Homeइतरघटस्थापनेच्या मुहूर्तावर खासबाग मैदानाची स्वच्छता मोहीम

घटस्थापनेच्या मुहूर्तावर खासबाग मैदानाची स्वच्छता मोहीम

• अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मैदानाची दुरावस्था
• आठ दिवसांत पंचनामा आंदोलनाचा इशारा
कोल्हापूर :
कुस्तीचा हंगाम सुरू झाला असताना कोल्हापुरातील ऐतिहासिक खासबाग कुस्ती मैदानाची दुरावस्था झाली आहे. आखाड्यात छातीइतके उंच गवत, तणकट, खरमाती आणि बांधकाम साहित्याचा कचरा साचल्याने पैलवानांनी सराव करायचा तरी कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर घटस्थापनेच्या मुहूर्तावर रविवारी पहाटे तांबडे फुटण्यापूर्वी जिल्हा नागरी समिती व राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीने खासबाग मैदान स्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली.
गंगावेश तालीम आणि मोतीबाग तालमीतील सुमारे अडीचशे मल्लांनी या मोहिमेत सहभाग घेतला. सर्वप्रथम आखाड्यातील गवत काढण्यात आले. तसेच मैदानाच्या उतारावरील गवत हटवून ये-जा करण्यासाठी वाट मोकळी करण्यात आली. हवेली इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ दारूच्या बाटल्या, पाण्याच्या बाटल्या, सिगारेटची पाकिटे आणि माव्याचे कागद असा कचरा आढळला. हा कचरा सात ते आठ पोती भरून बाहेर काढण्यात आला. मल्लांच्या श्रमदानातून ऐतिहासिक खासबाग मैदानाच्या स्वच्छतेचा प्रारंभ झाला.
दरम्यान, जळीत दुर्घटनेनंतर गेल्या दोन वर्षांपासून पुनर्बांधकामाच्या नावाखाली शासनाने २५ कोटी रुपयांचा निधी देऊनही मैदान आणि व्यासपीठाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. नाट्यगृह आणि कुस्ती मैदानाचे काम अर्धवट असतानाही ९ ऑगस्ट २०२६ रोजी उद्घाटनाचा कार्यक्रम घेण्यात आला. केवळ उद्घाटन करून अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी स्वतःची प्रसिद्धी करून घेतली, असा आरोप अशोक पोवार व रमेश मोरे यांनी केला.
कोल्हापूरला तीन वजनदार कॅबिनेट मंत्री, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्षपद आणि बारा आमदार असतानाही ऐतिहासिक खासबाग मैदानाच्या दुरावस्थेकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याची टीका त्यांनी केली. जबाबदार अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मैदानाची ही अवस्था झाली असून, लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली.
येत्या आठ दिवसांत खासबाग मैदानात जबाबदार अधिकाऱ्यांना उपस्थित ठेवून जागेवर पंचनामा आंदोलन करण्यात येईल. तसेच दसऱ्यानंतर खासदार शाहू छत्रपती महाराज आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्या निवासस्थानांसमोर निदर्शने करण्यात येतील, असा इशारा अशोक पोवार व रमेश मोरे यांनी दिला.
सध्या आखाड्यातील गवत काढण्यात आले असले, तरी तणकटामुळे माती घट्ट बसली आहे. त्यामुळे आखाड्यातील माती तळापर्यंत उखडून मोकळी करण्यासाठी छोट्या ट्रॅक्टर रोटरची आवश्यकता आहे. ज्यांच्याकडे असा रोटर उपलब्ध असेल, त्यांनी खासबाग मैदानाच्या स्वच्छता व दुरुस्तीच्या कामासाठी तो उपलब्ध करून सहकार्य करावे, असे आवाहनही आयोजकांनी केले.
या स्वच्छता मोहिमेत अशोक पोवार, रमेश मोरे, वस्ताद विश्वास हारुगले, महाराष्ट्र केसरी वस्ताद विष्णू जोशीलकर, कुस्ती प्रशिक्षक चंद्रकांत चव्हाण, महेश वरुटे, कालीचरण सोलंकर, कुमार पाटील, सदबा भिंगुर्डे, बापू मेंढे, हरिश्चंद्र पुजारी, सूरज हवालदार यांच्यासह कार्यकर्ते आणि कुस्तीगीर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
scattered clouds
28.5 ° C
28.5 °
28.5 °
67 %
3kmh
41 %
Sun
28 °
Mon
32 °
Tue
31 °
Wed
31 °
Thu
31 °

Most Popular

You cannot copy content of this page