Homeकला - क्रीडाशिवाजी विद्यापीठात तबला वादन कार्यशाळा उत्साहात

शिवाजी विद्यापीठात तबला वादन कार्यशाळा उत्साहात

कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या वतीने आयोजित दोनदिवसीय तबला वादन कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. या कार्यशाळेत न्यू जर्सी (अमेरिका) येथील सूर्याक्ष देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रसिद्ध तबला वादक पं. अरविंद मुळगावकर यांचे ते शिष्य आहेत. तालशास्त्रातील बारकावे आणि देशपांडे यांच्या एकल वादनाने उपस्थित रसिक आणि विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले.
कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी सूर्याक्ष देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना काही मूलभूत बोलपंक्ती देऊन त्यांच्याकडून सराव करून घेतला. त्यानंतर तीनताल, झपताल व मत्तताल यांमधील कायदे, रेला, रौ, लडी या संकल्पना सोदाहरण स्पष्ट केल्या. दुसऱ्या सत्रात तिहाईचे विविध प्रकार, तिहाई तयार करण्याची सूत्रे आणि त्यामागील विचारप्रक्रिया यावर प्रकाश टाकला.
दुसऱ्या दिवशीच्या सत्रात त्यांनी ‘कंठसंगीताची साथसंगत’ या विषयावर गायन व तबल्याच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. गायक कलाकाराला साथ करताना कोणते तंत्र वापरावे, याचे बारकावे त्यांनी उलगडून दाखवले. यासोबतच दर्जेदार आणि ‘फर्माईश गत’ या वादन प्रकारांमधील फरक स्पष्ट करून विद्यार्थ्यांचे शंकानिरसन केले. श्री. देशपांडे यांच्या बहारदार एकल तबला वादनाने कार्यशाळेची सांगता झाली. त्यांनी तीनतालामध्ये पेशकार, कायदे, रेला आणि फरूखाबाद घराण्याच्या विविध बंदिशी सादर केल्या. आपल्या वादनाचा शेवट त्यांनी स्वतः रचलेल्या ‘फर्माईशी कमाली चक्रदार’ने केला. सदर वादनासाठी नगमा साथ अमित साळोखे यांनी केली.
कार्यशाळेला संगीत क्षेत्रातील दिग्गज पं. सुधीर पोटे, पं. विनोद डिग्रजकर, डॉ. नंदकुमार जोशी, महेश देसाई, संदीप तावरे यांच्यासह अधिविभागातील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
अधिविभागप्रमुख डॉ. विनोद ठाकूर-देसाई यांनी सुरवातीला स्वागत व प्रास्ताविक केले. अतुल परीट यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. गिरीधर कुलकर्णी व प्रशांत देसाई यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28.4 ° C
28.4 °
28.4 °
82 %
8.3kmh
100 %
Thu
29 °
Fri
28 °
Sat
29 °
Sun
29 °
Mon
29 °

Most Popular

You cannot copy content of this page