Homeशैक्षणिक - उद्योग नव्या तंत्रज्ञानातून शेतकऱ्यांचा विकास साधण्याचा ‘गोकुळ’चा निर्धार : नविद मुश्रीफ

नव्या तंत्रज्ञानातून शेतकऱ्यांचा विकास साधण्याचा ‘गोकुळ’चा निर्धार : नविद मुश्रीफ

• पुणे येथील फीड्‌स टेक आणि डेअरी इंडस्ट्री एक्स्पोमध्ये गोकुळचा सहभाग  
कोल्हापूर :
दुग्ध व्यवसाय हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार आहे. शेतकऱ्यांचा विकास साधायचा असेल, तर नव्या तंत्रज्ञानाचा वापर आणि वैज्ञानिक दृष्टी आवश्यक आहे. संशोधन, गुणवत्ता नियंत्रण आणि नवीन प्रयोग व सुधारणा यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवता येईल. गोकुळ दूध संघ नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत आला आहे. या एक्स्पोमधील आमचा सहभाग शेतकऱ्यांना वैज्ञानिक पद्धतीने जनावरांचे संगोपन आणि पोषण व्यवस्थापन शिकवण्यासाठी आहे, असे प्रतिपादन गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी केले.
दुग्ध व्यवसाय आणि प्रक्रिया उद्योग क्षेत्रासाठी देशातील सर्वात मोठा मेळावा ठरलेला ‘फीड्‌स टेक आणि डेअरी इंडस्ट्री एक्स्पो २०२५’ चिंचवड, पुणे येथील ऑटो क्लस्टर प्रदर्शन केंद्रात उत्साहात सुरू झाला. तीन दिवस चालणाऱ्या या एक्स्पोमध्ये देशभरातील दुग्ध व्यवसायातील संस्था, शास्त्रज्ञ, संशोधक, तंत्रज्ञ, उद्योजक आणि शेतकरी सहभागी झाले आहेत. या एक्स्पोचे उद्‌घाटन कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. (गोकुळ) चे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
२०१६ मध्ये सुरू झालेल्या या एक्स्पोने अल्पावधीतच देशातील दुग्ध क्षेत्रात महत्त्वाची ओळख निर्माण केली आहे. या एक्स्पोमध्ये गोकुळ दूध संघाने शेतकऱ्यांसाठी खास स्टॉल उभारला आहे. गोकुळचा हा स्टॉल शेतकरी व उद्योग प्रतिनिधींच्या आकर्षणाचा विषय ठरला आहे.
या तीन दिवसांच्या एक्स्पोमध्ये विविध तांत्रिक सत्रे, कार्यशाळा आणि चर्चासत्रे आयोजित करण्यात आली आहेत. उद्योग क्षेत्रातील मान्यवर आणि तज्ञ शाश्वत दुग्ध व्यवसाय, ऊर्जा बचत, आधुनिक तंत्रज्ञान आणि गुणवत्तावृद्धी या विषयांवर मार्गदर्शन करत आहेत.
याप्रसंगी पुणे जिल्हा सहकारी दूध संघाचे चेअरमन ॲड. स्वप्निल बाळासाहेब ढमढेरे, गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, जाफा फीड्सचे कार्यकारी संचालक डॉ. अमिया नाथ, पारस न्यूट्रिशनचे गणेश शर्मा, बेनिसन मीडियाचे प्राची अरोरा, आनंद गोरड, गोकुळचे डेअरी व्यवस्थापक अनिल चौधरी, पशुखाद्य व्यवस्थापक डॉ. व्ही. डी. पाटील व इतर प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
24 ° C
24 °
24 °
50 %
2.1kmh
0 %
Sat
28 °
Sun
28 °
Mon
28 °
Tue
28 °
Wed
28 °

Most Popular

You cannot copy content of this page