Homeशैक्षणिक - उद्योग 'जय जिजाऊ, जय शिवराय’च्या जयघोषात शिवाजी विद्यापीठात शिवजयंती 

‘जय जिजाऊ, जय शिवराय’च्या जयघोषात शिवाजी विद्यापीठात शिवजयंती 

• शोभायात्रेसह लेझीम, ढोल व झांजपथकांची आकर्षक सादरीकरण

कोल्हापूर :
‘जय जिजाऊ, जय शिवराय’ अशा जल्लोषी आणि तरुणाईच्या सळसळत्या उत्साही जयघोषाच्या निनादात शिवाजी विद्यापीठात आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा सोहळा संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे काढलेल्या शोभायात्रा, हलगी, लेझीम, ढोल व झांजपथकाचे उत्कृष्ट सादरीकरण आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेत अश्वारुढ युवक यांमुळे विद्यापीठाचा परिसर पूर्णपणे शिवमय झाला.
शिवाजी विद्यापीठात सकाळी साडेआठ वाजता विद्यापीठाच्या पहिल्या महिला प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या हस्ते विद्यापीठ ध्वजास वंदन करण्यात आले. यावेळी संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या संयोजनाखाली राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत व विद्यापीठ गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी यावेळी ध्वजास मानवंदना दिली. यानंतर प्र-कुलगुरू डॉ. जाधव यांच्यासह उपस्थित अधिकाऱ्यांनी विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्प वाहून अभिवादन केले, त्याचप्रमाणे शिवप्रतिमेसही पुष्पहार घालून अभिवादन केले. जयंतीनिमित्त शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे फुलांच्या आकर्षक माळांनी सुशोभीकरण करण्यात आले होते.
याप्रसंगी विद्यापीठातील वसतीगृहे, विद्यार्थी भवन येथील विद्यार्थी-विद्यार्थिनींसह राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी विद्यापीठ परिसरात ढोल-ताशाच्या निनादात भव्य शोभायात्रा काढली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेतील अश्वारुढ तरुणाच्या रुपाने छत्रपतींचे प्रतिरुप शोभायात्रेत अवतरले. भगवे फेटे आणि शुभ्रवस्त्रांकित तरुणाईमुळे शोभायात्रा लक्ष्यवेधी ठरली. शोभायात्रा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आल्यानंतर तेथे आणि मुख्य प्रशासकीय भवन इमारतीसमोर या विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कारांचे सुमारे दोन तास सादरीकरण केले. यामध्ये हलगीवादनासह झांजपथकाचे सादरीकरण, लेझीम प्रात्यक्षिके, मर्दानी खेळ, कुस्तीची प्रात्यक्षिके यांचा समावेश होता. या सर्व प्रात्यक्षिके व सादरीकरणांत मुलींचा लक्षणीय सहभाग होता. सळसळत्या तरुणाईच्या उत्साहाने विद्यापीठाचा परिसर शिवमय होऊन गेला.
यानंतर मुख्य प्रशासकीय भवन इमारतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. राजाराम गुरव, आंतरविद्याशाखा अधिष्ठाता डॉ. अजय साळी, राष्ट्रीय सेवा योजना तथा विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. तानाजी चौगुले, क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. शरद बनसोडे, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. धनंजय सुतार, इनोव्हेशन, इनक्युबेशन व लिंकेजेस केंद्राचे संचालक डॉ. सागर डेळेकर, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन, संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. विनोद ठाकूर- देसाई यांच्यासह विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी व शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
moderate rain
29 ° C
29 °
28.9 °
74 %
3.6kmh
2 %
Wed
28 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
29 °
Sun
29 °

Most Popular

You cannot copy content of this page