Homeशैक्षणिक - उद्योग भारतीय वायुदलामध्ये अभियंत्यांना मोठ्या संधी

भारतीय वायुदलामध्ये अभियंत्यांना मोठ्या संधी

• डी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये वायुदल अधिकाऱ्यांकडून ‘करिअर मार्गदर्शन’
• हजारो विद्यार्थ्यांनी अनुभवले वायुदलाचे अंतरंग
कोल्हापूर :
भारतीय वायुदलामध्ये अभियंत्यांना विविध तांत्रिक, अतांत्रिक आणि कार्यालयीन पदांच्या आकर्षक करिअर संधी असून, वर्षभर वायुदलाकडून विविध भरती होत असतात. देशसेवेची संधी देणाऱ्या वायुदलातील करिअरकडे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी वळावे, असे आवाहन स्क्वाड्रन लीडर राजन अरोरा, फ्लाइट लेफ्टनंट गुरजित सिंग भूलर यांनी केले. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘भारतीय वायुदलातील करिअर संधी’ बाबत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी भारतीय हवाई दलाचे (आयएएफ) कार्य, वायूसैनिकांचा गणवेश, विविध लढाऊ विमाने… इतकेच नाही तर प्रत्यक्ष विमान चालवण्याचा आभासी अनुभव घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली.
भारतीय वायुसेनेची (आयएएफ) विद्यार्थ्यांना माहिती व्हावी आणि करिअर म्हणून त्यानी या सेवेकडे वळावे या हेतूने  आयएएफने तयार केलेल्या  ‘इंडक्शन पब्लिसिटी एक्झीबीशन व्हेईकल’ या व्होल्वो व्हॅन (IPEV) च्या माध्यमातून देशभर जनजागृती कार्यक्रम राबवला जात आहे. महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्यावतीने बुधवारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना वायूसेनेतील संधी व करिअरबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी ११०० हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते.
अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आवारात दाखल झालेल्या या व्होल्वो व्हॅनमध्ये वायूदलाशी संबधित मॉडेल्सची मांडणी करण्यात आली होती. यामध्ये ए.आर. आणि व्ही.आर. तंत्रज्ञांच्या माध्यमातून भारतीय वायू दलाचे अंतरंग उलगडण्यात आले आहेत. प्रत्यक्ष युद्ध व अन्य आपत्कालीन स्थितीत वापरली जाणारी विविध लढाऊ विमाने, युवक केंद्रित विविध गॅझेट, गणवेश, वापरले जाणारे तंत्रज्ञान यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. विशेष म्हणजे सिम्युलेटरच्या माध्यमातून प्रत्यक्ष विमान चालवण्याचा अभूतपूर्व अनुभव विद्यार्थ्यांना यावेळी घेता आला.
स्क्वाड्रन लीडर राजन अरोरा आणि फ्लाइंग लेफ्टनंट गुरजीत सिंग भुल्लर,  फ्लाईंग ऑफिसर ए. यादव,वारंट ऑफिसर देवेश कुमार यांच्या पथकाने विद्यार्थ्यांना यावेळी वायूदलातील करिअर विषयक सविस्तर माहिती दिली. वर्षातून दोनवेळा भारतीय वायुदलाकडून जाहिरात प्रसिद्ध केली जाते. विद्यार्थ्यांना एअर फोर्स अकॅडमी आणि एअर फोर्स टेक्निकल कॉलेज येथे प्रशिक्षण दिले जाते. शॉर्ट सर्व्हिस कमिशन तसेच पर्मनंट कमिशन या दोन्हीमध्ये गौरवपूर्ण देशसेवा करण्याची संधी या माध्यमातून उपलब्ध असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना विविध करीअर संधीची माहिती व्हावी यासाठी महाविद्यालयातर्फे विविध उपक्रम नेहमीच राबवले जातात. भारतीय वायूसेनेच्यावतीने राबवण्यात आलेल्या हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी होता. वायूसेनेच्या माध्यमातून करिअर व देशसेवा अशा दोन्ही संधी मिळणार असल्याने निश्चितच त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल, असा विश्वास डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक, आणि डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता यांनी व्यक्त केला.
यावेळी प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लीतेश मालदे, सीडीसीआर- ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागचे अधिष्ठाता प्रा. सुदर्शन सुतार, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर मकरंद काईंगडे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आणि डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे प्र कुलपती ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28.1 ° C
28.1 °
28.1 °
81 %
7.7kmh
100 %
Thu
28 °
Fri
28 °
Sat
29 °
Sun
29 °
Mon
28 °

Most Popular

You cannot copy content of this page