Homeकला - क्रीडाकरवीरवासियांनी अनुभवला नाद सौंदर्याचा आविष्कार 

करवीरवासियांनी अनुभवला नाद सौंदर्याचा आविष्कार 

कोल्हापूर :
पं. राजेंद्र कुलकर्णी यांनी बासरी वादनातून घडवलेला नाद सौंदर्याचा आविष्कार व आदित्य मोडक यांच्या ग्वाल्हेर, आग्रा व जयपूर शैलीच्या घराणेदार शास्त्रीय गायनाने करवीरवासीयांची सायंकाळ स्वरमयी बनवली. एनसीपीए, मुंबई सिटी बँक, न्युयॉर्क आणि गायन समाज देवल क्लब यांच्या संयुक्त संयोजनाने या सायंकालीन संगीत सभेचे आयोजन करण्यात आले.
पहिल्या सत्राचा प्रारंभ आदित्य मोडक यांच्या शास्त्रीय गायनाने झाला. आदित्य यांनी संधी प्रकाशी कातरवेळेची हुरहुर व्यक्त करणाऱ्या सायंगेय श्री रागातील विलंबित तिलवाडा तालातील ‘गजरवा बाजो’ ही बंदिश स्वरविस्तारासाठी निवडली होती. आकारयुक्त आवाजाचा शुध्द निकोप लगाव राग स्वरूपाची यथार्थ जाण व शिस्तबद्ध बढत, आकर्षक व चपळ तानक्रिया, समेवर येण्याचा डौल, लयतालावरील प्रभुत्व यांचा सुप्रमाणीत मिलाफ घडवत श्रवणानंदात तल्लीन झालेल्या श्रोत्यांनी वेळोवेळी दाद दिली.
त्याच रागातील गुरून की सीख व अंतूबुवा जोशी ‘चलोही माई राम’ दृत त्रितालातील रचना सादर करत आपल्या गायनाची सांगता कामोद रागातील झुमरा तालातील मती मालनिया व दृत त्रितालातील का रे जानेना दूंगी या रचनेने केली. आदित्य मोडक यांना तबला व संवादिनीची अत्यंत समजूतदारपणे व गाण्याला उठाव आणणारी साथ स्वप्निल भिसे व स्वरूप दिवाण यांनी केली.
दुसऱ्या सत्रात पं. राजेंद्र कुलकर्णी यांनी बासरी वादनातून राग चंद्रप्रभा हा अप्रचलित राग सादर केला. थोडावेळ आलापचारी करून करून गायकी अंगाने रूपक तालात निबद्ध असलेली गत सादर करून बासरीच्या फुंकीवर त्याचप्रमाणे लयकारीवरील आपले प्रभुत्व सिद्ध केले. द्रुतरचना वाद्याच्या अंगाने सादर करून तबल्याबरोबर सवाल जवाब हुकमी हाया याद्वारे संगीतप्रेमींना प्रभावित केले. रंगतदार अशा बासरी वादनाला अतिशय पूरक व वादनाला उठाव देणारी तबला साथ पुण्याच्या शंतनू देशमुख या पं. योगेश शम्सी यांच्या शिष्याने केली.
विशेषतः दृतलयीत केलेले वादन व बासरी सोबतचे सवाल जवाब याला संगीतप्रेमींनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. चंद्रप्रभानंतर पं. राजेंद्र कुलकर्णी यांनी मांड खमाज रागातील ठुमरी व त्यानंतर ‘जा मै तोसे नाही बोलुंगी’ या सुप्रसिध्द भैरवीने दोन तासाहून अधिक काळ रंगलेल्या स्वरमैफिलीची सांगता केली.
कलाकरांचा परिचय व प्रास्ताविक मनीष आपटे यांनी केले. कलाकारांचे व साथीदारांचे स्वागत श्रीकांत डिग्रजकर व भाग्यश्री मुळे केले. कार्यक्रमाला पंडित सुधीर पोटे, पंडित विनोद डिग्रजकर, अजित कुलकर्णी, डॉ. स्नेहा राजुरीकर गिरीधर कुलकर्णी यांच्यासह संगीतप्रेमी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
Mumbai
scattered clouds
29 ° C
29 °
29 °
74 %
3.6kmh
35 %
Wed
29 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
28 °
Sun
27 °

Most Popular

You cannot copy content of this page