HomeUncategorizedदेशाचा एक नंबर ब्रँड होण्याची क्षमता गोकुळ दूध संघात : नाम. हसन...

देशाचा एक नंबर ब्रँड होण्याची क्षमता गोकुळ दूध संघात : नाम. हसन मुश्रीफ

• कागल तालुका दूध संस्था प्रतिनिधींची संपर्क सभा उत्साहात
कोल्हापूर :
गोकुळ दूध संघ हा पहाटे उठून शेणा- मुतात हात घालून काबाडकष्ट करणाऱ्या माता- भगिनींनी व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी वाढविलेला संघ आहे. संपूर्ण देशाचा एक नंबर ब्रँड होण्याची क्षमता गोकुळ दूध संघामध्ये आहे, असा विश्वास राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. हा ब्रँड टिकवायचा व वाढवायचा असेल तर दूध उत्पादकांचा सहभाग मोलाचा आहे. विशेषतः संचालक मंडळाची जबाबदारी मोठी आहे, असेही ते म्हणाले.
कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ)शी संलग्न कागल तालुक्यातील प्राथमिक दूध संस्था संपर्क सभा शुक्रवारी (दि.२२) आर. के. मंगल कार्यालक बामणी, ता. कागल येथे महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत व संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्‍या अध्यक्षतेखाली व माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे तसेच संचालक मंडळ व मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाली.
यावेळी मंत्री हसन मुश्रीफ पुढे म्हणाले, की गोकुळ दुधाला मुंबई आणि पुण्यातही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कारण; कोल्हापूर जिल्ह्याच्या माती आणि पाण्यामुळेच या दुधाची चव मोठी आहे. दूध संघ संचालकांच्या गुजरात दौऱ्याच्या अभ्यासामधून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे. जनावरांमधील आय. व्ही. एफ. तंत्र सिद्ध झाले आहे. म्हैस व्यायल्यानंतर जन्माला येणारे रेडकू ही रेडीच असेल, याचीही खात्री झालेली आहे. या तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार दूध उत्पादकांमध्ये करण्याची गरज आहे.
गोकुळ दूध संघाकडून दुधाळ म्हैशीसाठी या आधीच ५० हजार रुपये अनुदान सुरू आहे. दूध संघाने केडीसीसी बँकेबरोबर जर सर्व व्यवहार केले तर म्हैशीला बँकेकडून ज्यादा १० हजार रुपये अनुदान देण्याची घोषणाही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी केली.
यावेळी चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले की गोकुळ दूध संघाच्या योजनांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्नात वाढ झाली आहे. संघाचे उद्दिष्ट २५ लाख लिटर संकलन साध्य करणे असून, सर्व उत्पादकांनी संघाच्या सर्व योजनांचा लाभ घेऊन दूध वाढीसाठी पुढाकार घ्यावा.
यावेळी उत्पादकांच्या हिताचे निर्णय घेतल्याबद्दल चेअरमन नविद मुश्रीफ व संचालक मंडळाचे अभिनंदन ठरावाने करण्यात आले. यावेळी प्रविणसिंह पाटील (मुरगूड), बाबासाहेब तुरंबे (साके), टी. एम. पवार (व्हनाळी), मानसिंग पाटील (सांगाव), रविंद्र पाटील (बाणगे), बिद्री साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन मनोज फराकटे, जयदीप पोवार (बिद्री), डी. एम. चौगले (सोनाळी), आदी संस्था प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवरती सविस्‍तर चर्चा होवून अडचणी समजावून घेवून त्‍या प्रश्‍नांचे निरसन करण्‍यात आले तसेच विविध सूचनाची नोंद घेण्यात आली.
यावेळी संघाचे माजी चेअरमन ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक युवराज पाटील यांनी सभेस मार्गदर्शन केले. स्वागत व प्रास्ताविक संचालक अंबरिषसिंह घाटगे तर आभार संचालक शशिकांत पाटील चुयेकर यांनी मानले.
याप्रसंगी संघाचे संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील-चुयेकर, रणजितसिंह पाटील, कर्णसिंह गायकवाड, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, चेतन नरके, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, सौ. शौमिका महाडिक, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले व संघाचे अधिकारी तसेच कागल तालुक्यातील दूध संस्थाचे चेअरमन, संचालक, प्रतिनिधी, दूध उत्पादक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
scattered clouds
27 ° C
27 °
27 °
83 %
5.5kmh
41 %
Sat
27 °
Sun
27 °
Mon
27 °
Tue
27 °
Wed
27 °

Most Popular

You cannot copy content of this page