कोल्हापूर :
आगामी पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे यांचे नेतृत्व निश्चितच प्रभावी ठरेल म्हणूनच कौस्तुभ गावडे यांच्या शिक्षक मतदार संघाच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्री आणि पार्लमेंटरी बोर्डाकडे आग्रह धरणार, असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केले.
ते श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर, जिल्हा/शहर शिक्षक लोकशाही आघाडी आणि माध्यमिक शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय आदर्श संस्थाचालक, मुख्याध्यापक व शिक्षक पुरस्कार प्रदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे हे होते.
शिक्षक हा केवळ ज्ञानदान करणारा घटक नसून समाजाच्या आणि राष्ट्राच्या भविष्याची जडणघडण करणारा शिल्पकार आहे. बदलत्या काळानुसार आधुनिक तंत्रज्ञान, नव्या अध्यापन पद्धती आणि विद्यार्थीकेंद्रित दृष्टिकोन स्वीकारून गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षकांनी सातत्याने प्रयत्नशील राहावे. शिक्षकांच्या योगदानामुळेच समाजाची वैचारिक आणि शैक्षणिक पिढी घडत आहे. शिक्षकांच्या प्रश्नांना शासन दरबारी प्रभावीपणे मांडणारे शिक्षक मित्र कौस्तुभ गावडे यांच्यासारखे सक्षम नेतृत्व आवश्यक आहे. शिक्षकांच्या प्रश्नांची जाण असलेले आणि शिक्षण क्षेत्राशी सातत्याने जोडलेले नेतृत्व विधानपरिषदेत पोहोचवणे ही काळाची गरज आहे. कौस्तुभ गावडे यांनी शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी घेतलेली भूमिका आणि केलेले संघटनात्मक कार्य उल्लेखनीय आहे.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी़, शिक्षकांच्या प्रश्नांसाठी अभ्यासू नेतृत्वाची गरज आहे. शिक्षणाबरोबरच संस्कार आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांचे उपयोजन शिक्षकांनी करणे गरजेचे आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या बदलत्या गरजा समजून घेऊन आधुनिक अध्यापन पद्धती आत्मसात करणे आवश्यक आहे. शिक्षकांवरील अन्याय वाढतो आहे, यासाठी शिक्षकांच्या प्रश्नांची जाणीव असणारे अभ्यासू, होतकरु, धाडसी, तरुण तडफदार नेतृत्व कौस्तुभ गावडे यांना शिक्षक आमदार म्हणून विधानपरिषदेत पाठविण्याची कामगिरी आपणा सर्वांना करावयाची आहे, असे मत मांडले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना कौस्तुभ गावडे यांनी शिक्षकांच्या प्रश्नांना सर्वोच्च प्राधान्य देण्याची भूमिका स्पष्ट केली.
यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडीचे प्रदेशाध्यक्ष जी. के. थोरात, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या विद्यासमितीचे अध्यक्ष डॉ. श्रीराम साळुंखे, टीडीएफचे प्रदेश सचिव के. एस. ढोमसे, माजी आमदार बाबासाहेब पाटील सरुडकर यांनी मनोगते व्यक्त केली.
याप्रसंगी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षकदूत पुरस्कार कोजिमाशिचे तज्ज्ञ संचालक दादासाहेब लाड यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच माजी आमदार बाबासाहेब पाटील सरुडकर, जयकुमार मल्हार देसाई, डॉ. सतिश घाळी, डॉ. के. एस. चौगुले यांना जीवनगौरव पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले. अनिल ईश्वरा चव्हाण यांना आदर्श साहित्यिक पुरस्कार देण्यात आला.
तसेच १४ आदर्श संस्थाचालक, १७ मुख्याध्यापकांचा आणि ४९ शिक्षक व शिक्षिकांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत टीडीएफ पुणे विभागाचे अध्यक्ष प्राचार्य शिवाजीराव कामथे यांनी केले. आभार पुणे विभाग माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सुरेश खोत यांनी मानले तर सुत्रसंचालन प्रा. अशोक पाटील यांनी केले. यावेळी बी. डी. पाटील, बी. एस. खामकर, संजय चोरमारे, आजीव सेवक भूपाल कुंभार, अजित देसाई, राहुल कुंभार, अशोक पलंगे हे उपस्थित होते. कार्यक्रमास शिक्षक, संस्थाचालक, मुख्याध्यापक, विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर आणि शिक्षणप्रेमी उपस्थित होते.
——————————
कौस्तुभ गावडे यांच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्री आणि पार्लमेंटरी बोर्डाकडे आग्रह धरणार : खा.धनंजय महाडिक
Mumbai
light rain
25
°
C
25
°
25
°
94 %
1.5kmh
100 %
Mon
28
°
Tue
28
°
Wed
28
°
Thu
28
°
Fri
29
°

