Homeकला - क्रीडाफुलेवाडीचा 'शिवाजी'ला दे धक्का!

फुलेवाडीचा ‘शिवाजी’ला दे धक्का!

• प्रथमेश जाधवच्या हॅटट्रिकमुळे जुना बुधवारचा एकतर्फी विजय
कोल्हापूर :
फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळने शिवाजी तरुण मंडळवर २-० गोलने पराभवाचा धक्का दिला. फुलेवाडीच्या या सनसनाटी विजयात गोलरक्षक आविष्कार राऊतने उत्कृष्ट गोलरक्षण करत महत्वाची कामगिरी बजावली. आविष्कार राऊतला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. तत्पूर्वी झालेल्या सामन्यात प्रथमेश जाधवने नोंदवलेल्या हॅटट्रिकच्या जोरावर संयुक्त जुना बुधवार पेठने सुभाषनगर तरुण मंडळवर ३-० असा एकतर्फी विजय मिळवला. प्रथमेश सामनावीर ठरला.
पाटाकडील तालीम मंडळ व डॉ. डी. वाय. पाटील ग्रुप, कोल्हापूर यांचे संयुक्त विद्यमाने आणि कै. पांडबा जाधव व कै. रावसाहेब सरनाईक यांचे स्मरणार्थ ‘सतेज चषक २०२६’ फुटबॉल स्पर्धा सुरू आहे. छत्रपती शाहू स्टेडियमवर दुपारच्या सत्रात शिवाजी आणि फुलेवाडी यांच्यातील सामना चुरशीचा झाला. पूर्वार्धातील ५ व्या मिनिटास अक्षय मंडलिकने दिलेल्या पासवर सिध्दार्थ पाटीलने गोल नोंदवून एकच खळबळ उडवून दिली. गोलची परतफेड करण्यासाठी शिवाजीकडून करण चव्हाण-बंदरे, संकेत अनिल साळोखे, हर्ष जरग, संकेत नितीन साळोखे यांनी खोलवर चढाया केल्या पण त्यांना यश मिळाले नाही.
पूर्वार्धात मिळालेल्या १-० च्या आघाडीवर उत्तरार्धात फुलेवाडीकडून वेगवान खेळ झाला. यामध्ये त्यांच्या अक्षय पाटील, विशाल पाटील, मारुती कोळी, सिध्दार्थ पाटील, सत्यन पाटील, अक्षय मंडलिक यांनी आघाडी वाढवण्यासाठी गोलक्षेत्र भेदणाऱ्या चढाया केल्या. यामध्ये ६०व्या मिनिटास यश आले. अक्षय मंडलिक याने दिलेल्या पासवर विशाल पाटील गोल नोंदवून संघाला २-० अशी महत्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. उर्वरित वेळेत ‘शिवाजी’कडून एकापाठोपाठ एक चढाया झाल्या. यामध्ये हर्ष जरग, करण चव्हाण-बंदरे, संकेत अनिल साळोखे, इंद्रजित चौगुले, संकेत नितीन साळोखे, दर्शन पाटील, योगेश कदम, संकेत जरग यांना गोलची संधी मिळूनही गोल करता येईना. फुलेवाडीचा गोलरक्षक आविष्कार राऊतने अनेक चढाया यशस्वीपणे परतावून लावल्या. अखेर २-० गोलची आघाडी राखत फुलेवाडीने ‘शिवाजी’वर विजय मिळवून सनसनाटी निर्माण केली.
प्रथमेश जाधवची हॅटट्रिक….
दुपारच्या सत्रातील पहिल्या सामन्यात प्रथमेश जाधवने नोंदवलेल्या हॅटट्रिकच्या जोरावर जुना बुधवार पेठने सुभाषनगरवर ३-० गोलने एकतर्फी विजयाची नोंद केली. पूर्वार्धात सामना गोलशून्य बरोबरीत होता. उत्तरार्धात अवघ्या पाच मिनिटात तीन गोल नोंदवून प्रथमेश जाधवने धमाका उडविला. ५१व्या मिनिटाला पहिला गोल नोंदवून संघाला आघाडीवर नेले. त्यानंतर त्याने ५३ व्या मिनिटास दुसरा तर ५५व्या मिनिटाला हॅटट्रिक साधणार गोल नोंदवून संघाला ३-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. उर्वरित वेळेत सुभाषनगरकडून आर्यन पंधारे, प्रविण सुतार, रोहन चव्हाण यांनी गोलसाठी अटोकाट प्रयत्न केले पण त्यांना यश मिळाले नाही. सुभाषनगरकडून एकाही गोलची परतफेड झाली नाही. अखेर ३-०ची आघाडी कायम राखत जुना बुधवारने विजय मिळवला.
——————————————————-
आजचा सामना…
• पाटाकडील – प्रॅक्टीस : दुपारी ४ वाजता
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28.3 ° C
28.3 °
28.3 °
81 %
7.2kmh
100 %
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
28 °

Most Popular

You cannot copy content of this page