Homeराजकियराज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत

राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत

• परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची कोल्हापुरात घोषणा
कोल्हापूर :
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून येत्या १ जूनपासून राज्यातील सर्वच बस स्थानकांवरील शौचालय सुविधा प्रवाशांसाठी पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी येथे केली. कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकाच्या पाहणी दौऱ्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. प्रवाशांकडून बस भाड्याच्या माध्यमातून आधीच स्वच्छता कर वसूल केला जातो, त्यामुळे आता हा निधी महामंडळ स्वतः खर्च करणार असून, खासगी कंत्राटदारांमार्फत चालवली जाणारी शौचालय व्यवस्था बंद करून महामंडळ स्वतः त्याची जबाबदारी घेणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील शासन निधीतून बांधण्यात आलेल्या चार नूतन बसस्थानकांच्या उदघाटनासाठी मंत्री प्रताप सरनाईक कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांनी मध्यवर्ती बस स्थानकातील स्वच्छता गृह, उपाहारगृह, हिरकणी कक्ष आणि प्रवासी कक्षांची बारकाईने पाहणी केली. प्रवाशांशी थेट संवाद साधताना त्यांनी अवाजवी पैसे आकारले जात असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेतली. बस स्थानकाचा परिसर आणि स्वच्छता गृहे केवळ मंत्र्यांच्या दौऱ्यापुरती मर्यादित न राहता ती कायमस्वरूपी स्वच्छ राहिली पाहिजेत; त्यासाठी दर चार तासांनी स्वच्छता करणे अनिवार्य असेल, असे स्पष्ट निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.
बस स्थानकावरील उपाहारगृहात गरजूंसाठी ३० रुपयांत चहा आणि नाश्ता देण्याची योजना कागदावरच असल्याचे पाहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ही योजना २४ तासांत पूर्ववत करून त्याबाबतचे फलक दर्शनी भागात लावण्याचे आदेश त्यांनी दिले, अन्यथा संबंधित उपाहारगृह चालकांवर कडक कारवाई करण्याचे संकेत दिले. प्रवाशांना मिळणाऱ्या सेवांमध्ये कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असे सांगत स्थानकांवरील मूलभूत सुविधांचा दर्जा सुधारण्यावर सरकारचा विशेष भर असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
या पाहणी दौऱ्यावेळी राज्य परिवहन महामंडळाच्या (पुणे प्रदेश) प्रादेशिक व्यवस्थापक अमृता ताम्हणकर, विभागीय वाहतूक परिवहन अधिकारी अनिल मेहतर यांच्यासह स्थानिक वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. स्वच्छतेबाबत आणि विनाशुल्क सुविधांबाबत जर कोणी हलगर्जीपणा केला किंवा प्रवाशांकडून बेकायदेशीरपणे पैसे वसूल केले, तर विभागीय परिवहन अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करावी, या सूचनाही मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28.1 ° C
28.1 °
28.1 °
81 %
7.7kmh
100 %
Thu
28 °
Fri
28 °
Sat
29 °
Sun
29 °
Mon
28 °

Most Popular

You cannot copy content of this page