार संतुलन, पशुखाद्य, कृत्रिम रेतन, आर.बी.पी. आणि महिला नेतृत्व विभागांच्या समन्वयातून विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये जंतनिर्मूलन, लसीकरण, सी.एम.टी. तपासणी, वंध्यत्व निवारण, गोचीड नियंत्रण, सायलेज, सुधारित वैरण, संतुलित आहार आणि स्वच्छ दूध निर्मितीवर विशेष भर दिला जाणार आहे.
शासनाच्या पशुसंवर्धन योजनांचा लाभ तसेच गोकुळच्या विविध सेवा-सुविधा दूध उत्पादकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत.
गावनिहाय समित्यांकडून कामाचा आढावा
प्रत्येक निवडलेल्या गावात स्थानिक कार्यकारी समिती स्थापन केली जाणार आहे. संकलन विस्तार सुपरवायझर यांच्या नेतृत्वाखाली महिला प्रतिनिधी, आर.बी.पी. स्वयंसेवक, कृत्रिम रेतन सेवक, दूध संस्थेचे चेअरमन व सचिव, रिसोर्स दूध उत्पादक, एल.एस.एस. आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांचा समितीत सहभाग राहणार आहे.
समितीमार्फत दरमहा गोठा भेटी घेऊन कामाचा आढावा घेतला जाणार आहे. स्थानिक समितीची बैठक दरमहा, तर जिल्हास्तरीय समितीची बैठक दर तीन महिन्यांनी घेण्यात येणार आहे. याशिवाय महिला आरोग्य कार्यक्रम, प्रशिक्षण आणि महिला शैक्षणिक सहलींचेही आयोजन केले जाणार आहे.
यावेळी प्राधिकृत अधिकारी मंडळाचे अध्यक्ष प्रदीप मालगावे, सदस्य सागर बलकवडे, डॉ. चंद्रकांत परूळेकर, गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, सहायक महाव्यवस्थापक (डेअरी) अनिल चौधरी, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, रामकृष्ण पाटील, दत्तात्रय वाघरे, व्ही. डी. पाटील, धनाजी पाटील, डॉ. दयावर्धन कामत, भरत मोळे, डॉ. एम. पी. पाटील, संभाजी पाटील यांच्यासह संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28 ° C
28 °
28 °
83 %
6.2kmh
99 %
Mon
28 °
Tue
29 °
Wed
28 °
Thu
28 °
Fri
28 °

Most Popular

You cannot copy content of this page