• शिवाजी तरुण मंडळ उपविजेते
कोल्हापूर :
अत्यंत चुरशीने झालेल्या अंतिम सामन्यात पाटाकडील तालीम मंडळ (अ)ने शिवाजी तरुण मंडळवर २ विरूध्द १ गोलने मात करून राजेश चषक पटकाविला. ‘शिवाजी’ला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. पाटाकडीलचा ओमकार मोरे सामनावीर ठरला. रंगपंचमीच्या पूर्वसंध्येला ‘पाटाकडील’ने विजयाचे रंग उधळल्याने त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला.
संयुक्त जुना बुधवार पेठ सेवाभावी संस्था आयोजित राजेश चषक फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामना पाहण्यासाठी छत्रपती शाहू स्टेडियमवर हजारोंच्या संख्येने प्रेक्षकांनी उपस्थिती लावली होती. फुटबॉल हंगामाची सुरुवात झालेल्या शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीग स्पर्धेत शिवाजी तरुण मंडळने विजेतेपद पटकावले तर पाटाकडील तालीम मंडळ (अ) उपविजेता ठरला होता. त्यानंतर पहिल्याच बाद पध्दतीच्या स्पर्धेत हेच दोन्ही संघ विजेतेपदासाठी आमनेसामने आल्याने कोणता संघ बाजी मारणार, याची उत्सुकता फुटबॉलशौकिनांना लागल्याने त्यांची उपस्थिती लक्षवेधी होती.
सुरुवातीपासूनच दोन्ही संघाकडून आक्रमक चढाया झाल्या. पहिल्या अर्ध्या तासात गोलफलक कोराच राहिला. त्यानंतर ३२व्या मिनिटाला करण चव्हाण-बंदरेने गोल नोंदवून संघाला आघाडी मिळवून दिली. पण ही १-०ची आघाडी फारवेळ टिकली नाही. त्यानंतर झालेल्या चढाईत ऋषिकेश मेथे-पाटीलने दिलेल्या पासवर अरबाज पेंढारीने हेडव्दारा गोल नोंदवून ३९व्या मिनिटाला सामना १-१ असा बरोबरीत आणला. ‘शिवाजी’कडून करण चव्हाण बंदरे,
दर्शन पाटील, संकेत नितीन साळोखे, हर्ष जरग, खुर्शीद अली यांनी केलेल्या चढाया वाया गेल्या. पाटाकडीलच्या ओमकार मोरेने मारलेल्या फटक्यावर चेंडू गोलपोस्टवरून बाहेर गेला. ऋषिकेश मेथे-पाटील, प्रथमेश हेरेकर, अमीन खझीर, रोमारिओ, नबी खान यांनी रचलेल्या चाली फिनिशिंगअभावी वाया गेल्या.
पूर्वार्धात सामना १-१ बरोबरीत राहिल्याने उत्तरार्धात गोलची आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघांनी वेगवान चाली रचल्या. पाटाकडीलच्या एका चढाईत ओमकार मोरेने मिळालेल्या संधीचा लाभ उठवत ५२व्या मिनिटास संघाला २-१ अशी महत्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. अमीन खझीर, ऋषिकेश मेथे-पाटील, ओमकार मोरे, रोमारिओ, प्रथमेश हेरेकर, नबी खान यांनी केलेल्या खोलवर चढाया ‘शिवाजी’चा गोलरक्षक मयूरेश चौगुलेने यशस्वीपणे परतावून लावल्या. ‘शिवाजी’कडून सामन्यात बरोबरी साधण्यासाठी गोलक्षेत्र भेदणाऱ्या चढाया झाल्या पण त्या अयशस्वी ठरल्या. त्यांच्या करण चव्हाण-बंदरे, दर्शन पाटील, इंद्रजीत चौगुले, हर्ष जरग, यश जांभळे यांनी गोलसाठी अटोकाट प्रयत्न केले. अखेरच्या क्षणात तर करण चव्हाण-बंदरेला गोलक्षेत्रात सोपी संधी मिळाली पण त्याने ती गमावली. अखेर २-१ची आघाडी कायम राखून पाटाकडीलने पहिल्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
बक्षीस समारंभ….
स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ खासदार शाहू छत्रपती महाराज, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आम. राजेश क्षीरसागर, उपमहापौर अक्षय जरग, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, सत्यजित जाधव, विजयसिंह खाडे-पाटील, अभिजीत खतकर, केएसएचे ऑन जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक, पुष्कराज क्षीरसागर, दिगंबर फराकटे, अनिल निकम आदींच्या उपस्थितीत झाले.
विजेत्या पाटाकडील संघाला रोख १ लाख २५ हजार रुपये व चषक तर उपविजेत्या ‘शिवाजी’ला रोख ७५ हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले. तसेच उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या खंडोबा तालीम मंडळ आणि दिलबहार तालीम मंडळ यांना प्रत्येकी १५ हजार रुपये बक्षीस देण्यात आले. स्पर्धेतील मालिकावीर म्हणून पाटाकडीलच्या ऋषिकेश मेथे-पाटील याला सोन्याचा लहान फुटबॉल मिळाला. स्पर्धेतील बेस्ट फॉरवर्ड – संकेत नितीन साळोखे (शिवाजी), बेस्ट हाफ – दर्शन पाटील (शिवाजी), बेस्ट डिफेन्स – प्रतिक बदामे (पाटाकडील), बेस्ट गोलकिपर – अमर गवळी
पाटाकडील’ने उधळले विजयाचे रंग!
RELATED ARTICLES
Mumbai
haze
31
°
C
31
°
30.9
°
66 %
6.2kmh
0 %
Wed
30
°
Thu
29
°
Fri
29
°
Sat
29
°
Sun
29
°

