• बोरगाव हायस्कूलच्या २००१ बॅचचा स्नेहमेळावा उत्साहात
• मैत्रीच्या बंधातून ‘आधार फाउंडेशन’चा शुभारंभ
कोल्हापूर :
पंचवीस वर्षांचा काळ लोटला, चेहरे बदलले, प्रत्येकाच्या आयुष्याची वाट वेगळी झाली; मात्र मैत्रीचा धागा तितकाच घट्ट राहिला. जुन्या आठवणी, हास्यविनोद आणि स्नेहाच्या भावपूर्ण वातावरणात बोरगाव हायस्कूल, बोरगाव येथील इयत्ता दहावीच्या २००१ च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.
तब्बल २५ वर्षांनंतर एकत्र आलेल्या ६० हून अधिक माजी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत जुन्या मैत्रीचा आनंद पुन्हा अनुभवला. पंचवीस वर्षांनंतर पुन्हा एकदा भरलेली ही शाळा केवळ आठवणींचा उत्सव ठरली नाही, तर सामाजिक कार्याच्या नव्या पर्वाची सुरुवातही ठरली.
दीर्घ कालावधीनंतर एकत्र आल्याने सुरुवातीला अनेकांना एकमेकांना ओळखणेही कठीण झाले. त्यामुळे सर्वांनी आपापली ओळख करून देत संवादाला सुरुवात केली. त्यानंतर काही माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करत शाळेतील आठवणी, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि मित्रांसोबत घालवलेले अविस्मरणीय क्षण सांगितले. शालेय जीवनातील मजेशीर किस्स्यांमुळे हास्याचे फवारे उडाले आणि वातावरण आनंदमय झाले.
स्नेहमेळाव्यात विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर रंगलेल्या संगीत रजनीने कार्यक्रमाची रंगत आणखी वाढवली. काही मित्रांनी गायनकलेचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. गप्पा, हास्यविनोद, खेळ आणि संगीताच्या माध्यमातून सर्वांनी जुन्या मैत्रीचा मनमुराद आनंद लुटला. जणू काही काळाचे चक्र उलटे फिरले आणि सर्वजण पुन्हा शाळकरी वयात रममाण झाले.
या स्नेहमेळाव्याचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन केलेला ‘आधार फाउंडेशन’ या सामाजिक उपक्रमाचा शुभारंभ. मैत्रीचे नाते केवळ भेटीगाठींपुरते मर्यादित न ठेवता त्याला समाजसेवेची जोड देण्याचा स्तुत्य निर्णय या मित्रपरिवाराने घेतला. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणे, तसेच भविष्यात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणे हा फाउंडेशनचा मुख्य उद्देश आहे.
या फाउंडेशनच्या कार्यासाठी सचिन पाटील, निलेश शिंदे, अजित पाटील, विकास गिरीगोसावी, उत्तम धोत्रे, दशरथ यादव, जयदीप साळुंखे आणि एकनाथ यादव यांनी पुढाकार घेतला. सर्वांना सोबत घेऊन फाउंडेशनचे काम प्रभावीपणे पुढे नेण्याची ग्वाही त्यांनी दिली. उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त पाठिंबा दर्शविला. पंचवीस वर्षांच्या मैत्रीचे रूपांतर सामाजिक बांधिलकीत करण्याचा हा संकल्प विशेष कौतुकास्पद ठरला.
कार्यक्रमाचे प्रभावी आणि खुमासदार सूत्रसंचालन प्रा. अरुण पाटील यांनी केले. स्नेहमेळावा यशस्वी करण्यासाठी २००१ बॅचमधील सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे नियोजन करून परिश्रम घेतले.
जुन्या आठवणींचा गोडवा, मैत्रीचा अतूट बंध आणि समाजसेवेचा नवा संकल्प अशा त्रिवेणी संगमातून हा स्नेहमेळावा अविस्मरणीय ठरला.
——————————
पंचवीस वर्षांनंतर मित्रांची पुन्हा शाळा भरली!
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
26
°
C
26
°
26
°
53 %
2.1kmh
71 %
Mon
28
°
Tue
28
°
Wed
29
°
Thu
30
°
Fri
28
°

