Homeकला - क्रीडाफिफा वर्ल्ड कप २०२६चा फिव्हर

फिफा वर्ल्ड कप २०२६चा फिव्हर

• कोल्हापूर झाले फुटबॉलमय
कोल्हापूर (सुरेश आंबुसकर) :
अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या तीन देशांमध्ये ११ जून ते १९ जुलै २०२६ या कालावधीत होणाऱ्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा थरार अनुभवण्यासाठी कोल्हापूरातील फुटबॉलप्रेमी आणि क्रीडारसिक उत्सुक झाले आहेत. जगातील सर्वोच्च फुटबॉल स्पर्धेतील सामने, नामांकित स्टार खेळाडूंचा खेळ आणि नवोदित प्रतिभावंतांचे कौशल्य पाहण्यासाठी शहरातील चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
फुटबॉलची शंभर वर्षांहून अधिक परंपरा लाभलेल्या कोल्हापूरमध्ये विश्वचषक स्पर्धेचे वेध लागले असून शहरभर फुटबॉलचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय संघ या स्पर्धेसाठी पात्र ठरलेला नसला तरी कोल्हापूरकरांच्या उत्साहात कोणतीही कमतरता दिसून येत नाही. उलट फिफा वर्ल्ड कप २०२६ चा फिव्हर शहरातील प्रत्येक चौक, गल्ली आणि कट्ट्यावर जाणवत आहे. उपनगरांमध्येही या जागतिक फुटबॉल स्पर्धेची चर्चा आहे.
शहरातील विविध पेठा, गल्ली-बोळ आणि प्रमुख चौकांमध्ये जगप्रसिद्ध फुटबॉलपटूंचे डिजिटल फलक झळकत आहेत. अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सी, पोर्तुगालचा क्रिस्टियानो रोनाल्डो, ब्राझीलचा नेमार तसेच फ्रान्सचा किलियन एमबाप्पे यांच्यासह अन्य नामवंत खेळाडूंच्या छायाचित्रांनी शहर सजले आहे. अनेक ठिकाणी अर्जेंटिना, ब्राझील, पोर्तुगाल, स्पेन, इंग्लंड, जर्मनी आणि फ्रान्स या संघांचे ध्वज, पताका आणि संघांच्या किटवर आधारित सजावट करण्यात आली आहे.
स्थानिक फुटबॉल क्लब, मंडळे आणि विविध ग्रुप तसेच फुटबॉलप्रेमींनी विश्वचषकाच्या स्वागतासाठी विशेष पोस्टर्स, बॅनर्स आणि शुभेच्छा फलक उभारले आहेत. शहरातील विविध भागांमध्ये कोणता संघ विजेता ठरेल, कोणता खेळाडू सर्वाधिक गोल करेल आणि यंदाच्या स्पर्धेतील संभाव्य विजेता कोण असेल, याबाबत रंगलेल्या चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, क्रीडा साहित्य विक्री करणाऱ्या दुकानांमध्येही विश्वचषकाचे वारे वाहू लागले आहेत. विविध देशांच्या जर्सी, फुटबॉल, शूज आणि अन्य क्रीडा साहित्याची आकर्षक मांडणी करण्यात आली असून ग्राहकांचा प्रतिसाद वाढत आहे. नामांकित खेळाडूंच्या छायाचित्रांसह सजविलेल्या दुकानांकडे युवक आणि बालचमुंचे विशेष आकर्षण दिसून येत आहे. फुटबॉलप्रेमी कोल्हापूरकर रात्री उशिरापर्यंत सामने पाहण्यासाठी तयारी करत असून अनेक ठिकाणी सामूहिक प्रक्षेपणाचे नियोजनही सुरू आहे.
एकंदरीत, फिफा वर्ल्ड कप २०२६च्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहर पूर्णपणे फुटबॉलमय झाले असून चौका-चौकात, गल्ली-बोळात आणि कट्ट्यांवर रंगणाऱ्या चर्चांमधून फुटबॉलप्रेमींची स्पर्धेबाबतची उत्सुकता स्पष्टपणे दिसून येत आहे. आगामी महिनाभर कोल्हापूरकरांवर विश्वचषक फुटबॉलचा रंग चढलेला पाहायला मिळणार आहे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
moderate rain
28.8 ° C
28.8 °
28.8 °
80 %
8.7kmh
39 %
Sun
29 °
Mon
29 °
Tue
28 °
Wed
29 °
Thu
28 °

Most Popular

You cannot copy content of this page