Homeसण - उत्सवजोतिबा चैत्र यात्रेचा आज मुख्य दिवस

जोतिबा चैत्र यात्रेचा आज मुख्य दिवस

• जोतिबा डोंगरावर लाखो भाविक दाखल 
• दुपारी बारा वाजता सासनकाठी मिरवणूक
कोल्हापूर :
महाराष्ट्रासह कर्नाटक, मध्यप्रदेश व आंध्रप्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या चैत्र यात्रेचा बुधवारी (दि.१) मुख्य दिवस आहे. यात्रेच्या पूर्वसंध्येला लाखो भाविक वाडी रत्नागिरी येथील दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या चरणी दाखल झाले आहेत. गुलालाच्या उधळणीत आणि भाविकांच्या गर्दीत जोतिबा डोंगर फुलून गेला असून भाविक गुलालात न्हाऊन निघाले आहेत. जोतिबा मंदीर परिसर व डोंगरावर लाखो भाविकांच्या उपस्थितीने तसेच वाजतगाजत येणाऱ्या सासनकाठ्या यांमुळे वातावरण चैतन्यदायी बनले आहे.
दरम्यान, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने यात्रेसाठी जय्यत तयारी केली आहे. जोतिबा डोंगर परिसरात तब्बल ३४ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली आहे. २४ तास वाहतूक पोलिसही तैनात असणार आहेत. मंदिर परिसरात बांधलेल्या नव्या दर्शन मंडपातून भाविकांसाठी दर्शन रांग करण्यात आली आहे. बुधवारी (दि.१) पहाटे पाच वाजता शासकीय अभिषेक होणार आहे. दुपारी बारा वाजता पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते सासनकाठी मिरवणुकीला प्रारंभ होईल. यात्रेसाठी देवस्थान समिती आणि प्रशासन सज्ज झाले आहे.
वाडी रत्नागिरी येथील श्री जोतिबाच्या चैत्र यात्रेसाठी गेल्या दोन-तीन दिवसांपासून भाविक येत आहेत. जोतिबा डोंगरावर सासनकाठ्या तसेच अनेक भाविक दाखल झाले आहेत. मानाच्या सासनकाठ्यांचे वाजतगाजत जोतिबा डोंगरावर आगमन होत आहे. मंगळवार दुपारपासून डोंगरावर भाविकांची रीघ लागली आहे. सायंकाळनंतर तर भाविकांच्या गर्दीत डोंगरावरील रस्ते हरवून गेले होते.
सकाळपासूनच ‘श्री’ च्या दर्शनासाठी  भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. दख्खनच्या राजाच्या दर्शनाची आस घेऊन आलेल्या भाविकांच्या चेहऱ्यावर मंदिरात प्रवेश केल्यानंतर अनोखा उत्साह दिसत होता. रखरखत्या उन्हातही हलगी-घुमके व कैताळाच्या निनादात अन् ‘चांगभलं’च्या  गजरात गुलाल – खोबऱ्याची उधळण करीत सासनकाठी नाचवली जात होती. यामुळे संपूर्ण डोंगरावरील वातावरण भक्तिमय झाले. यात्रेला अबालवृध्दांची उपस्थिती आहे. यात्रेसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. एकंदरीत जोतिबा डोंगरावर गुलालाची मुक्त उधळण होत आहे. ‘चांगभलं’चा अखंड गजर होत आहे. त्यामुळे जोतिबा मंदिर व डोंगर परिसरातील सारे वातावरण भक्तिमय व मंगलमय झाले आहे.
          ————
यात्रेच्या दिवशीचे धार्मिक कार्यक्रम…
पहाटे ४ ते ५ वाजता श्रींची पाद्यपूजा, काकडआरती व मुखमार्जन. पहाटे ५ ते ६ : पन्हाळा तहसीलदारांच्या हस्ते ‘श्रीं’ना शासकीय महाभिषेक, सकाळी ७ वाजता ‘श्रीं’ची महापूजा. सकाळी १० ते दुपारी १२ : धुपारती सोहळा व अंगारा वाटप. ‘श्रीं’च्या मंदिरात दुपारी १२ वाजता सासनकाठ्यांची मिरवणूक. सायंकाळी साडेपाच वाजता तोफेची सलामी देऊन ‘श्रीं’चा मुख्य पालखी सोहळा व मिरवणूक. रात्री ८ वाजता यमाई मंदिरात धार्मिक विधी व आतषबाजी. पालखी सोहळा. त्यानंतर लवाजमा जोतिबा मंदिराकडे परत येईल.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
haze
33 ° C
33 °
33 °
66 %
4.6kmh
40 %
Mon
32 °
Tue
31 °
Wed
31 °
Thu
31 °
Fri
31 °

Most Popular

You cannot copy content of this page