Homeकला - क्रीडाराष्ट्रीय बास्केटबॉलसह पाच राज्यस्तरीय स्पर्धांच्या आयोजनाचा कोल्हापूर जिल्ह्याला मान

राष्ट्रीय बास्केटबॉलसह पाच राज्यस्तरीय स्पर्धांच्या आयोजनाचा कोल्हापूर जिल्ह्याला मान

• राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंसाठी वय पडताळणी चाचणी अनिवार्य
कोल्हापूर :
क्रीडा क्षेत्राची समृद्ध परंपरा लाभलेल्या कोल्हापूर जिल्ह्याला सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात राष्ट्रीय व राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाचा बहुमान मिळाला आहे. जिल्ह्यात १७ वर्षांखालील मुलांच्या राष्ट्रीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेसह बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, शालेय फुटबॉल, कबड्डी आणि शालेय हॉकीच्या राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. दरम्यान, राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना यंदापासून वय पडताळणी चाचणी करणे अनिवार्य करण्यात आली आहे.
सन २०२६-२७ मधील शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजन व नियोजनासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा क्रीडा परिषदेची बैठक जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत जिल्ह्यात होणाऱ्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धांचे नियोजन, खेळाडूंची वय पडताळणी, स्पर्धा आयोजनासाठी आवश्यक मनुष्यबळ, तांत्रिक सहकार्य, तालुकास्तरीय स्पर्धा, ऑनलाइन सॉफ्टवेअर, प्रवेश शुल्क तसेच अन्य प्रशासकीय बाबींचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांच्यासह शिक्षण, महापालिका, आरोग्य व पोलिस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्ह्याला यंदा १७ वर्षांखालील मुलांच्या राष्ट्रीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेच्या आयोजनाचा मान मिळाला आहे. त्याचबरोबर पाच राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धाही जिल्ह्यात होणार आहेत. यामध्ये १९ वर्षांखालील मुला-मुलींची बास्केटबॉल स्पर्धा, १७ वर्षांखालील मुला-मुलींची व्हॉलीबॉल स्पर्धा, १४, १७ व १९ वर्षांखालील मुलांची शालेय फुटबॉल स्पर्धा, कबड्डी तसेच १९ वर्षांखालील मुला-मुलींची शालेय हॉकी स्पर्धा यांचा समावेश आहे.
राज्यस्तरीय स्पर्धांच्या संभाव्य तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. व्हॉलीबॉल स्पर्धा २७ ते ३० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आदर्श विद्यानिकेतन, मिणचे (ता. हातकणंगले) येथे होणार आहे. राज्यस्तरीय शाळेय बास्केटबॉल स्पर्धा १ ते ४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत कोल्हापूर बास्केटबॉल असोसिएशन, शिवाजी विद्यापीठ परिसर येथे, तर राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धा १२ ते १६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत महाराष्ट्र हायस्कूल, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धा २५ ते २७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, दि डिस्ट्रिक्ट हॉकी असोसिएशन, कोल्हापूर येथे होणार आहे. यात राष्ट्रीय स्तर बास्केटबॉल तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. मात्र यात इतर स्पर्धेतील तारखांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
यंदाच्या शालेय क्रीडा स्पर्धांमधील महत्त्वाचा बदल म्हणजे खेळाडूंच्या वयाची काटेकोर पडताळणी. राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडूस वय पडताळणी चाचणी करणे अनिवार्य राहणार आहे. सन २०२२-२३ पासून शालेय व इतर क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना वयाचा पुरावा म्हणून जन्म झाल्यापासून पाच वर्षांच्या आतील जन्मदाखला, इयत्ता पहिलीच्या प्रवेशाची जनरल रजिस्टरमधील सत्यप्रत आणि आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच मुख्याध्यापक व प्राचार्यांनी या कागदपत्रांची प्रतिस्वाक्षरी करणे आवश्यक आहे.
राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंची वय पडताळणी चाचणी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामार्फत तत्काळ करून घेण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे. खेळाडूंच्या जन्मतारखेत फेरफार आढळल्यास संबंधित शाळेवर जबाबदारी निश्चित करून योग्य ती कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे शाळा, मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक आणि पालकांनी खेळाडूंच्या वयासंदर्भातील सर्व कागदपत्रे अचूक व अद्ययावत ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन अधिक सुलभ, पारदर्शक व गतिमान करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीचा वापर करण्यात येत आहे. स्पर्धा आयोजनासाठी आवश्यक तांत्रिक सहकार्य, पंचांची उपलब्धता, तालुकास्तरीय बैठका, खेळाडूंची नोंदणी आणि विविध स्पर्धांच्या वेळापत्रकाचे काटेकोर नियोजन करण्यावरही बैठकीत भर देण्यात आला.
कोल्हापूरला लाभलेली राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धांच्या आयोजनाची संधी ही जिल्ह्याच्या समृद्ध क्रीडा परंपरेला मिळालेली आणखी एक महत्त्वपूर्ण मान्यता असून, या स्पर्धांच्या माध्यमातून देश व राज्यभरातील उदयोन्मुख खेळाडूंच्या कौशल्याचा थरार कोल्हापूरकरांना अनुभवता येणार आहे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
28.3 ° C
28.3 °
28.3 °
76 %
5.1kmh
100 %
Fri
28 °
Sat
29 °
Sun
29 °
Mon
28 °
Tue
29 °

Most Popular

You cannot copy content of this page