Homeकला - क्रीडाफुटबॉल संघ व खेळाडू नोंदणी ८ ऑक्टोबरपासून

फुटबॉल संघ व खेळाडू नोंदणी ८ ऑक्टोबरपासून

• तीन जिल्ह्याबाहेरील खेळाडूंना २ ते ५ नोव्हेंबरची मुदत
• केएसए ‘ए’ डिव्हिजनसाठी नियम जाहीर
कोल्हापूर :
कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या (केएसए) वतीने सन २०२६-२७ फुटबॉल हंगामासाठी ‘ए’ डिव्हिजनमधील पात्र १६ संघांसाठी नोंदणीचे नियम व वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. प्रत्येक संघाने कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या १७ खेळाडूंची AIFF CRS प्रणालीवर Digilocker Verificationसह पूर्ण ‘Approved’ नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या १७ खेळाडूंची प्रमाणित यादी संघांनी १ ऑक्टोबर २०२६ रोजी केएसए कार्यालयात जमा करावी लागणार आहे. त्यानुसार संघ व खेळाडूंची ऑनलाइन नोंदणी ८ ते ११ ऑक्टोबरदरम्यान होईल. नियमित नोंदणी ८ ते १० ऑक्टोबर, तर विलंब नोंदणी ११ ऑक्टोबरला होणार आहे. नोंदणीची वेळ सायंकाळी ५:३० ते ७:३० अशी आहे.
१७ स्थानिक खेळाडूंची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर उर्वरित तीन जागांसाठी कोल्हापूर जिल्ह्याबाहेरील अथवा पात्र स्थानिक खेळाडूंची नोंदणी २ ते ५ नोव्हेंबरदरम्यान करता येणार आहे. नियमित नोंदणी २ ते ४ नोव्हेंबर, तर विलंब नोंदणी ५ नोव्हेंबरला होईल. ५ नोव्हेंबरला विलंब नोंदणीची वेळ रात्री ९ वाजेपर्यंत राहणार आहे.
किमान १६, कमाल २० खेळाडू….
प्रत्येक संघाला किमान १६ व कमाल २० खेळाडूंची नोंदणी करता येईल. १७ स्थानिक खेळाडू आणि जास्तीत जास्त तीन जिल्ह्याबाहेरील खेळाडू अशी रचना राहणार आहे. निर्धारित मुदतीत १६ पेक्षा कमी खेळाडूंची नोंदणी झाल्यास संबंधित संघाची नोंदणी रद्द होऊन तो संघ २०२७-२८च्या ‘बी’ डिव्हिजनसाठी पात्र ठरेल. जमा केलेली नोंदणी फी परत मिळणार नाही.
प्रत्येक संघात कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या १९ वर्षांखालील किमान एका खेळाडूची नोंदणी बंधनकारक आहे. तसेच संघाचा प्रशिक्षक ए, बी, सी, डी लायसन्स किंवा एनआयएस डिप्लोमा/सर्टिफिकेटधारक असणे आवश्यक आहे.
नियमबाह्य नोंदणीवर आर्थिक दंड….
खेळाडूची नोंदणी नियमबाह्य असल्याचे तक्रारीनंतर सिद्ध झाल्यास संबंधित खेळाडूची नोंदणी रद्द करण्यात येईल. त्याच्यावर २० हजार रुपये, तर संबंधित संघावर २५ हजार रुपये दंड आकारला जाईल. एकूण ४५ हजार रुपयांचा दंड जमा केल्यानंतरच संघाला पुढील सामने खेळण्याची परवानगी देण्यात येईल. लीग सामन्यात तक्रार सिद्ध झाल्यास तक्रारदार संघाला तीन गोल व तीन गुण देण्यात येतील. त्याने तीनपेक्षा अधिक गोल केले असल्यास ते ग्राह्य धरले जातील. बाद फेरीच्या सामन्यात तक्रारदार संघाला विजयी घोषित करण्यात येईल.
नोंदणी प्रक्रिया ऑनलाइन….
संघ व खेळाडू नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया केएसएच्या अधिकृत संकेतस्थळावर www.ksakolhapur.org करण्यात येणार आहे. खेळाडूकडे वैध AIFF CRS क्रमांक, Registration Validity आणि Digilocker Verification असणे आवश्यक आहे. अपूर्ण किंवा खाडाखोड केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
संघ नोंदणीचा वैधता कालावधी १ ऑक्टोबर २०२६ ते ३१ मे २०२७ असा राहणार आहे. लीगचे सामने उपलब्ध असलेल्या कोणत्याही मैदानावर खेळविले जातील आणि त्या मैदानावर खेळणे सर्व संघांना बंधनकारक राहणार आहे.
सन २०२५-२६मध्ये केएसएच्या ‘ए’, ‘बी’, ‘सी’ व ग्रामीण डिव्हिजनमध्ये नोंदणीकृत असलेल्या खेळाडूंची माहिती संघांना केएसएच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
  ————–
‘ए‌’ डिव्हीजनमधील १६ संघ….
सन २०२६-२७ च्या फुटबॉल हंगामासाठी केएसए ‌‘ए‌’ डिव्हीजनमध्ये नोंदणी करण्यासाठी पात्र ठरलेले संघ असे- १)पाटाकडील तालीम मंडळ, २) वेताळमाळ तालीम मंडळ, ३) खंडोबा तालीम मंडळ, ४) श्री शिवाजी तरूण मंडळ, ५) दिलबहार तालीम मंडळ, ६) सम्राटनगर स्पोर्ट्स, ७) संयुक्त जुना बुधवार पेठ, ८) प्रॅक्टीस फुटबॉल क्लब, ९) उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ, १०) बालगोपाल तालीम मंडळ, ११) फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ, १२) रंकाळा तालीम मंडळ, १३) सुभाषनगर फुटबॉल क्लब, १४) संध्यामठ तरूण मंडळ, १५)वर्षा विश्वास तरूण मंडळ, १६) मर्दानी खेळाचा आखाडा.

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
29 ° C
29 °
28.9 °
79 %
4.1kmh
92 %
Tue
29 °
Wed
29 °
Thu
29 °
Fri
28 °
Sat
28 °

Most Popular

You cannot copy content of this page