HomeUncategorizedऋषिकेशची हॅटट्रिक अन् पाटाकडील विजयी 

ऋषिकेशची हॅटट्रिक अन् पाटाकडील विजयी 

• उत्तरेश्वरचा संध्यामठवर विजय
कोल्हापूर :
ऋषिकेश मेथे-पाटीलने नोंदवलेल्या हॅटट्रिकच्या जोरावर पाटाकडील तालीम मंडळ (अ)ने संयुक्त जुना बुधवार पेठवर ३-० असा एकतर्फी विजय मिळवला. या विजयासह पाटाकडील (अ)चे एकूण १३ गुण झाले आहेत. तत्पूर्वी झालेल्या सामन्यात उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळने संध्यामठ तरुण मंडळवर २-० गोलने विजय मिळवला. यासह उत्तरेश्वरने १२ गुणांवर मजल मारली आहे. संध्यामठ पाचही सामने हरले असल्याने त्यांचे सिनियर- ८ गटातील स्थान धोक्यात आले आहे. दरम्यान, उत्तरेश्वर आणि संध्यामठ यांच्यातील सामना संपल्यानंतर खेळाडूंमध्ये हाणामारी झाली. याबद्दल मुख्यपंचानी उत्तरेश्वरच्या तीन तर संध्यामठच्या दोन खेळाडूंवर रेडकार्डची कारवाई केली आहे.
कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीग स्पर्धेतील सामने पूर्ववत सुरू झाले. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे दि.२४ डिसेंबर २०२५ ते १७ जानेवारी २०२६ या कालावधीत लीग स्पर्धेतील फुटबॉल सामने तात्पुरत्या स्वरूपात स्थगित ठेवण्यात आलेले होते. रविवारी छत्रपती शाहू स्टेडियमवर दुपारच्या सत्रात पाटाकडील अ आणि जुना बुधवार संघादरम्यान सामना झाला.
पूर्णपणे एकतर्फी झालेल्या या सामन्यात ऋषिकेश मेथे-पाटीलने नोंदवलेल्या हॅटट्रिकच्या जोरावर पाटाकडील (अ)ने विजय साकारला. पूर्वार्धात यशराज कांबळेने उजव्या बाजूकडून ओमकार मोरेकडे चेंडू पास केला. त्यावर ओमकारने ऋषिकेश मेथे-पाटीलकडे चेंडू मारला. या चेंडूला गोलजाळ्याची दिशा दाखवत ऋषिकेशने १५व्या मिनिटाला संघाला आघाडी मिळवून दिली. १-०च्या आघाडीनंतर प्रथमेश हेरेकरने दिलेल्या पासवर ऋषिकेश मेथे-पाटीलने मारलेल्या फटक्यावर गोलरक्षक अनिल जानकरने चेंडू रोखून गोलचे संकट टाळले. २८व्या मिनिटास गोलक्षेत्रात मिळालेल्या संधीचा फायदा उठवत ऋषिकेशने वैयक्तिक तसेच संघाचा दुसरा गोल केला. दरम्यान , जुना बुधवारच्या प्रथमेश जाधवची गोलची संधी हुकली. तसेच त्यांच्या शुभम जाधवने मारलेल्या जोरदार फटक्यावर पाटाकडीलचा गोलरक्षक अमर गवळीने बाहेर काढून गोलचे संकट परतावले.
पूर्वार्धात मिळालेल्या २-० आघाडीच्या जोरावर उत्तरार्धात पाटाकडील (अ)ने आक्रमक चढाया करून जुना बुधवारच्या गोलक्षेत्रात जास्तीत जास्त चेंडू ठेवला. यामध्ये एका चढाईत रोहित पवारने दिलेल्या पासवर ऋषिकेशने गोल नोंदवून हॅटट्रिक साधली. ६८व्या मिनिटाला ३-० ची आघाडी झाल्यावर पाटाकडीलच्या ओमकार मोरे, रोहित पवार, यशराज कांबळे, प्रथमेश हेरेकर, ऋषिकेश मेथे-पाटील यांनी वारंवार जुना बुधवारच्या गोलक्षेत्रात चढाया केल्या पण त्यांना गोलची आघाडी वाढवता आली नाही. जुना बुधवारकडून रविराज भोसले, सचिन मोरे, प्रथमेश जाधव, थुलूंगा ब्रम्हा यांनी केलेल्या चढाया फिनिशिंगअभावी वाया गेल्या. शुभम जाधवने डी टॉपवरून मारलेल्या चेंडूला गोलरक्षक अमर गवळीने तितक्याच तत्परतेने परतावून लावले. अखेर ३-० ची आघाडी कायम राखत पाटाकडीलने विजय मिळवला.
तत्पूर्वी, दुपारच्या सत्रातील पहिल्या सामन्यात उत्तरेश्वरने संध्यामठवर २-० ने विजय मिळवला. पूर्वार्धात गोलफलक कोराच राहिला. उत्तरार्धात ७८व्या मिनिटाला अथर्व पाटीलने गोल नोंदवून उत्तरेश्वरला आघाडीवर नेले. त्यापाठोपाठ जादावेळेत तुषार पुनाळकरने गोल नोंदवून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. संध्यामठकडून कपील शिंदे, श्रावण शिंदे, अभिजीत साळोखे, ओमकार पाटील यांनी गोलसाठी अटोकाट प्रयत्न केले पण त्यांना यश मिळाले नाही. स्पर्धेतील सातपैकी पाच फेरीतील सामने संध्यामठने हरले असल्याने त्यांचे सिनियर- ८ गटातील स्थान धोक्यात आले आहे.
        ————-
पाच खेळाडूंना रेडकार्ड…
उत्तरेश्वर आणि संध्यामठ यांच्यातील सामना संपल्यानंतर मैदानावर खेळाडूंमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. याचवेळी प्रेक्षकांतूनही काही जण मैदानात आल्याने हा वाद वाढला. खेळाडूंमध्ये झालेल्या हाणामारीबद्दल मुख्यपंच सुमित जाधव यांनी उत्तरेश्वरच्या तीन तर संध्यामठच्या दोन खेळाडूंवर रेडकार्डची कारवाई केली आहे. यामध्ये उत्तरेश्वरच्या प्रतिक कांबळे, श्रीकांत माने, विश्वदीप भोसले तर संध्यामठच्या करणसिंह पाटील व राखीव खेळाडू मसूद मुल्ला यांना रेडकार्ड दाखविण्यात आले आहे.
——————————————————-
आजचे सामने…
• झुंजार क्लब – फुलेवाडी : दु. १:३० वा.
• खंडोबा – शिवाजी : दुपारी ४ वाजता ——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
23 ° C
23 °
23 °
56 %
0kmh
64 %
Thu
26 °
Fri
26 °
Sat
25 °
Sun
26 °
Mon
27 °

Most Popular

You cannot copy content of this page