• बेसबॉलला चालना देण्यासाठी मुंबईत ऑक्टोबरमध्ये भव्य लाइव्ह कार्यक्रम
कोल्हापूर :
अमेरिकेतील प्रतिष्ठीत मेजर लीग बेसबॉल (एमएलबी) ने रिलायन्स इंडस्ट्रीज समूहाची पूर्ण मालकीची उपकंपनी राइज़ वर्ल्डवाइडसोबत नवी भागीदारी जाहीर केली आहे. भारतात बेसबॉलचा प्रसार आणि लोकप्रियता वाढवणे हा या सहकार्याचा मुख्य उद्देश आहे. या भागीदारीअंतर्गत मार्केटिंग मोहिमा, सोशल मीडिया प्रचार तसेच विविध व्यावसायिक उपक्रम राबवले जाणार आहेत. याशिवाय ऑक्टोबर २०२६ मध्ये मुंबई येथे भव्य लाइव्ह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
एमएलबीने गेल्या काही वर्षांपासून भारतात बेसबॉलला प्रोत्साहन देण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू ठेवले आहेत. २०१९ मध्ये नवी दिल्ली येथे कार्यालय सुरू केल्यानंतर लीगने या खेळाबाबत जनजागृती आणि उत्सुकता वाढवण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले. भारतातील शाळांमध्ये “एमएलबी फर्स्ट पिच” कार्यक्रम सुरू करण्यात आला असून, तरुण खेळाडूंसाठी “एमएलबी कप” स्पर्धांचेदेखील आयोजन करण्यात आले आहे. तसेच एमएलबी पोस्ट-सीझन सामन्यांचे प्रसारणही भारतात करण्यात आले.
एमएलबीने “इंडियन बेसबॉल ड्रीम्स”सारखे भारत-केंद्रित उपक्रमही सुरू केले आहेत. या उपक्रमांमुळे देशात बेसबॉलबाबतची उत्सुकता आणि सहभाग वाढताना दिसत आहे.
एमएलबीचे व्यवसाय आणि मीडिया उपआयुक्त नोआ गार्डन म्हणाले की, ही भागीदारी एमएलबीच्या आंतरराष्ट्रीय विस्तार धोरणातील महत्त्वाचा टप्पा आहे. राइज़सोबत काम करताना आम्हाला बेसबॉलचा रोमांच अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता येईल आणि खेळाच्या माध्यमातून सांस्कृतिक संबंध अधिक मजबूत करता येतील.
राइज़ वर्ल्डवाइडचे प्रमुख निखिल बारदिया यांनी सांगितले की, भारतातील क्रीडा बाजारपेठ सातत्याने नव्या संधी निर्माण करत आहे. बेसबॉलची जागतिक लोकप्रियता पाहता हा खेळ भारतीय प्रेक्षकांपर्यंत अधिक जवळून पोहोचवण्याची ही योग्य वेळ आहे. एमएलबीसोबतची भागीदारी करताना बेसबॉलचा रोमांच लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.
राइज़ वर्ल्डवाइड ही क्रीडा आणि मीडिया क्षेत्रातील अनुभवी कंपनी असून, भारतात बेसबॉलला नव्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात ती महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. दोन्ही संस्था मिळून तळागाळातील उपक्रम आणि नवीन कार्यक्रम राबवणार असून, त्यामुळे अधिकाधिक भारतीय बेसबॉलशी जोडले जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
——————————————————-