Homeशैक्षणिक - उद्योग आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मार्गदर्शनामुळे पशुधन विकासाला चालना : नविद मुश्रीफ

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मार्गदर्शनामुळे पशुधन विकासाला चालना : नविद मुश्रीफ

कोल्हापूर :
गोकुळ दूध संघाने नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. मात्र, मागील काही वर्षांत पशुपालन क्षेत्रात काही आव्हाने जाणवत होती. विशेषतः जनावरांमध्ये वांझपणाचे प्रमाण वाढणे, दूध उत्पादनात अपेक्षित वाढ न होणे, गोठा व्यवस्थापनातील काही त्रुटी तसेच उष्णतेमुळे जनावरांच्या आरोग्यावर होणारा ताण या समस्या शेतकऱ्यांसमोर होत्या. या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्याचा निर्णय आम्ही घेतला. गोकुळ दूध संघाचे पशुवैद्यकीय क्षेत्रातील कामकाज, शिस्तबद्ध सेवा आणि शेतकऱ्यांशी असलेली बांधिलकी पाहूनच नेदरलँड्समधील पी.यू.एम. या संस्थेने गोकुळची निवड केली, ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. ही निवड गोकुळच्या कामाची आंतरराष्ट्रीय पातळीवरील दखल असल्याचे द्योतक आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मार्गदर्शनामुळे पशुधन विकासाला चालना मिळेल , असे प्रतिपादन चेअरमन नविद मुश्रीफ यांनी केले.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्यावतीने दुग्ध व्यवसाय आणि पशुधन व्यवस्थापन क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. नेदरलँड्समधील पी.यू.एम. (प्रोजेक्ट आउट सेंडर मॅनेजर्स) या आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने गोकुळ दूध संघातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेले दहा दिवसांचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे.
या प्रशिक्षणासाठी नेदरलँड्सचे अनुभवी पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉ. एर्विन द. विथ यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते विकास कक्ष, ताराबाई पार्क येथे डॉ. विथ यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संघाचे माजी चेअरमन व ज्येष्‍ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक अजित नरके, प्रकाश पाटील, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, व्यवस्थापक पशुसंवर्धन डॉ. प्रकाश साळुंखे, डॉ.दयावर्धन कामत, डॉ. प्रकाश दळवी, डॉ. तानाजी कडवेकर, डॉ. सुभाष गोरे, डॉ. रणजीत चोपडे, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
गोकुळ संघाने पी.यू.एम. संस्था नेदरलँड्स सोबत १८ डिसेंबर २०२५ ते १८ डिसेंबर २०२७ या दोन वर्षाच्या कालावधीसाठी सहकार्य (फ्रेमवर्क) करार केला असून या करारानुसार दर दोन महिन्यांनी विविध विषयांतील तज्ज्ञ गोकुळ संघात येऊन मार्गदर्शन करणार आहेत. यामुळे गोकुळच्या पशुवैद्यकीय पशुपालन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचे मार्गदर्शन मिळणार आहे.
या करारांतर्गत पहिल्या टप्प्यातील “जनावरांची दूध उत्पादकता वाढविणे व गोठा व्यवस्थापन” या विषयावर दि. ६ ते १७ मार्च २०२६ या कालावधीत प्रशिक्षणाचे आयोजन स्व. आनंदराव पाटील-चुयेकर प्रशिक्षण केंद्र, ताराबाई पार्क येथे पार पडले. या प्रशिक्षणात संघातील एकूण ४३ पशुवैद्यकीय अधिकारी सहभागी होते. प्रशिक्षणा दरम्यान गोकुळमार्फत सद्या चालेल्या पशुसंवर्धन विभागातील कामकाज तसेच दूध उत्पादक पातळीवरील अडचणी यांची माहिती देण्यात आली. तसेच दूध उत्पादक स्तरावरील अडचणीवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन व उपाय सुचवले. प्रत्यक्ष गोठा भेटी, प्रात्यक्षिके, सादरीकरण आणि गटचर्चा यांच्या माध्यमातून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. याशिवाय, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन कसे करावे, त्यांच्या अडचणी ओळखून त्वरित उपाययोजना कशा कराव्यात याबाबतही प्रशिक्षण देण्यात आले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
27.9 ° C
27.9 °
27.9 °
81 %
7.2kmh
100 %
Wed
28 °
Thu
29 °
Fri
28 °
Sat
29 °
Sun
28 °

Most Popular

You cannot copy content of this page