Homeकला - क्रीडासम्राटनगर आणि प्रॅक्टीस क्लब उपांत्यपूर्व फेरीत

सम्राटनगर आणि प्रॅक्टीस क्लब उपांत्यपूर्व फेरीत

कोल्हापूर :
पूर्णवेळेत १-१ गोल बरोबरीत राहिलेल्या सामन्यात सम्राटनगर स्पोर्ट्सने मर्दानी खेळाचा आखाडा तालीम मंडळचा टायब्रेकरवर पराभव केला. त्यांनी ३ विरूध्द २ गोलफरकाने सामना जिंकला. दुसऱ्या सामन्यात प्रॅक्टीस फुटबॉल क्लबने बालगोपाल तालीम मंडळवर ३ विरूध्द १ गोलने मात केली. या विजयासह सम्राटनगर आणि प्रॅक्टीस क्लबने स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
कोल्हापूर महानगरपालिका आयोजित महापौर चषक फुटबॉल स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियम येथे सुरू आहे. बुधवारी झालेल्या दुपारच्या सत्रातील पहिल्या सामन्यात सम्राटनगर स्पोर्ट्स आणि मर्दानी खेळाचा आखाडा तालीम मंडळ यांच्यात अटीतटीची लढत झाली. पूर्णवेळेत सामना १-१ गोल बरोबरीत राहिल्यानंतर निकालासाठी टायब्रेकरचा अवलंब करण्यात आला. त्यात सम्राटनगरने ३-२ अशा गोलफरकाने विजय मिळवला.
सामन्याच्या १८व्या मिनिटाला मर्दानी खेळाचा आखाडा तालीम मंडळच्या प्रविण साळोखेने गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. मात्र, सम्राटनगरकडून अभिषेक सिंगने ६६व्या मिनिटाला शानदार गोल करत सामना १-१ असा बरोबरीत आणला. उर्वरित वेळेत दोन्ही संघाकडून गोलची आघाडी घेण्यासाठी वेगवान खेळ झाला पण त्यांना यश आले नाही.अखेर सामना १-१ बरोबरीत राहिला.
सामना बरोबरीत राहिल्याने टायब्रेकरचा अवलंब करण्यात आला. टायब्रेकरमध्ये सम्राटनगरच्या लवप्रीत सिंग, असिल बागवान आणि कुणाल माने यांनी अचूक गोल नोंदवले. कार्तिक जाधवचा प्रयत्न मात्र अपयशी ठरला. मर्दानी खेळाचा आखाडाकडून रणवीर जाधव आणि गंधर्व पाटील यांनी गोल केले, तर संदीप जानकर, प्रविण साळोखे आणि निखिल साळोखे यांनी मारलेल्या फटक्यावर चेंडू बाहेर गेल्याने गोल करण्यात अपयश आले. अशाप्रकारे सम्राटनगरने ३ विरूध्द २ गोलफरकाने सामना जिंकला.
दुसऱ्या सामन्यात प्रॅक्टीस फुटबॉल क्लबने बालगोपाल तालीम मंडळचा ३-१ असा पराभव करत दमदार विजय मिळवला. सामन्याच्या ८व्या मिनिटाला मूमीन भाटच्या अचूक पासवर प्रदीप शिंदेने गोल करत प्रॅक्टीस क्लबचे खाते उघडले. यानंतर झालेल्या चढाईत बालगोपालकडून सार्थक जाधवने २४व्या मिनिटाला गोल करत सामना १-१ असा बरोबरीत आणला. सूरज जाधवच्या फ्रिकिकवर शुभम बेडेकरने सहज गोल नोंदवून ३९व्या मिनिटाला प्रॅक्टीस क्लबला २-१ अशी आघाडी मिळवून दिली.
उत्तरार्धात ७८व्या मिनिटाला रोहित भोसलेने आणखी एक गोल नोंदवत संघाची आघाडी ३-१ अशी भक्कम केली. अखेर पूर्णवेळेत ३-१ची आघाडी राखत प्रॅक्टीस क्लबने विजयावर शिक्कामोर्तब केले.
प्रॅक्टीसकडून सागर चिले, भाट, सूरज जाधव, आकाश बावकर, साहिल डाकवे तर बालगोपालकडून सार्थक जाधव, अभिनव साळोखे, देवराज मंडलिक, वैभव देसाई, रोहित कुरणे यांनी उत्कृष्ट खेळ केला. रोहित कुरणे याचा कालच विवाह सोहळा पार पडला आणि संघासाठी तो आज मैदानात सामना खेळण्यासाठी उतरला.
     ——————-
आजचे सामने….
• जुना बुधवार – उत्तरेश्वर : दुपारी २ वाजता
• खंडोबा – फुलेवाडी : दुपारी ४ वाजता
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
haze
34 ° C
34 °
32.9 °
62 %
5.7kmh
20 %
Fri
34 °
Sat
31 °
Sun
31 °
Mon
31 °
Tue
30 °

Most Popular

You cannot copy content of this page