Homeशैक्षणिक - उद्योग ३९ नामांकित कंपन्यांचा सहभाग असलेल्या नोकरी मेळाव्यात ११८ उमेदवारांची प्राथमिक निवड

३९ नामांकित कंपन्यांचा सहभाग असलेल्या नोकरी मेळाव्यात ११८ उमेदवारांची प्राथमिक निवड

• डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट येथे मेळावा
कोल्हापूर :
कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज आणि इक्विटास डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह्ज ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या नोकरी मेळाव्यास युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ३९ नामांकित कंपन्यांचा सहभाग असलेल्या या मेळाव्यातून ११८ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे.
गरजू विद्यार्थी तसेच नोकरीच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गुरुवारी (दि. २५) हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यासाठी तब्बल ६१० उमेदवारांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. यापैकी ३०० हून अधिक उमेदवारांनी प्रत्यक्ष  मुलाखती दिल्या. ११८ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली असून त्यांना पुढील कार्यालयीन व अंतिम मुलाखत प्रक्रियेसाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
यावेळी  कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांनी विद्यार्थ्यांना करिअर नियोजन, रोजगाराच्या संधी आणि भविष्यातील करिअरच्या दिशा याविषयी मार्गदर्शन केले. बदलत्या औद्योगिक गरजांनुसार विद्यार्थ्यांनी कौशल्यविकासावर भर देत स्वतःला सक्षम बनवावे, असे आवाहन त्यांनी केले.
डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे संचालक डॉ. अजित पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजचे अध्यक्ष राहुल कुलकर्णी यांनी रोटरीच्या जागतिक कार्याचा आढावा घेतला. इक्विटास डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह्ज ट्रस्टच्या सीएसआर विभागाच्या डेप्युटी मॅनेजर माधुरी मुसळे यांनी संस्थेच्या विविध सामाजिक व कौशल्यविकास उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन अँड बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचे संचालक डॉ. ए. एम. गुरव यांनी आभार मानले.
यावेळी विद्यापीठाच्या आयक्यूएसी संचालिका डॉ. शिम्पा शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, इक्विटास डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह्ज ट्रस्टच्या सीएसआर विभागाचे सहाय्यक व्यवस्थापक सुशांत चंदनशिवे, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजचे इव्हेंट चेअरमन डॉ. भरत कोटकर, डी. वाय. पी. साळोखेनगर कॅम्पस डायरेक्टर डॉ. अभिजित माने, मेडिकल कॉलेज अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा, डेप्युटी रजिस्ट्रार संजय जाधव, अश्विन देसाई, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी व्यंकटेश बडवे, अभिजित पाटील, अनिकेत परदेशी, डॉ. दीपक पाटील तसेच विविध विभागप्रमुख, प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली या नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
29 ° C
29 °
28.9 °
79 %
6.2kmh
24 %
Mon
29 °
Tue
29 °
Wed
29 °
Thu
29 °
Fri
29 °

Most Popular

You cannot copy content of this page